खरिपात ४२ टक्के पीककर्ज वाटप

खरिपात ४२ टक्के पीककर्ज वाटप

नगर - जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीयीकृत बॅंकांना इशारा दिल्यानंतर खरिपात शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याबाबत काहीशी सुधारणा झाली असली तरी बहुतांश बॅंकांची उदासीनता याबाबत कायम आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वर्षभरातील (खरीप-रब्बी) उद्दिष्टाच्या तुलनेत ३० टक्के कर्जवाटप झाले असून, खरिपातील उद्दिष्टाच्या तुलनेत ४२.८० टक्के कर्ज वाटप झाले आहे. सेंट्रल बॅंकेने सर्वाधिक ७० टक्के कर्ज वाटप केले आहे. राज्यातील एकूण कर्ज वाटपाच्या तुलनेत नगर जिल्हा आघाडीवर असल्याचा दावा अग्रणी बॅंकेने केला आहे. 

जिल्ह्यामध्ये ५ लाख १३ हजार ६४ शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात दरवर्षी खरिपात पीककर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग असते. मात्र राष्ट्रीयीकृत बॅंका पीककर्ज देण्याबाबत फारसे गांभीर्याने घेत नसल्याचा सातत्याने आरोप होत आहे. मागणी केल्यानंतर शेतकऱ्यांना चकरा मारायला लावणे असे प्रकार सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये खरिपात ३१९७ कोटी ४० लाख आणि रब्बीत १४२० कोटी १३ लाख असे ४ हजार ६१७ कोटी ५३ लाख रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत जिल्हाभरातील १ लाख ६४ हजार ३६५ शेतकऱ्यांना खरिपात दिलेल्या उद्दिष्टाच्या ४२.८० तर एकूण उद्दिष्टाच्या ३० टक्के कर्जवाटप झाले आहे. मागील पंधरा दिवसाच्या तुलनेत कर्जवाटपाची स्थिती काहीशी सुधारली आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांपैकी बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि सेंट्रल बॅंकेची पीककर्ज वितरणाची स्थिती बरी आहे. आतापर्यंत सेंट्रल बॅंकेने २१४ कोटी १७ लाख, स्टेट बॅंक ऑफ इंडियाने ७२ कोटी८४ लाख,  महाराष्ट्र बॅंकेने १६४ कोटी ८३ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. मात्र काही बॅंकांनी अजूनही कर्जवाटपाकडे गांभीर्याने पाहिले नाही. जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्वाधिक २९६, राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या ३१९, खासगी बॅंकेच्या ७५ आणि महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या ९ अशा ६९९ शाखा आहेत.  

सहकारी बॅंकेकडून ७७३ कोटींचे वितरण 
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने आतापर्यंत १ लाख ३५ हजार ७१३ शेतकऱ्यांना ७७३ कोटी ८० लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा बॅंकेने खरिपासाठी आतापर्यंत ५२ टक्के कर्जवाटप केले आहे. जिल्हा बॅंकेला खरिपात १४८९ कोटी २ लाख रुपये वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. बॅंकेच्या १४८९ सोसायट्या असून, सव्वासात लाखांच्या जवळपास सभासद आहेत.

खरिपात शेतकऱ्यांना गरजेनुसार कर्जवाटपाची स्थिती सुधारणेसाठी प्रयत्न केले जात आहेत. सेंट्रल बॅंकेने कर्जवाटपाची गती वाढवली आहे. गावपातळीवर मेळावा, चर्चासत्र, बैठका घेऊन लोकांना माहिती दिली जात आहे. सध्या नगर आघाडीवर असून, यंदा दिलेले कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होईल. 
- तुकाराम गायकवाड, व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, नगर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com