सौर कृषिपंपाद्वारे केले शेतीला ओलीत

वेलतूर :  सौरऊर्जा प्रकल्पाची माहिती देताना रामदास जिभकाटे, अंबादास तलमले.
वेलतूर : सौरऊर्जा प्रकल्पाची माहिती देताना रामदास जिभकाटे, अंबादास तलमले.

वेलतूर - ‘नको वीज, नको डिझेल, नको पर्यावरणाचा ऱ्हास, सौर कृषिपंपाच्या साहाय्याने करूया शेतीचा विकास’ असे म्हणत सौर कृषिपंपाद्वारे अखंड ओलिताची शेती करण्याची किमया गोन्हाच्या शेतकऱ्यांनी साधून आदर्श घातला. रामदास जिभकाटे, अंबादास तलमले व लोकेश तिडके अशी शेतकऱ्यांची नावे आहेत.

पुणे येथील महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, महाऊर्जा विभागाच्या योजनेतून शेतात सौर कृषिपंप बसवून त्यांनी ही किमया साधली. धान, मिरची, गहू, चणा व भाजीपाला पिकाला सौर कृषिपंपाद्वारे ओलित करून शेती व शेतातील पिके पिकवीत आहेत. 

सततचे भारनियमन व कमी-जास्त होणाऱ्या वीजदाबामुळे त्रासलेल्या शेतकऱ्याला यामुळे नवे बळ प्राप्त झाले आहे. यामुळे थोड्याशा ओलिताअभावी बुडणारी शेती हमखास उत्पन्न देणारी ठरली आहे.

महाराष्ट्र शासनाने विहित केलेल्या पात्रता व प्राधान्यक्रमानुसार पाच एकरांपेक्षा कमी तसेच पाच एकरांपेक्षा जास्त, परंतु १० एकरांपेक्षा कमी जमिनीचे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ३, ५ व ७.५ अश्‍वशक्ती क्षमतेचे सौर कृषिपंप देण्याची योजना आहे. 

गोन्हा येथील शेतकऱ्यांची सौरऊर्जेवर ओलित होत असलेली शेती पाहून अनेक शेतकऱ्यांनी आपलीही शेती सौर कृषिपंपाद्वारे ओलित करून वीजसमस्येवर मात करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

शासनाची सौर कृषिपंप योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची नांदी ठरावी, अशीच अपेक्षा आहे. सौर कृषिपंपाच्या जोडणीतून शेतकऱ्यांचा वेगाने विकास व्हावा.

- दिनेश पडोले, सरपंच, गोन्हा.

पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना संजीवनी आहे. तसेच शेती व्यवसायाला बळकटी प्रधान करणारी आहे.
- सुनील जुवार,  सामाजिक कार्यकर्ते व भाजप पदाधिकारी.

विद्युतीकरणासाठी वन विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्रामुळे अडलेल्या वीजजोडणीला व रखडलेल्या शेती सिंचनाला सौर कृषिपंपामुळे कलाटणी मिळेल. यामुळे शेतकऱ्यांचे ओलिताचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यास मदत होत आहे.
- गौतम रामटेके, व्यावसायिक

महावितरणकडे पैसे भरून कनेक्‍शनसाठी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना यातून आशेचा किरण निर्माण झाला आहे.
- प्रवीण लांजेवार, युवा शेतकरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com