घ्या मधुर मिल्क शेक! आमच्याच बागेतील चिकूचा...

घ्या मधुर मिल्क शेक! आमच्याच बागेतील चिकूचा...

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ हा ऊस व भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध तालुका. याच तालुक्यातील कुरुंदवाड येथील मनोज पोमाजे (वय ४०) या उच्चशिक्षित युवकाने वेगळी वाट जोपासली. चाळीसहून अधिक वर्षे जोपासलेल्या आपल्या तीन एकर चिकू बागेचे मूल्यवर्धन त्यांनी ‘चिकू शेक’ या उत्पादनाद्वारे केले. गेल्या दशकाहून अधिक काळ व्यवसायात सातत्य ठेवत नफ्यात वाढ केली. 

श्री दत्तगुरूंचे प्रसिद्ध देवस्थान असलेल्या नृसिंहवाडी क्षेत्रापासून (जि. कोल्हापूर) सुमारे चार किलोमीटरवर कुरुंदवाड खिद्रापूर रस्त्यावर मजरेवाडी गावच्या हद्दीत मनोज पोमाजे यांची सहा एकर शेती रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे. पैकी तीन एकरांत ऊस, तर उर्वरित तीन एकरांत चिकू आहे. वैशिष्ट्य म्हणजे सुमारे ४० ते ४२ वर्षांपासून चिकूच्या झाडांचे संगोपन केले जात आहे. हेच चिकू नुसते न विकता त्यापासून ‘मिल्क शेक’ तयार करून नफा वाढवण्याचा फंडा मनोज यांना सुचला. दशकाहून अधिक काळ या मूल्यवर्धन उद्योगात त्यांनी सातत्य ठेवले आहे. 

मनोज यांची चिकूबाग दृष्टिक्षेपात  

क्षेत्र- तीन एकर
झाडांची संख्या- १२५ 
झाडांचे वय- सुमारे ४० वर्षे
वाण- काळी पत्ती
पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन, 
गोमूत्र, दशपर्णी, लसूण, मिरची अर्क,
देशी गायीचे दूध यांचा गरजेनुसार वापर 
पाटपाण्याने सिंचन 
प्रत्येक वर्षी शेणखताचा प्राधान्याने वापर 
डिसेंबर ते जूनअखेर चिकूचा हंगाम

काढणी व्यवस्थापन प्रक्रिया व विक्री 

नियमित सहा कामगार
दररोज सुमारे १५० किलो काढणी
पैकी १०० किलोची थेट विक्री
५० किलोपासून ज्यूसनिर्मिती

सकाळी बागेतून चिकू आणल्यानंतर देठातील चीक निघून जाण्यासाठी ते पसरून ठेवले जातात. त्यानंतर फळाच्या वरची साल काढून सर्व गर मिक्‍सरमधून ‘क्रश’ करून घेतला जातो. दूध मिसळून ते फेसाळले जाते. शेक तयार झाल्यानंतर तो ‘फ्रीज’मध्ये ठेवला जातो. एक दिवस पुरेल इतकाच शेक तयार केला जातो. यामुळे तो शिल्लक राहण्याचा प्रश्नच येत नाही. सेंद्रिय चिकू आणि दर्जेदार दूध यामुळे शेकची चव दर्जेदार होते. 

रस्त्याकडेलाच ‘ज्यूस सेंटर’. त्याद्वारे दररोज ताजा चिकू मिल्क शेक ग्राहकांना दिला जातो. 
विक्री- उन्हाळी हंगामात दररोज पाचशे ग्लासपर्यंत ज्यूस. पावासाळ्यात हेच प्रमाण १०० ग्लासपर्यंत
प्रति ग्लास दर- २० रुपये 

व्हॅनपासून रिसाॅर्टपर्यंत...
मनोज यांचा व्हॅन ते रिसाॅर्टमधून शेकची विक्री हा प्रवास जिद्दीचा आहे. आपला माल आपणच विकायला संकोच का वाटावा, याच विचारसरणीने नव्या पिढीचे मनोज व्यावसायिक वृत्तीचे झाले. शेतीतील नफा वाढवायचा तर आपणच मार्केटिंगही केले पाहिजे, असे मनाशी पक्के केले. याच व्यवसायात करिअर करायचे ठरवल्याने नोकरीचा प्रयत्नही केला नाही. नृसिंहवाडी व खिद्रापूर ही शिरोळ तालुक्‍यातील दोन महत्त्वाची पर्यटन व धार्मिक स्थळे. नृसिंहवाडीला आलेला भाविक खिद्रापूरचे मंदिर पाहिल्याशिवाय जात नाही. या दोन गावांच्या दरम्यानच मनोज यांचे रिसाॅर्ट आहे. याच रिसाॅर्टमधून चिकू व शेक अशा दोन्हीची विक्री केली जाते. चिकूची विक्री किलोला ५० रुपयांच्या आसपास होते. दररोज शंभर किलो चिकू सहज विकले जातात. सेंद्रिय पद्धतीने पिकवले असल्याने त्यांची गोडी काही वेगळीच आहे.

उत्पन्न वाढले 
ज्या वेळी केवळ फळांची विक्री व्हायची, त्या वेळी दोन लाख रुपये उत्पन्न मिळत होते. आता त्यात वाढ होऊन हे उत्पन्न काही पटींनी वाढले आहे. यातून मिळालेल्या नफ्यातून रस्त्याकडेलाच ‘पोमाजे रिसार्ट’ या नावाने इमारत बांधून त्याद्वारे शेकची विक्री सुरू केली आहे. रस्त्याकडेला विहीर असल्याने निम्म्या विहिरीवरच इमारत बांधून त्यातही वेगळेपण जपले आहे. या व्यवसायात आई सरोजिनी, पत्नी मनाली, भाऊ प्रा. मदन साथ देतात. त्यांच्या सहकार्यामुळेच हा व्यवसाय यशस्वी झाल्याचे मनोज सांगतात.

प्रक्रियेद्वारे वाढवले मूल्य 
मनोज यांचे वडील कै. दादासाहेब यांनी ऊसशेतीबरोबरच चिकूची बागही जोपासली. अनेक दिवस ते व्यापाऱ्यांनाच चिकूची विक्री करीत. यातून हंगामात केवळ दोन लाखांपर्यंत उत्पन्न मिळायचे. बी.एसएस्सी पदवीधारक असलेले मनोज यांनी शेतीची जबाबदारी सांभाळल्यानंतर बदलास सुरवात केली. 

केवळ चिकूविक्रीवर अवलंबून राहण्यापेक्षा मिल्क शेकद्वारे अधिक नफा होईल या अपेक्षेने त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. रस्त्याकडेलाच व्हॅन लावून विक्री सुरूही केली. 

चिकूला मार्केट तयार केले 
गेल्या दहा वर्षांत मनोज यांनी आपले चिकू व्यापाऱ्यांना विकलेले नाहीत. व्यवसायाला लागणारे सातत्य टिकवल्याने कायमचे ग्राहक तयार झाले. याचा त्यांना फायदा झाला. त्यांच्या व्यवसायाच्या मार्गावरून जाताना शेक पिल्याशिवाय जायचे नाही असा अलिखित नियमच काही ग्राहकांचा आहे. संपूर्ण कुटुंबासहित ग्राहक येऊन चिकू शेकची लज्ज्त चाखतात. ग्राहकांचे हेच बनवलेले मार्केट प्रेरणादायी ठरल्याचे मनोज सांगतात.

सीताफळ लागवड
चिकूबरोबर आता सीताफळाची लागवडही नुकतीच केली आहे. त्यापासूनही मिल्क शेक तयार करून विक्री करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. व्हॅनमधून शेकविक्रीची मिळालेली प्रेरणा त्यांना रिसाॅर्ट बांधण्यापर्यंत घेऊन गेली आहे. चिकूला अन्य पिकांच्या तुलनेत किडी- रोगांचे प्रमाण कमी असल्याने उत्पादन खर्च आटोक्यात राहतो हे या पिकाचे वैशिष्ट्य त्यांनी सांगितले. 
- मनोज पोमाजे - ९९२११६५३१८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com