स्वस्त, सुटसुटीत शुगरकेन हार्वेस्टर

स्वस्त, सुटसुटीत शुगरकेन हार्वेस्टर

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने तयार केले मॉडेल

अकलूज (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील अक्षय नितीन गावसाने (वय २२) या अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने ऊस कापणीचे काम सोपे करणारा शुगरकेन हार्वेस्टर तयार केला आहे. आर्थिक अडचणीमुळे संपूर्ण आराखडा प्रत्यक्षात आलेला नसला तरी सध्या वापरात असलेल्या 
हार्वेस्टरच्या तुलनेमध्ये स्वस्त आणि वाहतुकीसाठी सोपा असा हा हार्वेस्टर ठरू शकेल. 

 

ए. स. बी. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाला शिकत असलेल्या अक्षय नितीन गावसाने याला यंत्र आणि तंत्रज्ञानामध्ये मोठा रस आहे. त्याला कोणतीही समस्या दिसली, की त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू करतो. त्याच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे त्याची तीन पेटंट रजिस्टर असून, आणखी दोन पेटंट फाइल रजिस्ट्रेशनसाठी प्रलंबित आहेत. 

अशी सुचली कल्पना 
एकदा एका शेतामध्ये ऊस कापणीचे प्रचंड मोठे यंत्र कापणी करत असल्याचे अक्षय याने पाहिले. ऊस कापण्यासाठी एवढ्या मोठ्या यंत्राची गरज खरोखर आहे का, असा प्रश्न त्याला पडला. हेच काम वेगळ्या पद्धतीने अत्यंत सुटसुटीत, सोपे आणि दुप्पट वेगाने होऊ शकते, असे त्याला वाटले. आपल्या विचारांचा आराखडा त्याने कागदावर मांडला. 

कागदावर आरेखन तयार असले तरी यंत्र प्रत्यक्षामध्ये उतरवण्यासाठी सुमारे १० ते १५ लाख रुपये आवश्यक होते. सामान्य मध्यमवर्गीय घरातील असल्याने एवढी रक्कम उभी करणे अवघड होते, त्यामुळे या संपूर्ण आराखड्यापैकी केवळ ऊस कापण्याची प्रक्रिया करण्यासाठी यंत्र तयार करण्याचा निर्णय घेतला. या रकमेसाठीही शिवशंकर बंडगर व अमोल ओव्हाळ यांनी मोठी मदत केल्याचे अक्षय याने सांगितले. 

स्थानिक फॅब्रिकेटरच्या साह्याने यंत्र तयार केले, त्याची चाचणी माळीनगर येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये घेतली. यंत्रामध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता समोर आली. त्यानुसार आराखड्यामध्ये सुधारणा केल्या. पंढरपूर येथील हनुमंत बनसोडे यांच्याकडून यंत्र तयार करून घेतले. त्यासाठी तब्ब्ल ४  महिने पंढरपुरातच नातेवाइकांकडे मुक्काम ठोकला. पुन्हा चाचणी घेतली असता अनेक गोष्टी सुरळीत झाल्या असल्या, तरी ऊस कापणीचा कटर आणि ऊस आत घेण्याच्या स्पॉइलरमध्ये बदल करावा लागणार होता. 

हे प्रारूप अकलूजला घरी आणून, त्यात अपेक्षित बदल केले. यात माझ्या अनेक मित्रांची मदत झाली. यात आमचे सर्व पैसे खर्च झाले. 

आता चाचण्या करण्यासाठी शेतातील उभ्या उसाची गरज होती. स्वतःची अजिबात शेती नसल्याने अडचण उभी राहिली. या वेळी सराटी (ता. इंदापूर) गावातील मोहन कोकाटे यांनी पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असूनही मोठ्या मनाने परवानगी दिली. 

अक्षय याने शुगरकेन हार्वेस्टरसाठी २०१४ मध्ये पेटंट रजिस्ट्रेशन केले आहे.

शेतीचा अजिबात अनुभव नसल्याने औद्योगिक क्षेत्रातल्या अनेकांनी माझ्या या प्रारूप स्वरूपातील यंत्राची खिल्ली उडवली. कशाला पैसे वाया घालवतोस, असे खच्चीकरण करणारे सल्लेही दिले. मात्र, कुटुंबातील सदस्यांसह मित्र परिवार आणि अनेकजणांनी या कामात मदत केली, प्रोत्साहन दिले. अद्यापही संपूर्ण यंत्र तयार झालेले नसले तरी प्रचंड आत्मविश्वास मिळाला आहे. 
- अक्षय गावसाने, ९१५८४४६१४४
 

शुगर केन हार्वेस्टरची प्रमुख वैशिष्ट्ये 

हे यंत्र ५० ते ६० एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरवर चालते.
उसाच्या तीन फूटपासून ते आठ फुटांपर्यंतच्या पट्टा पद्धतीमध्ये यशस्वीरीत्या काम करते.
एकाच वेळी मशिनच्या दोन्ही बाजूंचा ऊस झोपवून, त्याचे तुकडे करून सरळ ट्रॉलीमध्ये टाकले जातात.
यामध्ये उसाचे वाढे बारीक तुकडे करून शेतातच टाकले जातात, किंवा शेतकऱ्याच्या आवश्यकतेनुसार वेगळे साठवता येतात. 
यात खाली पडलेला किंवा आडवा झालेला ऊस व्यवस्थित मशिनमध्ये घेतला जातो.
एखाद्या शेतकऱ्याला अखंड ऊस हवा असल्यास घेता येतो. मात्र, त्यासाठी एक वेगळ्या ट्रॉलीची गरज पडते.
या यंत्राचे वजन रिकाम्या ट्रॉलीच्या वजनापेक्षा कमी असून, त्याला चाके नाहीत. तसेच ऊस तोडण्याची यंत्रणा ट्रॅक्टरच्या पुढे आहे. या कारणामुळे जमीन किंवा पिकाचे कोणतेही नुकसान होत नाही. 
यंत्र चालविण्यासाठी केवळ ट्रॅक्टर ड्रायव्हर आवश्यक आहे. फारशा कौशल्याची आवश्यकता नाही.
अधिक प्रमाणात उत्पादन सुरू झाल्यानंतर सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या यंत्राच्या तुलनेत हे यंत्र अगदी स्वस्त पडू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com