जातिवंत बैल, गावरान म्हशींसाठी चला राजुरा बाजारला

1) विविध जातींच्या म्हशी बाजारात पाहण्यास मिळतात. 2) राजुरा बाजार, जि. अमरावती - येथील आठवडे बाजारात विक्रीसाठी आलेली जनावरे.
1) विविध जातींच्या म्हशी बाजारात पाहण्यास मिळतात. 2) राजुरा बाजार, जि. अमरावती - येथील आठवडे बाजारात विक्रीसाठी आलेली जनावरे.

गावरान जनावरे, दुधाळ म्हशी तसेच शेळ्यांसाठी म्हणून राजुरा बाजार (ता. वरुड, जि. अमरावती) येथील जनावरांच्या आठवडे बाजाराने विदर्भात वेगळीच ओळख निर्माण केली आहे. ब्रिटिश काळापासून भरणाऱ्या या बाजाराचे अस्तित्व कायम राखण्यात वरुड बाजार समिती प्रशासनाला यश आले अाहे. मध्य प्रदेशातील सीमेजवळच हे ठिकाण असल्याने विदर्भातील भागांबरोबरच या राज्यातील खरेदीदारांची गर्दीही येथे पाहण्यास मिळते. 

ब्रिटिशांच्या काळात अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण होते. साहजिकच ब्रिटिशांचा वावर या जिल्ह्यात अधिक होता. त्या वेळी आपल्या सोयीनुसार व्यापारी पेठांचे जाळे त्यांनी विणले. वरुड तालुक्‍यातील राजुराचा बाजारदेखील ब्रिटिशांनीच भरविण्यास सुरवात केल्याचे बाजार समितीतील अधिकारी सांगतात. पूर्वीच्या जागेवरच आजचा बाजार दर गुरुवारी भरतो. या ठिकाणी जनावरे बांधण्यासाठी लोखंडी गर्डरदेखील ब्रिटिशकालीन आहेत. अशाप्रकारचा एैतिहासिक वारसा या बाजाराने जपला आहे. सहा एकरांवर भरणाऱ्या या बाजाराच्या जागेची मालकी जिल्हा परिषदेकडे आहे. 

पुरेशा सुविधांची वानवा 
जनावरांच्या व माणसांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वगळता अन्य कोणत्याच सुविधा या ठिकाणी आजमितीला तरी उपलब्ध नाहीत. पाण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने या ठिकाणी विहिरीवर पंप बसवला आहे. परिसरातील घनदाट वृक्षांमुळे सावली राहते. जागेची समस्या असल्याने म्हशी व दुधाळ गाई, बैल यांचा बाजार रस्त्याच्या एका बाजूला तर शेळी बाजार दुसऱ्या भागात भरतो. बाजारात येणाऱ्या गावरान शेळ्यांची संख्याही मोठी राहते. शेळ्यांचे व्यवहारदेखील झाडांच्या आडोशातच होतात. अर्थात येथेही सुविधांचे फार मोठे हाल पाहण्यास मिळतात. परिसराला आवार भिंत नसल्याने पाच रुपयांच्या प्रवेश शुल्कावर बाजार समितीला पाणी सोडावे लागते. 

जातिवंत बैल
राजुराच्या बाजारात गावरान जनावरांची रेलचेल राहते. शेतीकामी लागणारे जातिवंत बैल या ठिकाणी उपलब्ध होतात. त्यासोबतच गावरान, मुऱ्हा म्हशी येथे मिळतात असे बाजार समितीचे लिपीक विष्णू बापुराव माकोडे यांनी सांगितले. वगार पाच हजार रुपयांना, म्हैस सुमारे ५० हजार रुपये तर गावरान म्हैस ३० हजार रुपयांपासून येथे मिळते. दुधाळ म्हशींसाठी येणाऱ्या खरेदीदारांची येथे आठवड्याला गर्दी राहते. त्यामुळे बाजारात उलाढालही चांगली होते. जातिवंत बैलजोडी साधारण ६० ते ७० हजार रुपयांना मिळते. परंतु, बाजारात बैलांची आवक होण्याचा हंगाम दिवाळीनंतर राहतो. या काळात चांगल्या प्रतीचे बैल एक लाख रुपयांच्या पुढेच विकले जातात. दिवाळीपासून या बाजारात येणारे बैल पुढे जुलैपर्यंत विक्रीसाठी उपलबध राहतात. त्यापुढील दोन ते तीन महिने काळात मग चांगल्या प्रतीचे बैल मिळणे कठीण होते. 

जनावरांची गुणवत्ता
राजूर बाजारचा परिसर मध्य प्रदेशच्या सीमेलगत आहे. त्यामुळे मुलताई, पांढूर्णा येथील खरेदीदार व जनावरे विकणारे यांची गर्दी बाजारात दिसून येते. त्यासोबतच वरुड, आर्वी, आष्टी, अकोट (अकोला), मोर्शी,  चांदूरबाजार, तिवसा या भागातील शेतकरी, खरेदीदार यांची देखील या बाजारात कायम उपस्थिती असते. बैल खरेदीपूर्वी त्यांची चाल, जोश, चपळपणा पडताळला जातो. त्यासाठी बैलांना पळविले जाते. जनावरांची गुणवत्ता जोखल्यावरच व्यवहार ठरतात. जर्सी गायींची उपलब्धता हेदेखील या बाजाराचे वैशिष्टय आहे. 

गोहत्याबंदी कायद्याचा परिणाम जनावरांच्या बाजारावर अलीकडील काळात झाल्याचे जाणवत आहे. बाजारात येणाऱ्या जनावरांची संख्या त्यामुळेच घटल्याचे वाटते. बाजारात आमच्यासाठी मुख्य सुविधादेखील समाधानकारक नाहीत. पिण्याच्या शुद्ध पाण्याची गरज आहे.

जनावरांसाठीदेखील पिण्याच्या पाण्याचा एकच हौद आहे. अन्यत्र असलेल्या बाजारांप्रमाणे इथेही विविध सुविधांची उपलब्धता झाली तर येथील आवक, उलाढाल यातही अजून फरक दिसेल. 
- विश्‍वेश्‍वर ठाकरे, ९५०३६८२४९९ शेतकरी व व्यावसायिक, नांदगाव, ता. वरुड, जि. अमरावती

आश्वासक उलाढाल
बाजार समिती प्रशासनाकडून शेळी व अन्य जनावरांसाठी बाजारात शुल्क वसुलीकरिता दोघा व्यक्तींची नियुक्‍ती करण्यात आली आहे. दोन रुपये साक्षांकन शुल्क तसेच शेकडा एक रुपया पाच पैसे सेस या व्यवहारात आकारला जातो. आठवड्याला सुमारे १४५ म्हशींची आवक बाजारात दिसून येते. खरीप हंगामात बाजाराची उलाढाल तशी कमीच म्हणजे अवघी २० हजार रुपयांपर्यंत होते. परंतु, हंगामात हीच उलाढाल ६० ते ७० हजार रुपयांचा आकडा पार करते. बाजारालगत जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची शाखा व ‘ एटीएम’ सुविधा केंद्र असल्याने आर्थिक व्यवहार सुलभ होण्यास मदत होते. 

जागेचे हस्तांतरण रखडले
सन १९९५-९६ व २०००-०१ या कालखंडात जिल्हा परिषदेकडून बाजाराच्या जागेचा ताबा मिळावा यासाठी प्रयत्न झाले. या पाठपुराव्याच्या परिणामी जागा हस्तांतरणाला मंजुरीदेखील मिळाली. बाजार समिती प्रशासनाने जागेसाठी ६० लाख रुपये इतक्‍या रकमेचा भरणा नियमानुसार केला. परंतु, २००१  नंतर संचालक मंडळ बदलले. त्यानंतर झालेल्या घडामोडीत जागेच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव रखडल्याचे सांगितले जाते.  
- विष्णू माकोडे, ९४२२८९४६३९, राजुरा बाजार, ता. वरुड, जि. अमरावती

ठळक बाबी 
बाजार दिवस - दर गुरुवारी
जनावरांच्या जाती -  म्हशी- मुऱ्हा, नागपुरी, गायी- गावरान, संकरित, गवळाऊ, शेळ्या- बेरारी व संकरित.
दर - बेरारी शेळी २००० ते ४००० रुपयांपर्यंत  
मुऱ्हा म्हैस - ५५ हजार रुपयांपुढे, 
गावरान (नागपुरी म्हैस) - २५ ते ३० हजार रुपयांपुढे
जातिवंत बैलजोडी - एक लाख रुपये व त्यापेक्षा अधिक 
बाजाराचा हंगाम - मुख्यतः दिवाळीपासून सुरू 
बाजारातील व्यापारी व ग्राहक - महाराष्ट्र व लगतच्या मध्य प्रदेशातील 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com