श्रमदानातून फुलली सीताफळाची बाग

राजेश रामपूरकर
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

शासनाने दिलेल्या शेगडी आणि गॅस जोडणीमुळेही गावकऱ्यांनी कुऱ्हाडबंदी केली. वनसंवर्धनासह जमिनी संवर्धनावर भर दिला जात आहे. शेतातील जमिनीची धूपही थांबली असून जमिनीची सुपीकता वाढू लागल्याने उत्पादनही वाढू लागले.
- पांडुरंग कुंभरे, समितीचे अध्यक्ष

नागपूर : खापा वनपरिक्षेत्रातील सोनपूर येथील नागरिकांनी वनजमिनीवर श्रमदानातून पडीत पाच एकर जमिनीवर सीताफळाची बाग फुलवली आणि नवा आदर्श निर्माण केला आहे. गावकरीच श्रमदान करून बगीचा परिसरातून गवत, कचरा नियमित काढतात. ही बाग हिरवीगार झाली असून अनेकांना रोजगारही मिळाला आहे.

खापा वनपरिक्षेत्रातील नागलवाडी नियतक्षेत्र 420 लोकसंख्या असलेले सोनपूर हे छोटेसे गाव. या गावाशेजारी 20 हेक्‍टर पडीत जमिनीवर मिश्र प्रजातीची झाडे होती. या वनाला लागूनच खेकरा नाला, गायमुख नाला, सोनपूर कुंड आणि महारकुंड तलाव हे नैसर्गिक पाण्याचे साठे आहेत. त्यामुळे गावातील पाळीव व मोकाट जनावरे पाणी पिण्यासाठी तलावावर जात. जंगलात चरत असत, अति चराईमुळे वनाची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. तलावात व नाल्यात जमिनीची धूप होऊन माती वाहून जात होती. त्यामुळे शेजारच्या शेतीखालील क्षेत्र नापीक होत चालले होते. जमिनीची पत खालावू लागल्याने शेतकरी आणि गावकरी चिंतेत सापडले होते. जमिनीची पत सुधारण्यासाठी खापा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. गाडगे आणि सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र मेश्राम, वनरक्षक नीलेश नवले यांच्या पुढाकाराने संयुक्त वनव्यवस्थापन समितीची स्थापना केली. पडीत जमिनीच्या संवर्धनासाठी लोकसहभाग वाढविला. सोनपूर येथील 20 हेक्‍टर जमिनीवरील जनावरांच्या चराईवर 2011 मध्ये बंदी घातली. त्यानंतर गावकऱ्यांनी जमिनीची मशागत केली. एक हजार सीताफळाची झाडांची लागवड केली. 500 आवळ्याची झाडे आणि वनौषधीच्या 250 जाती लावल्या. उजाड असलेल्या जमिनीवर हिरवळ पसरली. गावकऱ्यांना रोजगार मिळाला आहे. पुढील वर्षी सीताफळाचे पीक येईल आणि त्यातून गावाचे उत्पन्न वाढेल. आर्थिक सुबत्ता येण्यास मदत होणार आहे.
 

गावाला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार
लोकसहभागातून जमिनीत पत सुधारली आणि सीताफळाची बाग फुलविल्याने 2014 आणि 2015 या सलग दोन वर्षी संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत देण्यात येणारा जिल्हास्तरीय पहिला पुरस्कार गावाला देण्यात आला. पुरस्काराच्या रकमेतून समितीने लग्न समारंभासह इतर कार्यासाठी लागणारे स्वयंपाकाची भांडी खरेदी केली आहे. त्या भांड्यासाठी फक्त 250 रुपये भाडे आकारण्यात येते.