बोरोटीच्या नीरज जाधवने फुलवली विक्रमी उत्पनाची जरबेरा फूलशेती 

jarbera
jarbera

अक्कलकोट : बोरोटी (ता.अक्कलकोट) येथील डॉ.नीरज जाधव यांनी आपल्या शेतात २० गुंठ्यातून आकर्षक रंगसंगीतीच्या जरबेरीची यशस्वी फूलशेती केली आहे. कमीत कमी क्षेत्रात आणि पाण्यात चांगले उत्पन्न कसे मिळवावे याचे एक उत्तम उदाहरण ही फुलशेती पाहिल्यावर नक्कीच मिळणार आहे.

बोरोटी येथील निरज हे आपले वडील सुपुत्र व आई सुनंदा यांची प्रेरणा घेऊन व पाठबळावर एक वेगळा प्रयोग म्हणून आपल्या २० गुंठ्यात ही लागवड केली आहे. त्यासाठी पॉलिहाऊसची उभारणी करून त्यासाठी अफझलपूर येथून २.२५ लाख रुपये किमतीचे २५० ब्रास लाल माती आणून टाकली आहे. त्यात २ बाय २ फुटाचे बेड तयार करून त्यात अर्धा फूट अंतर ठेवून एकूण ८४ बेड तयार केले आहेत. त्यानंतर भारत व नेदरलँड यांच्या संयुक्त उपक्रमातून मागविलेली टिशू कल्चर जरबेरा रोपे जी पुण्यातील के. एम. बायोप्लॅन्ट येथून ३२ रुपये प्रमाणे ११५०० रोपे मागविला आणि जून २०१७ मध्ये याची लागवड केली आहे. त्यात त्यांनी गुलाबी, लाल, पिवळा आणि केशरी रंगाची फुलांची रोपे लावली आहेत. त्यांना पाण्यात विरघळणारी खते देण्यात येत आहेत. त्यानंतर त्या रोपांचे तापमान फॉगर आणि शॉवर यांचा वापर करून २८ ते ३४ अंश इतके तापमान गरजेनुसार नियंत्रित करण्यात येत असून यामुळे रोपांची वाढ चांगली होत आहे.

याला दररोज फक्त ६ हजार लिटर पाणी ठिबकद्वारे दिली जात आहे.त्यानंतर ऑक्टोबर २०१७ पासून प्रत्यक्ष फुले उत्पादनास प्रारंभ झाला आहे. आता सध्या संपूर्ण शेती आकर्षक फुलांनी बहरली असून महिन्याकाठी सरासरी पन्नास हजार फुले हैद्राबाद येथे पॅकिंग करून विक्रीसाठी पाठविण्यात येत आहेत. स्टेज सजावटीसाठी लागणाऱ्या या फुलांना प्रचंड मागणी असून याचा दर प्रत्येक फुलास एक ते तेरा रुपये इतका दर सिझन नुसार मिळत आहे. याच्या एकूण शेती उभारण्याचा खर्च अर्धा एकरसाठी २४ लाख रुपये इतका आला आहे. यासाठी पॉलिहाऊसचा अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ९.५ लाखांचा अनुदान देखील मिळाला आहे. दरमहा या शेतीतून सरासरी एक ते सव्वा लाख इतके निव्वळ उत्पन्न मिळत असून हे फुलशेती सलग आठेचाळीस महिने उत्पन्न देत राहणार आहे. या शेतीच्या उभारणीसाठी जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार आणि तालुका कृषी अधिकारी राम फडतरे यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाले आहे. आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळत केलेली ही जरबेरा शेती निश्चित इतर शेतकऱ्यांना प्रेरणादाई ठरणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचा कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार देखील यावर्षी मिळाला आहे.

जरबेरा फुलांचा टिकाऊपणा व साठवण क्षमता चांगली
जरबेरा हे विविध रंगात आणि आकारात उपलब्ध असलेले लांब दांड्याचे फुल आहे. फुलांचा दांडा लांब, सडसडीत व पाणी रहीत असतो. पुष्परचनेमध्ये या फुलाचा अतिशय सुंदरतेने उपयोग केला जातो. जरबेरा फुलांचा टिकाऊपणा व साठवण क्षमता चांगली आहे. देशभर आणि परदेशातही चांगली मागणी असल्याने माती विरहीत माध्यमात तसेच पॉलीहाऊससारख्या नियंत्रीत वारावरणात जरबेरा फुलाची लागवड करणे फायदेशीर ठरते. 

आम्हा डॉक्टर मित्रांच्या प्रेरणेतून आणि कागल येथील जरबेरा शेती पाहून मला प्रेरणा मिळाली.फक्त एकदा लागवड खर्च जास्त आहे.पुढे खर्च गरजेएवढा करावा लागतो.अर्ध्या एकरात एवढे उत्पन्न देणारी दुसरी शेती नाही, पुढे सतत चार वर्षे मोठे उत्पन्न मिळते. यावर्षी आणखी अर्धा एकर जरबेरा शेती नवीन करण्याचे नियोजन आहे.फक्त धाडस आणि योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.़
- नीरज जाधव, जरबेरा उत्पादक शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com