वार्षिक तिहेरी पीकपद्धतीतून कपाशीपेक्षा अधिक उत्पन्न

वार्षिक तिहेरी पीकपद्धतीतून कपाशीपेक्षा अधिक उत्पन्न

तीन एकर क्षेत्र. त्यात मेमध्ये काशीफळ, आॅक्टोबरमध्ये मका व मार्चमध्ये कलिंगड अशी वर्षात तीन पिके घेण्याचा प्रयोग धानोरा विटाळी येथील संदीप पाटील यांनी केला. अभ्यासपूर्वक केलेली पीकपद्धतीची रचना यशस्वी ठरली. दहा एकर कपाशीतून मिळणारे उत्पन्न या तिहेरी पीकपद्धतीतून केवळ तीन एकरांतून पाटील यांनी मिळवले. शेती डोळसपणे केल्यास नफ्याचे सूत्र साधता येते, हेच त्यांनी दाखवले आहे. 
 

बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात धानोरा विटाळी परिसरातील मुख्य पिके म्हणजे कपाशी, सोयाबीन, तूर अशी आहेत. गावातील संदीप पाटीलदेखील हीच पिके घ्यायचे. अलीकडील काळात शेतीत अधिक डोळसवृत्ती व अभ्यासूपणा त्यांनी वाढवला आहे, त्यातूनच नव्या प्रयोगांना चालना मिळाली आहे. मागील वर्षी त्यांनी केलेला तिहेरी पिकांचा प्रयोग निश्चितच अभ्यासण्याजोगा असाच आहे. 

तीन पिकांतील पहिले पीक : भोपळा- मे ते आॅगस्ट   

गंगाफळ (काशीफळ) नावाने अोळखल्या जाणाऱ्या भोपळ्याची शेती गेल्या अाठ- नऊ वर्षांपासून करतात. कमी खर्चात म्हणजे एकरी १० ते १२ हजार रुपयांत हे पीक चांगले पैसे देते. हा पैसा गरजेच्या काळात घरात येतो. मेमध्ये लागवड केल्यानंतर कमी कालावधीत, म्हणजे आॅगस्ट दरम्यान पीक काढणीस येते. पुढे दुसरे पीक घेता येते.

यंदा पाच एकरांत गंगाफळ व सोबतीला तूर अाहे. सध्या गंगाफळाचे वेल विस्तारत असून, लवकरच फुलोरावस्था येऊ घातली अाहे. १२ बाय ४ फूट अंतरावर लागवड असते. एकरी सुमारे ९६० वेल बसतात. एकराला वजन व आकारानुसार २५० ते ४०० ग्रॅम बियाणे वापरले जाते. 

बियाणे दरवर्षी घरचेच असते, त्यामुळे त्याचा संपूर्ण खर्च वाचतो. चांगली फळे बाजूला ठेवून त्यातून बियाणे तयार केले जाते. 
अलीकडील काळात विद्राव्य खतांचा वापर या पिकात सुरू केल्याने फळांची गुणवत्ता वाढण्यास मदत झाली आहे. 

उत्पादन
एकरी सरासरी १०० क्विंटलपासून १२५, १५० ते क्वचित २०० क्विंटलपर्यंतही मिळते. 
प्रतिवेल १० ते १५ किलोपर्यंत उत्पादन. प्रतिफळाचे वजन ५ ते १५ किलोच्या दरम्यान. 

जागेवरूनच विक्री
धानोरा हे मलकापूर- खामगाव महामार्गालगतचे गाव अाहे. अाॅगस्टच्या दरम्यान मलकापूर, नांदुरा येथील स्थानिक व्यापारी थेट संपर्क साधून जागेवरूनच खरेदी करतात. मध्य प्रदेश, गुजरातमधूनही खरेदीदार शेतात येतात. मागील हंगामात ३५० रुपये प्रतिक्विंटल दराने पाटील यांनी विक्री केली.

मिळणारे दर
सरासरी ३०० ते ५०० रु. प्रतिक्विंटल, आवक कमी असल्यास ८०० ते १००० रुपयांपर्यंत 
पूर्वी गावात १०० एकरांपर्यंत गंगाफळाची लागवड व्हायची. अाता पाणीटंचाई व अन्य समस्यांमुळे लागवड क्षेत्र २० एकरांपर्यंत खाली अाल्याचे पाटील म्हणतात. त्यांनी मात्र लागवडीत सातत्य ठेवले अाहे. 

दुसरे पीक - मका- आॅक्टोबर लागवड 
अाॅगस्टमध्ये गंगाफळांची काढणी झाल्यानंतर मशागत करून जमिनीला विश्रांती दिली, त्यानंतर अाॅक्टोबरमध्ये मका घेतला. त्याचे एकरी ४० क्विंटल उत्पादन झाले. क्विंटलला १३५० रुपये दराने विक्री केली. 

तिसरे पीक - कलिंगड 
मका काढणीनंतर यंदाच्या सात मार्चला (२०१७) झिगझॅग पद्धतीने व मल्चिंगवर कलिंगड लावले.
सुमारे ५७ दिवसांत काढणी केली. एकरी १५० क्विंटल उत्पादन मिळाले. सरासरी दर किलोला चार रुपये मिळाला.

प्रयोगाचा निष्कर्ष
दहा एकरांत कपाशीचे एकरी १५ क्विंटलप्रमाणे १५० क्विंटल उत्पादन मिळाले. उत्पादन खर्च वजा जाऊन सुमारे साडेतीन लाख रुपये उत्पन्न हाती राहिले. त्याचवेळी भोपळा, मका व कलिंगड या तिहेरी पीकपद्धतीत खर्च वजा जाऊन तेवढेच उत्पन्न मिळाले. शिवाय, कमी कालावधीची तीनही पिके असल्याने ताजे उत्पन्न प्रत्येक हंगामात हाती आले. शिवाय, काही पिकांना बांधावरच मार्केट मिळाले. 

पट्टा पद्धतीने मका 
मागील वर्षी पट्टा पद्धतीने मक्याची चार बाय चार फूट अंतरावर ठिबक पद्धतीने लागवड केली. ठिबक नळीला असलेल्या छिद्राच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी चार दाणे पेरले. एकरी २१ ते २२ हजार रोपे होती. झाडांची संख्या वाढली. एकरी ४० क्विंटलपर्यंत उत्पादन झाले. एकरात सुमारे ५४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. 

पारंपरिक पिकांचीही चांगली उत्पादकता 
धानोरा भागात कपाशी, सोयाबीन हीच मुख्य पिके अाहेत. बीटी कपाशीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल अधिक असतो. पाटील यांना सोयाबीनचे एकरी सात ते अाठ क्विंटल, तर तुरीचेही एवढेच उत्पादन मिळते. ते स्वतः सर्व शेतीचे व्यवस्थापन सांभाळत असल्याने कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळेल, यादृष्टीने पीकपद्धतीची रचना आखतात. मार्केटची संधी व कल अोळखून पिके घेण्याची गरज ते व्यक्त करतात. 

पाण्याचे चोख व्यवस्थापन
अाज पाटील यांची संपूर्ण शेती हंगामी अोलिताची झाली अाहे. पाणी अत्यंत कमी असल्याने प्रत्येक थेंबाचा सुयोग्य वापर होण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचन केले आहे. विहीर व बोअरवेलचा स्रोत आहे. गेल्या हंगामात बोअर अर्धा तासही सलग चालत नव्हती. त्यामुळे जितके मिळेल तेवढे पाणी जुन्या विहिरीत टाकले. हे पाणीही विहिरीत झिरपत असल्याचे लक्षात अाल्याने त्यात शेततळ्यात वापरला जाणारा प्लॅस्टिक पेपर टाकला. त्यामुळे उन्हाळ्यात गंगाफळ व पूर्वहंगामी कपाशीला सिंचन करणे शक्य झाले.    

- संदीप पाटील, ९४०५४५७८५८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com