खारपाणपट्ट्यात अोव्याची शेती

गोपाल हागे
मंगळवार, 13 जून 2017

बहिरखेड (ता. जि. अकोला) येथील नितीन केशवराव गावंडे यांनी आपल्या ५५ एकर शेतीचे व्यवस्थापन करताना पारंपरिक पिकांत बदल साधला आहे. खारपाणपट्ट्यात मागील दोन रब्बी हंगामांपासून त्यांनी अोवा पिकाची शेती सुरू केली आहे. पहिला प्रयोग उत्पादन व उत्पन्नाच्या बाबतीत यशस्वी झाला. दुसऱ्या प्रयोगात त्यांना उत्पादनाने चांगली साथ दिली आहे. केवळ चांगल्या दरांची त्यांना प्रतीक्षा आहे.

अाज विदर्भात अनेकांकडे चांगल्यापैकी जमीनधारणा अाहे. बहिरखेड (ता. जि. अकोला) येथील नितीन केशवराव गावंडे यांची ५५ एकर शेती अाहे. ते स्वतः साऱ्या शेतीचे व्यवस्थापन पाहतात. खारपाणपट्ट्यात हे गाव येत असल्याने बारमाही पिके घेण्यास मर्यादा अाहेत. खरीप हाच महत्त्वाचा हंगाम असतो. परतीचा पाऊस चांगला अाला किंवा एक किंवा दोन पाणी देण्याची शाश्वत व्यवस्था असेल, तर रब्बी हंगाम साधता येऊ शकतो. यासाठी पिकांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरू लागली अाहे. काही शेतकरी पीक बदलातून उत्पन्नाचा मार्ग शोधत आहेत. गावंडेदेखील मागील दोन हंगामांपासून अोवा लागवडीकडे वळाले अाहेत. खारपाणपट्ट्यात पर्याय म्हणून रब्बीत हे चांगले पीक असल्याचा अनुभव त्यांना आला अाहे. 

अोव्याचे महत्त्व 
विदर्भातील शेतकऱ्यांची शेतीविषयक मानसिकता बदलली अाहे. पारंपरिक पिकांसोबतच उत्पन्नवाढीसाठी पर्यायी पिके घेण्याचे प्रयोग होऊ लागले आहेत. गावंडे यांनी गेली दोन वर्षे अोवा लागवड करून उत्पादन घेतले. अोव्यासोबत त्यांनी बडीशेपाचे पीकदेखील घेतले. अोव्याचे पीक मुख्यतः गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये अधिक घेतले जाते. अोव्याचा मसालावर्गीय पीक म्हणून उल्लेख होत असून, त्यात अौषधी गुणधर्म असल्याने त्याचा घरगुती वापरही अधिक अाहे. अोवा पाचक, उष्ण गुणांचा असून जठर विकार, अपचन, कफ, दमा, लहान मुलांच्या पचनाच्या विकारांवर उपयुक्त मानला जातो. 

अोव्याची शेती 
अोव्याचे पीक हे खरिपातील सोयाबीनची काढणी केल्यानंतर सहजा घेतले जाते. मागील वर्षीच्या प्रयोगात गावंडे यांनी असेच केले; परंतु या वर्षी खरिपात सुरवातीला मुगाचे पीक घेतले. मूग कमी दिवसांचे पीक असल्याने ते काढल्यानंतर अोवा पिकाचे नियोजन केले. त्यासाठी शेत उभे-अाडवे नांगरून कुळवाच्या पाळ्या दिल्या. यामुळे जमीन भुसभुशीत झाली. पेरणीपूर्वी तणनाशक वापरले. सरी पाडून घेतली. त्यानंतर तीन बाय एक फूट अंतरावर मजुरांकरवी १५ सप्टेंबरच्या सुमारास अोव्याची लावण केली. एकरी तीन किलो बियाणे वापरले. २०० रुपये प्रतिकिलो दराने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून बियाणे आणले. बियाण्याची उगवण झाल्यानंतर दोन झाडांमधील एक रोप उपटून टाकले. त्यामुळे हे अंतर तीन बाय दोन फूट असे झाले. या पद्धतीमध्ये बियाणे जास्त लागले तरी दोन झाडांमध्ये खाडा पडला नाही. संपूर्ण प्लॉट सलग होता. ओव्याचे पीक रब्बीत घेतले जाते. त्या वेळी जमिनीत अोलावा असतो. यामुळे पाण्याची फार गरज भासत नाही. गावंडे यांनी दोन वेळा पाणी व्यवस्थापन केले. अोव्यावर मावा व भुरीचा प्रकोप होतो. त्यासाठी फवारणी केली. अन्य उपाययोजना करण्याची गरज पडली नसल्याचे त्यांनी सांगितले.

आश्वासक उत्पादन 
सन २०१६-१७ च्या रब्बी हंगामात अोव्याचे एकरी १० पोती (प्रतिपोते ६० किलो) म्हणजे सहा क्विंटल उत्पादन झाले. सध्या बाजारात प्रतिक्विंटल सहा हजार रुपये दर सुरू अाहे. त्यापूर्वीच्या हंगामात गावंडे यांना एकरी ३ क्विंटल उत्पादन, तर क्विंटलला १७ ते १८ हजार रुपये दर मिळाला होता. यामुळे यंदा त्यांना अपेक्षित दराची अपेक्षा होती. अर्थात तेवढा दर यंदा न मिळाल्याने गावंडे यांनी अोवा विक्री सध्या तरी करायची नाही असेच ठरवले आहे. सद्यःस्थितीत अोवा विकायचा म्हटले, तरी सहाहजार रुपये प्रतिक्विंटल दराने ३६ हजार रुपये होतात. उत्पादन खर्च सुमारे ११ हजार वजा केल्यास २४ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकेल.    
      
खारपाणपट्ट्यातही चांगले उत्पादन 
गावंडे व त्यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांनी अाज खारपाणपट्ट्यातही पिकांचे अधिकाधिक चांगले  उत्पादन मिळवण्यात यश संपादन केले अाहे. नितीन सोयाबीनचे सरासरी १० क्विंटल, तुरीचे एकरी चार क्विंटलपर्यंत, तर कपाशीचे एकरी १५ क्विंटलपर्यंत उत्पादन घेतात. यंदा ज्या मुगानंतर अोवा घेतला त्या मुगाचे एकरी साडेतीन ते चार क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. पाचहजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सुमारे २० हजार रुपयांचे उत्पन्न तर पाच हजार रुपये खर्च आला. अोव्याला रासायनिक खतांचा वापर जवळपास केला नाही. जैविक खते तसेच फवारणीसाठी जैविक कीडनाशकांचाच वापर केला.        

अोव्याचे मार्केट  
या वर्षी नोटाबंदीनंतर अन्य पिकांप्रमाणेच अोव्याचेही दर कमी होऊन क्विंटलला ६००० रुपयांपर्यंत अाले; परंतु मागील अाठ ते दहा वर्षांचा अनुभव लक्षात घेतला तर किमान १० ते ११ हजार रुपयांपर्यंत अोव्याचा दर होता. गेल्या वर्षी हाच दर १५ ते १७ रुपयांपर्यंत होता. वऱ्हाडात शेगाव, अकोट येथे व्यापारी अोवा खरेदी करतात. राज्यात नंदुरबारलाही खरेदी केली जाते. यासोबत अांध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशा आदी बाजारपेठांंतही विक्रीचा पर्याय उपलब्ध असल्याचे शेगाव येथील एका खरेदीदाराने सांगितले.     

बडीशेपाचा प्रयोग  
यंदाच्या वर्षी प्रयोग म्हणून बडीशेप पिकाची अाठ अोळींमध्ये लागवड केली होती. पहिलेच वर्ष असल्याने तितकेसे व्यवस्थापन जुळले नाही; परंतु तरीही एक क्विंटल उत्पादन मिळाले. पुढील वर्षापासून मार्केट पाहून क्षेत्र  निवडणार असल्याचे त्यांनी  सांगितले. 

एकत्रित शेतीचे व्यवस्थापन
नितीन यांची ५५ एकर शेती तीन ठिकाणी अाहे. त्यांना दोन भाऊ असून सर्वांचे कुटुंब एकत्रच अाहे. सुरवातीला या कुटुंबाकडे २५ एकर शेती होती. वडील शिक्षक असल्याने शेतीकडे तितके लक्ष दिले जात नव्हते. साधारणतः १९९२-९३ मध्ये नितीन यांनी शेतीची सूत्रे हाती घेतली. शेतीत सातत्य ठेवले. प्रयोगशीलता जोपासली. परिणामी खरीप पिकांचे उत्पादन वाढले. शेतीचे क्षेत्र वाढवत नेले. शेती खारपाणपट्ट्यात असली तरी दोन बोअर घेतले. यामुळे अत्यंत गरजेच्या वेळी पिकाला एक ते दोन पाणी देण्याची व्यवस्था झाली. शिवाय काटेपूर्णा प्रकल्पाचे पाणीही उपलब्ध होते. शेतात एक मोठा तलावही घेतला आहे. बोअरचे पाणी त्यात घेतले जाते. तलाव भरला की सात एकरांतील सिंचनाची व्यवस्था होते. सौरपंपाची सुविधा आहे. सिंचनासाठी स्प्रिंकलरचा वापर केला जातो. 

 नितीन गावंडे, ९८८१०९४६७७, ९४२०८४०५७२