मृग बहरातील डाळिंबावर तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव

अभिजित डाके
रविवार, 16 जुलै 2017

सांगली - अपुरा पाऊस, बदलते वातावरण याचा परिणाम डाळिंब पिकावर झाला आहे. यामुळे अर्ली मृग बहारातील डाळिंब पीक संकटात सापडले आहे. पिकावर तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अनेक भागातील शेतकरी यामुळे मृग बहारातील डाळिंब सोडून देऊ लागले आहेत. याचा परिणाम उत्पादनावरही होण्याची शक्यता आहे.

सांगली - अपुरा पाऊस, बदलते वातावरण याचा परिणाम डाळिंब पिकावर झाला आहे. यामुळे अर्ली मृग बहारातील डाळिंब पीक संकटात सापडले आहे. पिकावर तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अनेक भागातील शेतकरी यामुळे मृग बहारातील डाळिंब सोडून देऊ लागले आहेत. याचा परिणाम उत्पादनावरही होण्याची शक्यता आहे.

राज्यात सर्वसाधारणपणे ३५ ते ४० टक्के मृग बहारातील डाळिंब पीक घेतले जाते. गेल्या वर्षी जोरदार पावसाने मृग बहारात या पिकाची फूळगळ मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. गेल्या वर्षी आर्थिक नुकसान झाले, हे डोळ्यासमोर ठेवून सुरवातीच्या काळात चांगला पाऊस झाल्याने यंदाच्या हंगामात अर्ली मृग बहार शेतकऱ्यांनी धरण्यास प्रारंभ केला. डाळिंब बागा चांगल्या बहराला आल्या; मात्र सातत्याने बदलते वातावरण डाळिंब पिकावर घाला घालू लागले आहे. तेलकट डागासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करू लागला आहेत. डाळिंबाला तुलनेने कमी पाणी लागत असले तरी तेवढे पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांकडे पाणीच उपलब्ध नाही. 

शेतकरी अडचणीत
पावसाचे रिमझिम, कधी ऊनं तर कधी ढगाळ वातावरण यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम डाळिंब पिकावर झाला असून, तेलकट रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झाली आहे. पुणे, सोलापूर जिल्ह्यांसह अनेक भागात तेलगट रोगाने डाळिंबावर आक्रमण केले आहे.   

पाणीटंचाई कायम
गेल्या वर्षी अतिपावसाने मृग बहारातील डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर यंदा कमी पावसामुळे डाळिंब बागाला पुरेसे पाणी मिळेनासे झाले आहे. उपलब्ध पाण्यावर कशीबशी डाळिंबाची पिकं जगवण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरूच आहे; मात्र भूगर्भातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्याने विहिरी व कुपनलिकांच्या पाण्याच्या पातळीतही घट झाली आहे. परिणामी डाळिंब बागेला पाणीच उपलब्ध होत नाही. यामुळे मृग बहारातील धरलेले डाळिंब अर्धवट स्थितीत सोडण्याची वेळ आली आहे.

दराची शाश्वती नाहीच
यंदा उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डाळिंबाचे दर वाढतील अशी आशा आहे; मात्र वस्तू व सेवा कर यामुळे डाळिंब पिकाला फटका बसणार असल्याचे शहाजी जाचक यांनी सांगितले. यामुळे डाळिंबाचे दर कसे राहतील याची निश्चिती नाही. परिणामी मृग बहारातील डाळिंब पिकावर याचे मोठे संकट येण्याची शक्यता आहे. यामुळे दर अपेक्षित मिळाले नाही, तर खर्च निघणे मुश्कील आहे.
 

अगोदरच पाऊस कमी, सातत्याने वातावरणात बदल यामुळे डाळिंबावर तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे डाळिंब उत्पादक चिंताग्रस्त झाला आहे. त्यातच वस्तू व सेवा करामुळे बाजारपेठेत डाळिंबाला मिळणारे दर कसे असतील याबाबत शेतकरी संभ्रमावस्थेत आहे.
- शहाजी जाचक, अध्यक्ष, महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघ, पुणे.

सध्या तरी डाळिंबाची सेटिंग चांगली झाली आहे. पाण्याची गरज असताना टंचाईमुळे अडचणी निर्माण होत आहेत. मृग बहारातील डाळिंबाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
- भरत मंत्री, डाळिंब उत्पादक, राणी उचेगाव, जालना.