शास्त्र, तंत्राचा मेळ घालून निर्यातक्षम केळी उत्पादन

विकास जाधव
मंगळवार, 18 जुलै 2017

उसाच्या पट्ट्यात केवळ उसावरच अवलंबून न राहता पार्ले (जि. सातारा) येथील उच्चशिक्षित राहुल अशोकराव पाटील या तरुण शेतकऱ्याने केळी पिकातून फेरपालट साधली. निर्यातदार कंपनीसोबत करार करून निर्यातक्षम व एकरी अधिक उत्पादनही घेतले. जोडीला ‘ॲटोमेशन’ तंत्रज्ञानाचा वापर करत आपल्या प्रयोगशीलतेचे दर्शन घडवले. अभ्यासातून विकसित झालेली त्यांची शेती निश्चित आदर्शवत आहे.  
 

उसाच्या पट्ट्यात केवळ उसावरच अवलंबून न राहता पार्ले (जि. सातारा) येथील उच्चशिक्षित राहुल अशोकराव पाटील या तरुण शेतकऱ्याने केळी पिकातून फेरपालट साधली. निर्यातदार कंपनीसोबत करार करून निर्यातक्षम व एकरी अधिक उत्पादनही घेतले. जोडीला ‘ॲटोमेशन’ तंत्रज्ञानाचा वापर करत आपल्या प्रयोगशीलतेचे दर्शन घडवले. अभ्यासातून विकसित झालेली त्यांची शेती निश्चित आदर्शवत आहे.  
 

सातारा जिल्ह्याची अोळख ऊस, हळद, आले व भाजीपाला या पिकांसाठी मुख्यत्वे आहे. सातारा तालुक्यातील पार्ले सुमारे २१०० लोकसंख्येचे गाव. येथील तरुण शेतकरी राहुल पाटील सध्या घरची ११ एकर शेती जबाबदारीने कसतात. राहुल एमएससी ॲग्रिकल्चर आहेत. त्यांचे अाजोबा यशवंत बाबूराव पाटील कराड मतदारसंघाचे १९६७ मध्ये आमदार होते. वडील अशोकराव सह्याद्री साखर कारखान्याचे चेअरमन होते. आज ते संचालक आहेत. आई नीलिमा यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या माजी महिला बाल कल्याण सभापती म्हणून काम पाहिले. 

शेतीकडेच कल 
वडिलांच्या सानिध्यात राहुल शेतीचा अनुभव घेत होते. उच्चशिक्षणामुळे नोकरी मिळाली असती; मात्र शेती हाच आवडीचा विषय होता. वडिलांनीही मुलाचा उत्साह पाहून शेतीची जबाबदारी सोपविली. शिक्षणाची पार्श्वभूमी असल्याने नवे प्रयोग, आधुनिक तंत्राकडे राहुल यांचा कल राहिला. 

बदलाची पायरी 
पूर्वी ऊस हेच त्यांचे मुख्य पीक होते. काळाच्या बदलानुसार मार्केट डिमांड लक्षात घेत पिकांत व त्या अनुषंगाने शेतीत बदल करण्यास सुरवात केली. फेरपालटही गरजेची होती. 

अभ्यासातून आणि कासेगाव (जि. सांगली) येथील प्रगतिशील शेतकरी मोहनराव पाटील यांच्याशी केलेल्या चर्चेतून केळीचा पर्याय पुढे आला. त्याचा शास्त्रीय अभ्यास व त्या दृष्टीने नियोजन सुरू केले. 
    
राहुल यांची आजची शेती

ऊस- ५० गुंठे,
साधलेला बदल- केळी- साधारण २०१४ पासून- 
त्या वेळचे क्षेत्र- चार एकर, सध्या साडेसहा एकर  

निर्यातक्षम केळीचा प्रयोग

सुरवातीचा होमवर्क
सुरवातीपासूनच निर्यातक्षम केळी करण्याचा निश्चय केला. अनेक केळी उत्पादकांची शेती पाहिली. त्यांना येणाऱ्या अडचणी, मार्केट आदींची माहिती घेतली होती. 
उतीसंवर्धित तसेच ग्रॅंड नैन कंपनीची रोपे लावली. 

व्यवस्थापन
सन २०१४ च्या दरम्यान साडेसात बाय पाच फुटावर होती लागवड. अलीकडे हे अंतर साडेसहा बाय पाच फूट केले. त्याचे कारण म्हणजे दोन अोळींतील अधिकच्या अंतरामुळे केळीचा दांडा अधिक तापमानात करपू लागायचा.
केळ्यांवर कसलेही डाग वा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी स्कर्टिंग बॅगेचा वापर 
जमिनीचा पोत चांगला राहावा तसेच उत्पादन वाढ होण्यासाठी दरवर्षी शेणखताचा वापर. जीवामृत तयार करून आळवणी. 
फुटवे वेळेत कापणे महत्त्वाचे. उदा. कोके पडेपर्यंत प्रत्येक महिन्याला फुटवे काढणे 
तणनाशक न वापरता भांगलणीचा पर्याय 
घडांच्या वजनाने झाड पडू नये यासाठी पट्ट्याने सर्व झाडांची एकमेकांस बांधणी 
वाऱ्यामुळे केळीची हानी होऊ नये, यासाठी चारही बाजूने शेवरीचा ताटवा
निर्यातक्षम केळी एकसारखी असावी, यासाठी किमान आठ ते कमाल १३ फण्या ठेवल्या जातात.
प्रतवारी करून सात किलो व १३ किलोचे पॅकिंग

ठिबक अॅटोमेशन 
सर्व शेती राहुल स्वतःच पाहत असल्याने सर्व क्षेत्रात स्वयंचलित ठिबक (ड्रीप अॅटोमेशन) केले आहे. मोबाईलवर त्याचे विशिष्ट ॲप असल्याने देशाच्या किंवा अगदी परदेशात जरी तुम्ही असाल तरी तेथून ‘ॲप आॅपरेट’ करून विशिष्ट क्षेत्रात पाणी व खते शेताला मोजूनमापून देता येतात. केळीच्या बागेत एचटीपी पंपाने फवारणी करण्यासाठी ‘कॉक’चीदेखील व्यवस्था केली आहे. शेतातील खोलीत कीडनाशके मिसळली जातात व एचटीपीच्या सहाय्याने फवारणी केली जाते. यामुळे मजूर व वेळेची बचत होऊन कामही उत्तम दर्जाचे होत असल्याचे राहुल यांनी सांगितले.  

उत्पादन
गेल्या चार वर्षांत एकरी ३० टनांपासून ते ४३, ४५ टनांपर्यंत पोचणे राहुल यांना शक्य झाले आहे. त्यासाठी त्यांना पूर्वीच्या लागवड अंतरातील शेतीत एकरी दीड लाख रुपये, तर आता पावणेदोन लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. 

करार शेतीचा फायदा
आमच्या भागात दोन ते तीन कंपन्या केळी निर्यातीच्या व्यवसायात आहेत. सध्या कोल्हापूर भागातील एका कंपनीसोबत करार केल्याचे राहुल म्हणाले. ही कंपनी आखाती देशांत केळी पाठवते. किलोला ८ रुपये या हमीभावाने केळी खरेदी करते; मात्र त्या वर्षी मार्केटमधील दर यापुढे गेल्यास त्या वाढीव दराचा फायदाही शेतकऱ्याला मिळतो, असे राहुल म्हणाले. एकेवर्षी मार्केटमध्ये दराची मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती; मात्र करार शेतीचा फायदा होऊन नऊ रुपये दर मिळाला. एकेवेळी खोडव्याचे एकरी ३५ टन उत्पादन मिळून ११ रुपये दराचा फायदाही घेता आला. 

यशातील भागीदार 
कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांनी विश्वास दाखवल्यास हुरूप वाढतो. मग शेती अधिक चांगली होते या विचारावर राहुल यांचा विश्वास आहे. प्रयोगशील शेतकरी मोहनराव पाटील, धोंडीराम वीर यांची मोठी मदत होते. राहुल यांनी पार्ले गावाचे सरपंचपद भूषविले असून, सध्या ते विद्यमान सदस्य आहेत. अॅग्रोवनतर्फे अायोजित सरपंच महापरिषदेसाठी त्यांची निवड झाली होती. त्याचा उपयोग त्यांनी गावासाठी केला. अॅग्रोवनचे ते नियमित वाचक असून, त्यातील माहितीचा शेतीत उपयोग करतात.  
- राहुल पाटील, ८८०५८६८५०८