प्रगतशील विचारांमुळेच तरुणाची प्रयोगशील शेती

प्रगतशील विचारांमुळेच तरुणाची प्रयोगशील शेती

केऱ्हाळा (ता. रावेर, जि. जळगाव) येथील युवा शेतकरी विशाल गंभीर पाटील यांनी कपाशीखालील क्षेत्र कमी करून केळी आणि आले या मुख्य पिकांची प्रयोगशील शेती सुरू केली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, मार्केटचा अभ्यास यांची सांगड घालून तयार केलेली पीकपद्धती त्यांना फायदेशीर ठरली आहे. 

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुका व त्यातही केऱ्हाळा हे गाव संपूर्ण जिल्ह्यात केळी पिकासाठी अोळखले जाते. काळी, कसदार शेती येथे आहे. येथील अनेक शेतकरी प्रयोगशील म्हणून अोळखले जातात. सन २०१३ ते १४ या काळात केऱ्हाळे, पाल, चिनावल, रसलपूर या परिसराला वादळाचा मोठा फटका बसला. केळीचे मोठे नुकसान झाले. गावातील तरुण शेतकरी विशाल पाटील यांनाही त्याचा फटका सहन करावा लागला. केळीसोबत अन्य पिके घेण्याची गरजही या संकटातून शिकवून गेली. 

दुसरी बाब म्हणजे कपाशीसारखे पीक पूर्वी १० एकरांपर्यंत असायचे. त्यातूनही मनासारखे उत्पन्न काही येत नव्हते. पीकपद्धतीत सुधारणा करणे विशाल यांना आवश्यक वाटले. 

विशाल यांचे नियोजन 
पाटील कुटुंबाची संयुक्त शेती होती. विशाल यांचे वडील गंभीर पाटील यांच्या निधनानंतर मोठे कुटुंब विभक्त झाले. याचकाळात विशाल यांचे शिक्षण जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयात सुरू होते. वीस एकर शेती वाट्याला आली. मात्र हीच शेती आपण स्वतः करून समृद्ध करावी, असे त्यांना वाटू लागले. अर्थात, पूर्णवेळ शेतीला देताना कला शाखेतील प्रथम वर्षाचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. सन २००७ पासून ते शेतीची जबाबदारी यशस्वी पेलत आहेत. 

आले पिकाची सुरवात
पीकपद्धतीत बदल करताना कपाशीला आले पिकाचा पर्याय त्यांनी निवडला. एकरी अधिक उत्पादन व मिळणारे दर असा अभ्यास डोक्यात होता. केळीच्या या पट्ट्यात अशी पिके घेणे म्हणजे धाडसाचे व तेवढेच धोक्‍याचे होते. हे माहीत असतानाही विशाल यांनी २०१३ मध्ये अाल्याची प्रथमच आपल्या पंचक्रोशीत लागवड केली. त्यासाठी गादीवाफा पद्धतीचा वापर केला. थोड्या क्षेत्रात हळदीचीही लागवड केली. 

पिलबागचे दोन सरीआड एक सरी तंत्र  
केळीचा पहिला हंगाम घेतल्यानंतर पिलबाग हमखास ठेवतातच. त्यात दोन सरींआड एक सरी काढून टाकतात. या रिकाम्या सरीत केळीची खोडे व अन्य अवशेष टाकले जातात. बागेत पानांचे आच्छादन केले जाते. त्यांचे हे तंत्र इतर शेतकऱ्यांनीही आत्मसात केले आहे. निर्यातक्षम उत्पादन घेऊन चार कंटेनर केळी दुबई येथे व्यापाऱ्याच्या माध्यमातूून पाठविली. त्यास किलोला १२ रुपये दर मिळाला.    
- विशाल पाटील, ९७६५३६२३३६

 विशाल यांनी केलेले बदल 
    हळद व अाले पिकात सूक्ष्मसिंचन करणारे भागातील पहिले शेतकरी म्हणूनही विशाल यांची ओळख  
    आले पिकाची देखभाल व्यवस्थित केली. त्यात चांगला नफा सुटला. पुढच्या वर्षी नऊ एकरांत लागवड केली.  
    कपाशीचे क्षेत्र दहा एकरांवरून ३ ते ४ एकरांवर आणले. उर्वरित क्षेत्र आले पिकासाठी वापरले. 
    अाले व अन्य मसाला पिकांसंबंधीच्या अभ्यासासाठी कृषी विभागातर्फे कालिकत (केरळ) येथे आयोजित अभ्यास दौऱ्यात सहभाग. 
    रहमानीखेडा (लखनऊ, उत्तर प्रदेश) येथील केंद्रीय फलोत्पादन संस्थेलाही फळपिकांच्या अभ्यासासंबंधी भेट  
    अाल्याची लागवड गादीवाफ्यावर. एकरी १६० क्विंटलपर्यंत उत्पादन घेण्याची किमया साधली. 
    केळी, कापूस व अाले यांची लागवड १५ मे ते १५ जून या काळात. लागवडीला कुठलाही उशीर किंवा घाई ते करीत नाहीत. वेळेत लागवड झाली तर त्याची काढणी व पुढील देखभालीचे नियोजन व्यवस्थितपणे करता येते, असे विशाल सांगतात.
    सध्या पाच एकर पिलबाग केळी, पाच एकर कापूस, पाच एकर अद्रक व पाच एकर मृग बहारातील केळी असा हंगाम शेतात आहे. 
    कोणत्याही पिकालाही खते सूक्ष्मसिंचनाद्वारेच. पिकाची वाढ व वय यानुसार निश्चित केलेली मात्रा काटेकोर देतात. जमीन काळी कसदार असल्याने तज्ज्ञांशी चर्चा करून मात्रा निश्‍चित केली. 
    खते व पाणी देण्यासाठी लाखभर रुपये खर्च करून २०१३ मध्येच मिनी ऑटोमेशन यंत्रणा बसविली. त्यासाठी बुस्टर पंपही चीन येथून मागविला. आज भागातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे अनुकरण केले आहे. येत्या काळात ‘मोबाईल ॲप’वर आधारित ‘ऑटोमेशन’ यंत्रणा बसविणार. त्यासाठी नऊ लाख खर्च अपेक्षित. त्यासाठी खोलीचे बांधकाम पूर्ण.  

अठरा महिन्यांत केळीचे दोन हंगाम
केळीच्या ऊतिसंवर्धित रोपांची लागवड केली जाते. अठरा महिन्यांत पाच एकरांत केळीचे दोन हंगाम यशस्वीपणे घेतले आहेत. केळीचा सरासरी २३ ते २६ किलोचा घड मिळतो. एकरी सुमारे १३०० झाडे आहेत. केळी दर्जेदार असल्याने प्रचलित बाजारभावापेक्षा दर चांगला मिळतो.

मल्चिंगवर टरबूज व कापूसही  
विशाल सातत्याने प्रयोग करतात. सन २०१६ मध्ये पाच एकरांत टरबुजाचे (कलिंगड) पीक गादीवाफा व मल्चिंग पद्धतीने घेतले. हे पीक रिकामे होताच त्याच क्षेत्रात आंतरमशागत न करता नॉन बीटी संकरीत कापसाची लागवड केली. या कपाशीला रसशोषक किडींचा प्रादुर्भाव बीटी कपाशीपेक्षा कमी होतो, असे विशाल सांगतात. त्याचे एकरी १५ क्विंटल उत्पादन घेतले. कमी फवारण्या, चांगल्या व्यवस्थापनाच्या जोरावर व टरबुजाच्या बेवडामुळे चांगले उत्पादन आले.  

एकरी २७ टन टरबूज 
सन २०१६ मध्ये मल्चिंग व गादीवाफा पद्धतीने घेतलेल्या टरबुजाचे एकरी २७ टन उत्पादन मिळाले. फळाचा आकार एकसारखा व फळे रसाळ असल्याने मोठी मागणी राहिली. आठ रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली. जळगाव येथील बाजारात मागणी शेवटपर्यंत कायम होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com