Update:  Sunday, April 20, 2014 7:05:17 PM IST


| |

महा ई-सेवा केंद्रांत होतेय 'महा'लूट
- विशाल पाटील : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2013 - 12:45 AM IST

दाखल्यासाठी तिप्पट दर, दलालांचा राबता
सातारा- महसूल विभागात पारदर्शकता आणण्याबरोबरच नागरिकांना विनाकटकट शासकीय दाखले देण्यासाठी महा ई-सेवा केंद्रे गावोगावी सुरू केली आहेत. परंतु, सेवा पेक्षा "मेवा' मिळविण्याचा उद्देश ठेवून ही केंद्रे सुरू झाल्याने शासकीय दरापेक्षाही तिप्पट पैसे नागरिकांकडून उकळले जात आहेत. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी 150, तर शिधापत्रिकेसाठी 500 रुपयांपर्यंत महा "लूट' सुरू आहे. ही लूट थांबविण्यासाठी प्रत्येक महा ई-सेवा केंद्रात दर फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यात सुमारे पावणेदोनशे महा ई-सेवा केंद्रे असून त्या माध्यमातून उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, सातबारा उतारा, आठ अ उतारा, रेशनकार्ड दुरुस्ती, नावे कमी-जास्त करणे, दुबार रेशन कार्ड काढणे अथवा विभक्‍त करणे, जन्म-मृत्यूचा दाखला, ऐपतदारी प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक दाखला आदींसह 17 प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या सोयी होऊ लागल्या आहेत. परंतु, केंद्र चालकांनी सेवेच्या नावाखाली "मेवा' खाणे सुरू केल्याने नागरिकांची आर्थिक पिळवणूक होऊ लागली आहेत. त्यातच दलालांचा राबता वाढल्याने ही केंद्रे लुबाडणुकीचे कुराणच बनू लागली आहेत.

उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल देण्यासाठी नियमाप्रमाणे 54 रुपये घेणे बंधनकारक असतानाही 120 ते 150 रुपये तर जातीचा दाखला, नॉनक्रिमिलेअर दाखल्यासाठी 150 रुपयांहून जास्त पैसे उकळले जात आहेत. याशिवाय शिधापत्रिका दुबार काढणे, विभक्‍त करण्यासाठी 500 रुपये ते दोन हजार रुपयांपर्यंत दर काढला आहे. सेवा केंद्र गावात आहे, तहसील कार्यालयात जावे लागते, तेथील क्‍लार्क, तहसीलदारांना अर्थपूर्ण मदत करावी लागते, अशी अनेक कारणे सांगून लुबाडणुकीचा दर वाढविला जातो. शिवाय लवकरात लवकर दाखले हवे असतील तर तोच दर तिप्पटही केला जात आहे.
सध्या शाळा, महाविद्यालयांचे निकाल लागले असून जून महिन्यात शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहेत. त्या वेळी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्‍यकता असल्याने सदरचे विद्यार्थी व पालक आतापासूनच दाखले काढू लागले आहेत. त्यामुळे महा ई-सेवा केंद्राभोवती दलालांचाही राबता वाढला आहे. केंद्र चालक व दलालांकडूनही दाखल्यासाठी लुटले जात आहे. तरी प्रत्येक महा ई-सेवा केंद्रात सेवा व दराचा फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.

"महा ई-सेवा केंद्रात शासनाच्या नियमानुसार प्रोसेसिंग फी घेतली पाहिजे. अतिरिक्‍त फी कोणी घेत असल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. तसेच लवकरच केंद्र चालकांची बैठक घेऊन त्यांना दर फलकाबाबतचे पत्र देणार आहे. ते दरफलक प्रत्येक केंद्रचालकास लावावे लागतील.''
-संजीव देशमुख, उपजिल्हाधिकारी (महसूल)

 
0
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2014 eSakal.com - All rights reserved.
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: