कपाशीवरील फूलकीड, कोळीकिडीचे नियंत्रण

कपाशीवरील फूलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे आक्रसलेली, वाळलेली पाने.
कपाशीवरील फूलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे आक्रसलेली, वाळलेली पाने.

फूलकिडे -
आर्थिक नुकसान संकेत पातळी - सरासरी १० फूलकिडे प्रतिपान. 

पोषक घटक - ढगाळ वातावरण (३.५ ते ५.५ तास सूर्यप्रकाश व ५७ ते ९३ टक्के आर्द्रता), रात्रीच्या तापमानात वाढ (२३ ते २४ अंश से.), रात्र व दिवसाच्या आर्द्रतेमध्ये वाढ हे घटक कारणीभूत आहेत.

नियंत्रणाचे उपाय -
     मृद परीक्षणाच्या आधारावर खत मात्रा द्यावी. अतिरिक्त नत्र देणे टाळावे.
      वेळेवर आंतरमशागत करून पीक तणविरहित ठेवावे. बांधावरील पर्यायी खाद्य वनस्पती वेळोवेळी नष्ट कराव्यात.
     जमिनीत ओलावा असताना फोरेट (१० टक्के दाणेदार) १० किलो प्रतिहेक्‍टर याप्रमाणे द्यावे.
    आर्थिक नुकसान संकेत पातळीपेक्षा फूलकिड्यांच्या संख्या अधिक झाल्यास, 
फवारणी (प्रतिलिटर पाणी)
बुप्रोफेझीन (२५ टक्के एससी) १ मिली किंवा 
डायफेन्थुरॉन (५० टक्के पाण्यात विरघळणारी          भुकटी) ०.६ ग्रॅम किंवा               
फिप्रोनील (५ टक्के एससी) १.५ ते २ मिली   किंवा 
फ्लोनीकॅमिड (५० टक्के दाणेदार) ०.१ ग्रॅम.

ड्रेंचिंग (प्रतिलिटर पाणी)
क्‍लोथीयानिडीन (५० टक्के पाण्यात विरघळणारे दाणेदार) ०.४ ते ०.५ ग्रॅम. 

धुरळणी (प्रमाण प्रतिहेक्टरी) (बाजारात उपलब्ध असल्यास)
    मिथील पॅराथीऑन (२ टक्के भुकटी) १५ ते २५ किलो.
    क्विनॉलफॉस (१.५ टक्के पावडर) २० ते ३० किलो.- पाती धरण्याच्या वेळेस. 

टीप - फवारणीचा निर्णय घेण्यापूर्वी शेतामध्ये या किडीवर जगणाऱ्या परभक्षी किटकांची संख्या लक्षात घ्यावी. लेडी बर्ड बिटल, सिरफीड माशी, क्रायसोपा यांसारखे मित्रकीटक सक्रिय असल्यास फवारणी टाळणे योग्य राहील.

फूलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची कारणे-
बीटी कपाशी संकरित बियाणांसाठी इमिडाक्‍लोप्रीड किंवा थायामेथोक्‍झाम (७० 
टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी) यांची 
बीजप्रक्रिया केलेली असते. त्यामुळे सुरवातीच्या 
१ ते १.५ महिन्यांपर्यंत कपाशी पिकाला संरक्षण मिळते. मात्र, रसशोषक किडींसाठी प्रभावी असलेल्या याच वर्गातील कीटकनाशकांचा वापर फवारणीसाठीही मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याविषयी प्रतिकारकता विकसित झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी रसशोषक किडींचे अपेक्षित नियंत्रण मिळत नाही. त्याचप्रमाणे या तंबाकूवर्गीय कीटकनाशकांमध्ये वाढ संप्रेरक गुणधर्म असल्यामुळे पिकाची वाढ जोमदार राहते. इमिडाक्‍लोप्रीडच्या एका पाठोपाठ एकापेक्षा जास्त फवारण्या कपाशी पिकावर केल्यास फूलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे संशोधनात आढळले आहे.

कोळी नियंत्रण
कोरडवाहू कपाशीला पाण्याचा ताण बसत असलेल्या ठिकाणी कोळीकिडीसाठी पोषक वातावरण दिसत आहे. पाण्याच्या ताण स्थितीमध्येही पाने मलूल, निस्तेज व पिवळसर रंगाची होतात. अशीच लक्षणे कोळी किडीच्या प्रादुर्भावामुळे दिसत असल्याने गोंधळ उडू शकतो. त्यासाठी नियमित सर्वेक्षण करावे.

लक्षणे -
या किडीच्या प्रादुर्भावामुळे पाने वरच्या बाजूला आक्रसलेली दिसतात. हिरव्या पानावर टाचणीच्या टोकासारखे पिवळसर पांढुरके ठिपके दिसतात. असे असंख्य ठिपके नंतर एकमेकांत मिसळतात. पाने पिवळसर दिसतात. पिवळ्या पानांचे निरीक्षण केल्यास पानाच्या खाली लाल कोळीचे सूक्ष्म जाळे दिसतात. काही पानांच्या मुख्य शिरेभोवती हलके तपकिरी चट्टे किंवा करपल्यासारखे अनियमित ठिपके दिसतात. अधिक प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये संपूर्ण पाने पिवळी पडून, आकसून गळतात. पूर्ण झाड पर्णहीन होते.

ओळख -
    दोन ठिपक्‍यांचे कोळी ः आकाराने सूक्ष्म (०.३ ते ०४ मि.मी.) असल्याने भिंगाच्या साह्याने पाहावे. हिरवट पिवळा ते केशरी रंगाचे, पाठीवर दोन्ही बाजूने दोन काळे ठिपके दिसतात. नुकत्याच अंड्यातून निघालेल्या किडीला सहा पाय, प्रौढ व पिलांना आठ पाय असतात. हा कोळी सोयाबीन, भेंडी, भाजवर्गीय पिके, कडधान्ये, तेलबियावरसुद्धा आढळून येतो.

    लाल कोळी - लाल रंगाचे कोळी सूक्ष्म असून ते जाळे विणतात. पिले हिरवट रंगाची असून, शरीरावर गर्द ठिपके असतात. ते प्रामुख्याने पानाच्या खालील बाजूने उपजीविका करतात. भाजीपाला पिके व शोभेची झाडे यावर या किडीचा प्रादुर्भाव जास्त असतो.

    पिवळे कोळी - लाल कोळीपेक्षा सूक्ष्म, पिवळसर रंगावर पांढुरक्‍या रेषा असतात. हे कोळी जाळे विणत नाहीत. यांची वाढ ४ ते ५ दिवसांत पूर्ण होते. (२२.५ अंश सेल्सिअस ते २७ अंश सेल्सिअस). हा कोळी पांढऱ्या माशीच्या पायाला चिकटून इतरत्र पसरतो. नवीन व कोवळ्या पानावर अधिक प्रादुर्भाव असतो. 

एकीकृत व्यवस्थापन
    वेळेवर आंतरमशागत करून पीक तणविरहित ठेवावे; तसेच बांधावरील अंबाडी, हॉलीहॉक, रानभेंडी यांसारख्या पर्यायी खाद्य तणांचा नाश करावा. 
    अतिरिक्त नत्र खताचा वापर टाळावा. 
    वेळोवेळी प्रादुर्भावग्रस्त पाने जमा करून किडींसहित नष्ट करावी.
    रसशोषक किडीवर उपजीविका करणारे नैसर्गिक कीटकांची (उदा. सीरफीड माशी, कातीण, ढालकिडे, क्रायसोपा) शेतात पुरेशी संख्या असल्यास रासायनिक कोळीनाशकांचा वापर टाळावा.
    फवारणी 
डायकोफॉल (१८.५ टक्के) २.७ लिटर               प्रतिहेक्टर वापरावे. किंवा 
स्पायरोमेसीफेन (२२.९ टक्के) १.२                मि.ली. प्रतिलिटर.

टीप - रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी शिफारशीत कीडनाशकांचा वापर करावा. बहुआयामी (ब्रॉडस्पेक्‍ट्रम) कीटकनाशकांचा अवास्तव वापर व एकापेक्षा जास्त किटकनाशकांचे फवारणीसाठी मिश्रण केल्यास या किडींचा प्रादुर्भाव वाढतो.

- डॉ. ए. व्ही. कोल्हे - ९९२२९२२२९४ (कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com