कांदा प्रतवारी, लोडिंग-अनलोडिंग यंत्र विकसित

कांदा प्रतवारी, लोडिंग-अनलोडिंग यंत्र विकसित

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या काढणीपश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाने ‘कांदा प्रतवारी, लोडिंग-अनलोडिंग’ यंत्र विकसित केले अाहे. या यंत्राचे नुकतेच प्रात्यक्षिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अावारात घेण्यात अाले.

महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे कांदा उत्पादक राज्य असून, राज्यातील ३७ टक्के कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यात पिकतो. खरीप, रांगडा, रब्बी आणि उन्हाळी हंगामात नाशिकसह पुणे, धुळे, नगर, सोलापूर, अकोला आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये कांद्याचे पीक घेतले जाते. 

कांद्याच्या बाजारभावामध्ये प्रचंड चढउतार असताे. योग्य दर न मिळण्याच्या अन्य कारणांसोबतच योग्य प्रतवारी केलेली नसल्यानेही मोठे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागते. कांद्याची प्रतवारी ही प्राधान्याने बाजारपेठेच्या मागणीप्रमाणे आकारानुसार केली जाते. लहान, मध्यम, मोठे कांदे वेगळे करण्यासाठी मजुरांच्या कौशल्यावर अवलंबून राहावे लागते. वाढत्या मजुरीमुळे खर्चात वाढ होते. 

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत काढणीपश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या विभागाने कांदा प्रतवारी यंत्र विकसित केले आहे. यंत्र बनविण्यासाठी साडेतीन ते चार लाखांपर्यंत खर्च लागू शकतो. 

सर्वेक्षणातून जाणून घेतल्या अडचणी 
या विभागाच्या तज्ज्ञांनी निफाड तालुक्यातील अनेक कांदा उत्पादकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. 
निर्यातीसाठी कांदा प्रतवारी केलेला असण्याची व्यापाऱ्यांची गरज होते. 
कांदा प्रतवारी करणे व चाळीमध्ये भरणे यासाठी मजुरावर अधिक खर्च होतो. 
पूर्वीच्या कांदा प्रतवारी यंत्रामध्ये कांद्याची टरफले निघून इजा होते. 
या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

विद्यापीठाने विकसित केलेल्या कांदा प्रतवारी व लोडींग अनलोडींग यंत्राचे २७ जुलै रोजी अकोला कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये प्रात्यक्षिक घेतले.  संशोधन अभियंता डॉ. प्रदीप बोरकर, प्रा. राजेश मुरुमकार, वासुदेव मते, गजानन घावट, महेंद्र राजपूत, विलासराव अनासाने यांनी यंत्राची कार्यपद्धती समजावून, त्याचे प्रात्यक्षिक दिले. यावेळी कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे, बाजार समिती े सभापती शिरीष धोत्रे उपस्थित होते. 
- डॉ. प्रदीप बोरकर, ९८२२७१६४८१

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याच्या मूल्यवर्धनासाठी प्रतवारी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सदर ‘पंदेकृवि कांदा प्रतवारी यंत्र’ उपयुक्त आहे. 
- डॉ. महेंद्र नागदेवे, अधिष्ठाता, कृषी अभियांत्रिकी

या यंत्रामुळे कांदा प्रतवारीसाठी लागणारा वेळ, मेहनत व खर्च कमी होऊ शकतो. तसेच कांदा चाळीमध्ये किंवा ट्रकमध्ये भरण्यासाठी लोडिंग/अनलोडिंग यंत्र उपयोगी ठरेल. 
 - डॉ. प्रदीप बोरकर, संशोधन अभियंता, कापणीपश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com