शेतमालाच्या सरकारी खरेदीला थंडा प्रतिसाद

मारुती कंदले
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

राज्यात सोयाबीन, उडीद आणि मूग यांचे दर हमीभावापेक्षा खाली घसरल्याने सरकारी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. परंतु मालात आर्द्रतेचे प्रमाण निकषापेक्षा जास्त असल्यामुळे प्रत्यक्षात खरेदीचे प्रमाण अत्यल्प आहे. सरकारी खरेदी ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याचे पणन महामंडळाने स्पष्ट केले आहे.  

राज्यात सोयाबीन, उडीद आणि मूग यांचे दर हमीभावापेक्षा खाली घसरल्याने सरकारी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. परंतु मालात आर्द्रतेचे प्रमाण निकषापेक्षा जास्त असल्यामुळे प्रत्यक्षात खरेदीचे प्रमाण अत्यल्प आहे. सरकारी खरेदी ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याचे पणन महामंडळाने स्पष्ट केले आहे.  

राज्यात सोयाबीन खरेदीसाठी १२६, मुगासाठी ८६ आणि उडदासाठी ८९ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी येत असलेल्या शेतमालामध्ये आर्द्रता १४ ते २० टक्के इतकी आढळून येत आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कमाल १२ टक्के आर्द्रता असणे आवश्यक आहे. आर्द्रता अधिक असल्याने शेतकऱ्यांकडून सोयाबीन, मूग आणि उडदाची खरेदी कमी प्रमाणात होत आहे. त्यावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. मात्र, त्यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळून जाऊ नये असे आवाहन पणन महामंडळाने केले आहे. सोयाबीन, मूग आणि उडदाची खरेदी ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी केला जाईल. शेतकऱ्यांनी काडीकचरा नसलेला, स्वच्छ, वाळवलेला आणि कमी आर्द्रता असलेला शेतमाल खरेदी केंद्रांवर आणावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

सोयाबीनची सरकारी खरेदी १८ ऑक्टोबरपासून तर मूग आणि उडदाची खरेदी १६ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. या हंगामापासून सरकारी खरेदीसाठी शेतकऱ्यांनी स्वतःकडील शेतमालाची आगाऊ नोंदणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे. 

राज्यात सोयाबीन खरेदीसाठी १२६, मुगासाठी ८६ आणि उडदासाठी ८९ केंद्रे सुरू.
शेतमालामध्ये आर्द्रता १४ ते २० टक्के. 
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कमाल १२ टक्के आर्द्रता असणे आवश्यक.
परिणामी खरेदीचे प्रमाण अत्यल्प.

शुक्रवार (३ नोव्हेंबर) पर्यंतची सरकारी खरेदी 
सोयाबीन    १२ हजार ७६९ क्विंटल    ७२२ शेतकरी 
मूग    ३ हजार ३६६ क्विंटल    ७८४ शेतकरी
उडीद    १५ हजार ४५९ क्विंटल    २,५६० शेतकरी