तब्बल ६५ एकरांत द्राक्षबागेचा आधुनिक तंत्राद्वारे विस्तार

६५ एकरांवर पसरलेली भोसले कुटुंबाची विस्तीर्ण द्राक्षबाग आणि टुमदार घर.
६५ एकरांवर पसरलेली भोसले कुटुंबाची विस्तीर्ण द्राक्षबाग आणि टुमदार घर.

सुमारे ४५ एकरांवर केवळ द्राक्षाची बाग. बेदाणा निर्मिती हेच केवळ उद्दीष्ट. त्यातूनच अलीकडील वर्षांत द्राक्षबागेचे क्षेत्र तब्बल ६५ एकरांवर नेले. एवढ्या मोठ्या क्षेत्रावर व्यवस्थापन देखील तितकेच काटेकोर व प्रभावी. ठिबकचे ॲटोमेशन. कमी मनुष्यबळात, कमी खर्चात, कमी वेळेत अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून दर्जेदार द्राक्ष व बेदाण्याचे उत्पादन घेण्याचे कसब विरवडे बुद्रुक (जि. सोलापूर) येथील भोसले-गवळी कुटुंबीयांनी आत्मसात केले आहे. महाफ्रूट हा बेदाण्याचा ब्रँड तयार करून वेबसाइट व फेसबुकद्वारे ‘ऑनलाइन मार्केट’मध्येही त्यांनी उडी घेतली आहे. 

सोलापूर-मंगळवेढा महामार्गावर कामती गावानजीक आत ८ ते १० किलोमीटरवर विरवडे बुद्रुक गाव आहे. सीना नदीचा काहीसा काठ लाभल्याने आणि उजनीच्या कालव्यामुळे पाण्याच्या दृष्टीने तसा बागायती भाग. त्यामुळेच हा पट्टा उसाचा म्हणून ओळखला जातो. याच गावातील सचिन भोसले-गवळी हा तरुण आपल्या संयुक्त कुटुंबातील सदस्यांच्या साथीने सुमारे ६५ एकर द्राक्षशेती मोठ्या धडाडीने सांभाळतो आहे. 

द्राक्षशेतीतील कुटुंब 
सचिन यांचे आजोबा चंद्रसेन भोसले-गवळी यांनी सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वी या भागात द्राक्ष लागवड करून आधुनिक शेतीचा प्रारंभ केला. त्यांची मुले सुरेश, रमेश आणि उमेश यांच्यानंतर आता त्यांचा नातू सचिन अशी तिसरी पिढी शेतीची जबाबदारी सांभाळते आहे. एकत्रित कुटुंबाची ९० एकर शेती आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपर्यंत त्यापैकी सुमारे ४५ एकरांवर द्राक्षबाग होती. आज ती ६५ एकरांवर नेली आहे. उर्वरित क्षेत्रावर चारापिके आणि घरच्या धान्यासाठी काही क्षेत्र राखीव आहे. एवढे मोठे क्षेत्र तसेच अनेक वर्षांची शेती या प्रवासामागे एकत्र कुटुंबाची ताकदच महत्त्वाची ठरली आहे. विशेष म्हणजे द्राक्ष हेच त्यांचे मुख्य पीक राहिले आहे. त्यातूनच या पिकाविषयी असलेला जिव्हाळा दिसून येतो. 

बाग दृष्टिक्षेपात 

क्षेत्र- ६५ एकर, वाय आकाराच्या फाउंडेशनमध्ये १० बाय ५ फुटांवर लागवड
-३५ एकर थॉमसन सीडलेस, ५ एकर सोनाका, २५ एकरांत सुपर सोनाका

प्रगतीसाठी केलेले प्रयत्न  

पूर्वी ‘टेबलग्रेप’ म्हणून काही उत्पादन व्हायचे. मात्र द्राक्षाचा २० रुपये प्रति किलोपर्यंत घसरलेला दर आणि उत्पन्नाचा विचार करता जमा-खर्चाचा मेळ बसत नव्हता. त्यातच २०१२ मध्ये सुरेश यांचे चिरंजीव सचिन बीएस्सी ॲग्रीची पदवी घेऊन शेतीत उतरले. पुण्या- मुंबईत नोकरी करण्यापेक्षा घरच्याच शेतीत लक्ष घालण्याचा विचार केला. 

सन २०१३ मध्ये बेदाणा निर्मितीसाठी आवश्‍यक अत्याधुनिक मशिनरीची खरेदी केली. आजोबा चंद्रसेन फार पूर्वीपासून बदल स्वीकारत आले आहेत. सन १९८० च्या सुमारास आजोबांनी परिसरात पहिल्यांदा ट्रॅक्‍टर घेतला होता. आजही स्मरण म्हणून तो जतन केला आहे. पुढे जाण्यासाठी मानसिकतेत बदल करण्याची परंपरा वडील सुरेश, चुलते रमेश आणि उमेश यांनीही कायम ठेवली. सचिनच्या धडपडीला त्यांची साथ मिळाली. 
 
जोखीम व्यवस्थापन कसे केले ?

६५ एकर क्षेत्र असल्याने कोणतीही आपत्ती आली तरी तेवढे संपूर्ण क्षेत्र प्रभावीत होऊ शकते. 
मात्र या कुटुंबाने तेवढ्या क्षेत्रात प्रत्येकी पाच एकरचे प्लॉट पाडले आहेत. त्याला अनुक्रमांक दिले आहेत. त्यामुळे कोणत्या प्लॉटमध्ये केव्हा काय काम करायचे हे समजते. 
साधारणपणे एक ऑक्‍टोबरला गोडी छाटणी सुरू होते. त्यानंतर ३० ऑक्‍टोबरपर्यंत पाच दिवसांच्या अंतराने प्रत्येक प्लॉटमध्ये छाटणी होते. साहजिकच वेगवेगळ्या प्लॉटमध्ये वेगवेगळ्या द्राक्षअवस्था दिसून येतात.
छाटणीचे नियोजन करताना बड ्रेक, पोंगा स्टेज व फुलोरा या अवस्थांचे नियोजन अधिक काटेकोर होते. अवकाळी पाऊस केव्हा पडेल, आपत्ती काय येईल याचा हवामान अंदाज घेतला जातो. त्यामुळे आपत्ती आली तरी पूर्ण ६५ एकर क्षेत्राचे नुकसान होत नाही. 

साखरेवर आधारित उत्पादन

सचिन म्हणाले, की एकरी १२ ते १६ टनांपर्यंत द्राक्षाचे उत्पादन मिळते. साधारण चार किलो द्राक्षांपासून एक किलो बेदाणा तयार होतो. मात्र द्राक्षातील शुगर ब्रिक्स २२ ते २४ टक्के असेल तरच हे गुणोत्तर जमते. द्राक्षात साखर कमी असल्यास बेदाण्यासाठी द्राक्षे अधिक लागतात. त्यामुळे घडांमध्ये योग्य साखर असावी, यासाठी चांगले व्यवस्थापन गरजेचे असते. 
बेदाण्याची तयारी फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून होते. घडांमध्ये २२ ते २४ ब्रिक्‍सपर्यंत साखर उतरल्यानंतरच घड काढले जातात. छाटणीच्या वेळा आणि नियमित निरीक्षण यामुळे कोणती बाग, कोणत्या वेळेस काढणीस येणार याचा अंदाज त्यांना येतो. त्यानुसार बेदाणा उत्पादनाची तयारी केली जाते. पुढे दोन ते तीन महिने बेदाणा हंगाम चालतो. 

ठिबक ऑटोमेशन 

संपूर्ण ६५ एकरांसाठी स्वयंचलित ठिबक (ऑटोमेशन) यंत्रणा आहे. बागेच्या मध्यभागी मोठा हॉल आहे. त्या ठिकाणाहून प्लॉटनिहाय झाडांची गरज अोळखून काटेकोर प्रमाणात पाणी आणि खते बागेला सोडण्यासाठी खास यंत्रणा उभी केली आहे. संपूर्ण क्षेत्राला फिल्टर केलेले पाणी पुरवले जाते. पाच टाक्‍या बसवण्यात आल्या आहेत. यासंबंधी सर्व संगणकीय नोंदी ठेवल्या जातात. कोणत्या प्लॉटमध्ये काय काम केले, कोणते करायचे राहिले याचा अंदाज येतो.  

‘इलेक्‍ट्रोस्टॅटिक स्प्रेअर’चा वापर

मोठ्या क्षेत्रावर कीडनाशक फवारणीचा प्रश्नही मोठा  होता. त्यावर यांत्रिकीकरणातून मात केली आहे.  उच्च तांत्रिक क्षमता असलेला स्वयंचलित ‘इलेक्‍ट्रोस्टॅटिक स्प्रेअर’ खरेदी केला आहे. त्याद्वारे फवारणी व्यतिरिक्त डिपिंगद्वारे साधले जाणारे कामही होते. पाण्याची सुमारे ७५ टक्के बचत होते.

स्वच्छता 

द्राक्षे काढल्यानंतर डिपींग, त्यानंतर सुमारे १२ दिवस वाळवणीसाठी रॅकवर ठेवली जातात. त्यानंतर   स्वच्छ करुन हा बेदाणा मळणी यंत्रात घेतला जातो. त्याद्वारे काडी, कचरा काढला जातो. घडांचे देठही वेगळे होतात. 

ग्रेडिंग- लहान, मध्यम आणि मोठा अशा पद्धतीने ग्रेडिंग होते. त्यानंतर हिरवा, पिवळा आणि काळा अशा तीन रंगातही प्रतवारी होते. त्यानंतर बेदाण्याचे पुन्हा वॉशिंग होते. 

पॅकिंग 

बेदाण्याचे दर पाहून तो कोल्ड स्टोरेजमध्ये १५ किलोच्या पॅकिंगमध्ये ठेवला जातो. योग्य दर येताच विकला जातो. आता थेट ग्राहकांना विकण्याच्या उद्देशाने २५० व पाचशे ग्रॅम व एक किलोचे पॅकिंग केले आहे. 

मार्केट

सन २०१३ मध्ये बेदाण्याची मशिनरी घेतली. गेल्या तीन वर्षांत दुष्काळ, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीतही चांगले उत्पादन घेतले. पहिल्यावर्षी फारसं हाती लागलं नाही. मात्र २०१५ मध्ये १२० टन (सुमारे ४५ एकरांत), २०१६ मध्ये १५५ टन (६० एकरांत) तर यंदा तब्बल २२० टन (६५ एकरांत) बेदाणा उत्पादन घेतले. सांगली जिल्ह्यातील कुपवाड मार्केटसह पंढरपुरातील बेदाणा मार्केटमध्ये बेदाणा पाठवला जातो. या दोन वर्षांत सरासरी दर किलोला १०० रुपये राहिला आहे.  
 
ब्रॅंड आणि ऑनलाइन मार्केट

बेदाण्याचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेऊनही हवा तसा दर आणि उठाव मिळत नसल्याने भोसले-गवळी यांनी बेदाण्याचा ‘महाफ्रुट'' हा ब्रॅण्ड तयार केला आहे. चंद्रकांती फार्म या नावाने आपल्या शेतीचे नोंदणीकरण व त्या अंतर्गत ‘वेबसाईट’ व फेसबुक पेजही सुरू केले आहे. त्या माध्यमातून बेदाणा मार्केटिंग ते करीत आहेत. ‘रेसीड्यू फ्री’ बेदाणा निर्मिती करून थेट ग्राहक विक्री हेच पुढचे ध्येय आहे. 

- सचिन भोसले-गवळी, ९९२३६६१७८८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com