एकात्मीक पद्धतीचा, मजुरांविना, ४० जनावरांचा यशस्वी दुग्धव्यवसाय

Amar-Shitole
Amar-Shitole

दुग्धव्यवसाय आतबट्ट्याचा असल्याची चर्चा अनेक ठिकाणी होत असते. मात्र कल्पकता, जिद्द, चिकाटी व अतीव कष्टांची तयारी असल्यास आर्थिक प्रगती किंवा यश मिळवता येते. खडकी (जि. पुणे) येथील शितोळे कुटूंबाने हे सिद्ध केले आहे. घरचा चारा, मुक्त गोठा, मजुरांची मदत न घेता घरच्यांचेच श्रम व नेटक्या व्यवस्थापनातून या कुटूंबाने प्रगती साधली आहे.

पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील खडकी (शितोळे वस्ती क्र. १) येथे अमर शितोळे राहतात. खडकवासला कालव्याच्या शेवटच्या भागात तर उजनीपासून सुमारे दहा किलोमीटरवर त्यांची शेती असल्यामुळे पाण्याच्या दुर्भिक्षाचा त्यांना सातत्याने सामना करावा लागे. पाणी हीच मुख्य समस्या असल्याने शितोळे कुटुंबीयांनी दुग्धव्यवसायाची निवड केली. गेल्या पंधरा वर्षांपासून अमर आपले वडील शशिकांत, आई सौ. सुनंदा बंधू प्रवीण यांच्या मदतीने या व्यवसायात टिकून आहेत. होलस्टीन फ्रिजीयन गायींचा सांभाळ ते करीत. मात्र व्यवसायातील खर्च व मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्यामुळे अमर यांनी दुग्धव्यवसाय थांबवून मत्स्यव्यवसाय सुरू केला. मात्र या व्यवसायातूनही फारसे काही हाती लागत नसल्याने निराशा आली. 

मुक्त गोठा पद्धतीचा पर्याय
या दरम्यान खडकी येथील पशुवैद्यकीय अधिकारी एस. के. आटोळे तसेच भिगवण येथील ग्रामीण विकास केंद्रातील देवीदास फलफले यांनी अमर यांना दुग्धव्यवसायाचेच महत्त्व पटवून दिले. तो अधिक फायदेशीर करण्यासाठी मुक्त गोठ्याची संकल्पना समजावून दिली. अमर यांनी त्यादृष्टीने व्यवसायात बदल करण्यास सुरवात केली. 

व्यवसायाला आधुनिकतेची जोड
मुक्त गोठ्यात सद्यस्थितीत लहान मोठ्या मिळून चाळीस गायी आहेत. शितोळे कुटुंबाना दुग्ध व्यवसायाचे ज्ञान होतेच. त्यास केवळ आधुनिकतेची जोड दिली. पूर्वीच्या पाच गायी होत्याच. त्यामुळे गायी खरेदीसाठी फार मोठे भांडवल उभारावे लागले नाही. शितोळे यांची सात एकर शेती आहे. पैकी दोन एकर डोंगर उतारावर तर पाच एकर ती पिकाऊ आहे. 

सर्व कुटूंब राबते व्यवसायात
चाळीस गायी आजच्या महागाईच्या काळात सांभाळायच्या म्हणजे किमान तीन- चार मजूर लागतात. परंतु, शितोळे यांनी मुक्त गोठा संकल्पनेत बाहेरील मजुराला फारसे काम ठेवलेले नाही. आई, वडील, स्वतः, पत्नी तसेच भाऊ व त्यांची पत्नी असे संपूर्ण कुटुंबच व्यवसायात काम करतात. कामांचे योग्य नियोजन व त्यास आधुनिकतेची जोड यांमुळे कामांचा ताण विभागला जातो. शेतातील वैरणीची व्यवस्था, दूध काढणे आदी कामे पुरुष मंडळी तर खाद्य देणे, गोठा स्वच्छता आदी कामे महिला पाहतात. त्यामुळे मजुरांविना गोठ्याचा कारभार चालतो. त्यातून महिन्याकाठी सुमारे तीस ते चाळीस हजार रुपयांची बचत साधली आहे. 

व्यवसायाची वैशिष्ट्ये
यंत्राच्या साह्याने कुट्टी केलेले खाद्य सकाळी व सायंकाळी असे दोन वेळा दिले जाते.
दोन वेळा धारा काढण्यासाठी आधुनिक मिल्किंग मशिनचा वापर  गाईंकडून अतिरिक्त दुधाची अपेक्षा न ठेवता गाईच्या आरोग्यावर जास्त लक्ष दिले जाते. त्यामुळे औषधांवरील खर्चही आपोआपच नियंत्रित होतो.

घरगुती पशुखाद्यावर भर 
संकरीत गाय म्हटले पशुखाद्याचा भरपूर वापर ही कल्पना काहींच्या मनात घर करून बसली आहे. शितोळे यांना त्यास फाटा देत घरी तयार केलेले पशुखाद्य देण्यावर भर दिला आहे. एकूण खाद्यापैकी केवळ २० टक्के खाद्यच विकत आणले जाते. मका, बाजरी, ज्वारी, गहू, कडधान्याचा भरडा प्रामुख्याने दिला जातो. त्यामुळे खाद्यावरील अतिरिक्त खर्चही वाचतो. पौष्टीक खाद्यही जनावरांना मिळते असा दुहेरी फायदा होतो. भेसळीची समस्या राहात नाही.

कोंबड्यांचा कल्पकतेने वापर
मुक्त गोठ्यातील प्रमुख काम म्हणजे गोठ्याची स्वच्छता. शितोळे यांना यासाठी ‘बिनपगारी’ कामगारांची म्हणजे कोंबड्यांची नेमणूक केली आहे. गोठ्यात शंभर कोंबड्या सोडल्या आहेत. त्या गायींचे शेण विस्कटून त्यातील मका, ज्वारी, आदींचे तुकडे खातात. ठराविक काळानंतर कोंबड्यांनी विस्कटलेले शेण गोळा करून त्याची विक्री करण्यात येते. कोंबड्यांमुळे गोठा स्वच्छतेच्या कामाचा ताण कमी होतो. शिवाय अंडी व कोंबड्यांच्या विक्रीतून वार्षिक पन्नास ते साठ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. 

अनुदानाचाही लाभ
खडकी येथील पशुवैद्यकीय अधिकारी एस. के. आटोळे यांच्या मार्गदर्शनासह मुरघास प्रकल्पासाठी ५३ हजार रुपयांचे अनुदान मिळाले. सरकारी योजनेतून गायींचा विमा उतरविण्यात आला. मिल्किंग मशीनसाठी सुमारे २२ हजार रुपये अनुदान मिळाले. गोठ्यामधील शंभर कोंबड्यांची पिल्लेही शासकीय अनुदानातूनच मिळाली.
 
अर्थकारण 
गोठ्यातील ४० पैकी सरासरी पंचवीस गाई दुभत्या राहतील असे नियोजन केले आहे. दररोजचेे दूध संकलन ३२० लिटर होते. सध्या लिटरला वीस ते बावीस रुपये दर मिळत आहे. 

मुक्त गोठा पद्धतीची रचना 
     घराजवळच्या शेतीत दहा गुंठे क्षेत्रात मुक्त गोठा 
     त्यासाठी बाजूला पाच फूट उंचीची भिंत 
     गोठ्याच्या मध्यभागी सावलीसाठी झाडे
     एका बाजूला खाद्य, खुराक देण्यासाठी गव्हाणीची व्यवस्था. गोठ्याच्या     मध्यभागी पाण्याचा हौद बांधला.
     गोठ्याचे चार विभाग. एकात दुभत्या, दुसऱ्या विभागात गाभण गाई, तिसऱ्या विभागात कालवड तर चौथ्या विभागात वासरे अशी रचना.
     पाच एकरांत चारा पिकेच घेतली जात असल्याने चाऱ्यावरील अतिरिक्त खर्च वाचला. 
     एकूण रचनेमुळे गायी व वासरांना पुरेशी जागा, विश्रांती मिळाली. गायींचे आरोग्य चांगले राहात असल्याने आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाले. सध्या गोठ्यात एचएफ जातीच्या सुमारे ४० गायींचे संगोपन होते. 

मूरघास प्रकल्पातून चाराटंचाईवर मात
मुरघासाची दोन युनिट्‌स उभारली आहेत. त्यासाठी शासनाकडून अनुदानही मिळाले आहे. सुमारे चाळीस दिवसांनंतर मुरघास युनिटमध्ये पौष्टीक चारा तयार होतो. तो सुमारे दोन वर्षांपर्यंत जनावरांना देता येतो. यामुळे टंचाईच्या काळात महागडा चारा घेण्याची वेळ येत नाही.

आदर्श गोपालक पुरस्कार 
शितोळे यांच्या आदर्श दुग्धव्यवसायाची दखल जिल्हास्तरावरही घेण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा मानाचा आदर्श गोपालक पुरस्कार अमर शितोळे यांना मिळाला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांबरोबरच शासकीय पातळीवरही शितोळे यांच्या प्रयत्नांची अोळख झाली आहे. दुग्ध व्यवसाय कल्पकतेने व चिकाटीने केल्यास कुटुंबाच्या प्रगतीचा आधार होऊ शकतो हेच शितोळे कुटुंबीयांनी दाखवून दिले आहे.

दुधासह शेणखत, कोंबडीपालन, कालवड विक्री आदींमधूनही अतिरिक्त उत्पन्न मिळते. एकूण खर्चाच्या साधारण ४० ते ५० टक्के नफा मिळतो. चारा, मजुरी असे अनेक खर्च वाचवल्याने आर्थिक ताण कमी करण्यात शितोळे यशस्वी झाले आहेत.
- अमर शशिकांत शितोळे, ८९५६६०६१२९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com