द्राक्षबागेवर थंडीचा होणारा परिणाम

थंडीमुळे मण्याची थांबलेली वाढ.
थंडीमुळे मण्याची थांबलेली वाढ.

द्राक्षबागेत सध्या असलेल्या वाढीच्या विविध स्थितीमध्ये वेगवेगळ्या समस्या दिसून येतात. काही दिवसांपूर्वी बऱ्याच भागात पाऊस पडला, तर पुन्हा ढगाळ वातावरण दिसत आहे. पुढील काळात काही भागांत थोड्याफार पावसाची शक्यता आहे. अशा वेळी द्राक्षबागेमध्ये उद्‌भवणाऱ्या समस्या आणि त्यासंबंधित उपाययोजना याविषयी माहिती घेऊ.
 

जुन्या द्राक्षबागेमध्ये मण्याची वाढ थांबणे, शेंडा वाढ कमी होणे, पिंकबेरीज तयार होणे, मणी क्रॅकिंग अशा समस्या पावसाळी व ढगाळ वातावरणामुळे दिसू शकतात. त्यासंबधी करावयाच्या उपाययोजना पुुढीलप्रमाणे. 

मण्याची वाढ थांबणे 
पाऊस थांबून ढगाळ वातावरणही ओसरलेल्या ठिकाणी आभाळ निरभ्र असेल, अशा ठिकाणी दिवसाचे तापमानसुद्धा कमी होईल. रात्रीच्या थंडीमुळे वेलींच्या शरीरांतर्गत हालचालीचा वेग मंदावलेला असतो. मण्याच्या वाढीसाटी पेशीची वाढ होणे गरजेचे असते. बागेत तापमान व आर्द्रता पुरेपुर असल्यासच वेलीमध्ये पेशीची वाढ होते. तापमान वाढेपर्यंत पेशींची पर्यायाने मण्याची वाढ कमी होईल. 

हे टाळावे - मण्याची वाढ लवकर होण्यासाठी शेतकरी जीए ३ ची फवारणी करतात. मात्र, त्यामुळे मण्याची साल जाड होते. मण्यात साखर उतरायला विलंब होतो. तेव्हा संजीवकाची फवारणी टाळावी. 

हे करावे - वेलीच्या मुळाभोवतालचे तापमान वाढवण्याकरिता प्रयत्न करावेत. त्यासाठी बागेत पाणी जास्त प्रमाणात दिल्यास मातीचे तापमान वाढते. बोदावर मल्चिंग करावे. द्राक्ष घड कॅनॉपीमध्ये घ्यावा. इत्यादी गोष्टीमुळे मण्याची वाढ होण्यास सहज मदत होईल.

शेंडावाढ कमी होणे 
फळछाटणीनंतर घडाच्या विकासात पाने महत्त्वाची असतात. याच पानांमुळे घड उन्हापासून सुरक्षित राहतो. घड डागळण्याचे प्रमाण कमी होते. घडांच्या पोषणामध्ये पानांद्वारे तयार केलेली अन्नद्रव्ये मोलाची ठरतात. त्यामुळे मण्याचा आकार वाढण्यास मदत होते. याकरिता पानांचे क्षेत्रफळ १६०-१७० वर्ग सेंमी (जवळपास १६-१७ पाने) आवश्‍यक असते. म्हणजेच घडाच्या पुढे १०-१२ पाने असल्यास अन्नद्रव्याची पूर्तता होईल, असे मानले जाते. पानांची ही पूर्तता मनी सेटिंगच्या आधीच करता येईल. कारण त्यानंतर द्राक्षघड असलेल्या काडीवर शेंडावाढ होताना दिसत नाही. सध्या वाढणाऱ्या थंडीमुळे वेलीवरील शेंडावाढ थांबण्याची शक्यता जास्त आहे. ही समस्या प्रामुख्याने उशिरा छाटणी केलेल्या बागेत दिसून येईल. 

हे करावे - सध्या प्रिब्लुम अवस्थेत असलेल्या बागांमध्ये किमान तापमान कमी व्हायला सुरवात झाली असेल. अशा बागेत फुटीची वाढ कमी होताना दिसते. अशा बागेत त्वरीत नत्रयुक्त खतांची जमीनीतून व फवारणीद्वारे पूर्तता करावी. 

सरळ वाढत असलेला शेंडा थोडाफार वाकडा असल्याचे दिसल्यास, या काडीवर पुन्हा ५-६ पाने आवश्यक आहे. बागेतील फुटीच्या शेंड्याची परिस्थिती पाहूनच नत्राचा वापर ठरवावा. यावेळी अमोनियम सल्फेट, युरिया, १८ः४६ः० व १२ः६१ः० सारख्या नत्रयुक्त खतांचा वापर करता येईल.

पिंकबेरीज तयार होणे 
बागेत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या पुढे व किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली आल्यास तापमानातील मोठा फरक होतो. किमान व कमाल तापमानातील जास्त तफावतीमुळे मण्याची वाढ होताना शरीरशास्त्रीय हालचालीतील संतुलन बिघडते. मण्यामध्ये तयार होत असलेला हिरवा द्रव हा गुलाबी रंगात रुपांतरीत होतो. परिणामी द्राक्षमणी अचानक गुलाबी रंगाचे होताना दिसतात. यालाच पिंक बेरीज असे म्हटले जाते. ही परिस्थिती द्राक्षबागेत मण्यात पाणी उतरण्याच्या आधीच्या अवस्थेत असलेल्या बागेत जास्त प्रमाणात दिसून येईल. 

उपाययोजना -
द्राक्ष घड पेपरने झाकणे - मण्यात पाणी उतरायला सुरवात होण्यापूर्वी ८-१० दिवसाआधी पेपरने घड झाकावा. घडावरील थंडीचा परिणाम कमी होऊन मण्याचा हिरवा रंग गुलाबी रंगात रुपांतरीत होणार नाही. 

बागेतील तापमान वाढविणे - बागेतील किमान तापमान वाढविण्यासाठी बागेत मोकळे पाणी देणे, बोद पूर्णपणे भिजवणे, बोदावर मल्चिंग करणे व बागेत जागोजागी शेकोटी पेटविणे इत्यादी गोष्टी गरजेच्या ठरतात. मात्र, पाणी वापर जास्त झाल्यास भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. पेपरने द्राक्ष घड झाकण्यापूर्वी भुरीपासून संरक्षणासाठी शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करून घ्यावी. 

मणी क्रॅकिंग 
आगाप छाटणीच्या बागेमध्ये यावेळी फळ काढणीचा कालावधी असतो. बागेत जास्त पाणी झाल्यास शुगर रिव्हर्स येते, तसेच मण्यात गोडी वाढण्याससुद्धा उशीर लागतो. यावेळी बागेत गोडी लवकर येण्याच्या दृष्टीने पाणीसुद्धा नियंत्रणात ठेवले जाते. अशा वेळी बागेत पाऊस आल्यास कॅनॉपी पूर्णपणे भिजते. द्राक्ष घडाच्या भोवतीच्या वातावरणात आर्द्रता वाढते. मण्यामध्ये टर्गर प्रेशर वाढतो. परिणामी मण्यातील पेशीचे तुकडे होऊन क्रॅकिंग होते. 

उपाययोजना - अशा पावसाळी स्थितीमध्ये मणी क्रॅकिंग रोखण्यासाठी कोणत्याही फवारणीचा फारसा परिणाम होत नाही. त्याऐवजी बागेमध्ये मोकळी कॅनॉपी ठेवावी. बागेतील आर्द्रता एकदम वाढणार नाही, याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी पाऊस पडण्याचा अंदाज माहित असल्यास किंवा हवामान स्थिती आढळल्यास एखादा दिवस आधी बागेत पाणी द्यावे. पाऊस आल्यानंतर बागेत लगेच ब्लोअर मोकळा फिरवून कॅनॉपीतून पाणी काढून घेणे अशा गोष्टी फायद्याच्या ठरू शकतात.

नवीन द्राक्षबाग 
नवीन द्राक्षबागेमध्ये कलम काडीची परिपक्वता महत्त्वाची आहे. कलम केलेल्या बागेत सध्या झालेल्या पावसामुळे शाकीय वाढ जोरात होताना दिसून येईल. पाऊस व त्यानंतर थंडी संपताच कलम जोडाच्या वर रिकट घेण्याची वेळ येईल. त्यासाठी बागेतील काडी परिपक्व असणे आवश्यक आहे. आता शेंडा खुडून घेतल्यास शाकीय वाढ नियंत्रणात राहून काडी परिपक्व होण्यास सुरवात होईल. त्याकरिता बागेत पोटॅशची (०ः०ः५०) ३-४ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. तसेत जमिनीतून पोटॅशची उपलब्धता करावी.

गेल्या आठवड्यातील पावसामुळे डाऊनी मिल्ड्युचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक ठिकाणी कलम जोडाजवळ काडी काळी पडून कलम केलेली वेल खराब झाल्याचे दिसून आले. तसेच पानावरसुद्धा डाऊनीची प्रादुर्भाव पुन्हा दिसून आला. रोगाच्या नियंत्रणासाठी शिफारशीप्रमाणे उपाययोजना त्वरीत करून द्राक्षवेल सुरक्षित ठेवावी.
- डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२० -२६९५१६०६०, ( राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com