शिक्षण, शेती अन ग्रामविकासात संस्कृती संवर्धन मंडळाची साथ

दुष्काळग्रस्त गावांमध्ये डोह पद्धतीने नाला खोलीकरण.
दुष्काळग्रस्त गावांमध्ये डोह पद्धतीने नाला खोलीकरण.

नांदेड जिल्ह्यातील सगरोळी (ता. बिलोली) सारख्या मागास भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची गंगा गावात आणणाऱ्या संस्कृती संवर्धन मंडळाचा सर्वदूर नावलौकिक आहे. गेल्या काही वर्षांपासून या मंडळाने शैक्षणिक कार्यासोबतच शेती आणि शेतकरी यांच्या विकासासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. लोकसहभागातून जलसंधारणाच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत.

सगरोळी (जि. नांदेड) हे महाराष्ट्र आणि तेलगंणा या दोन राज्यांच्या सीमेवरील गाव. गावशिवारात एका बाजूने डोंगर तर दुसऱ्या बाजूने मांजरा नदी वाहते. दुर्गम भागात शैक्षणिक सुविधा नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागत असे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रेरणेतून के. ना. ऊर्फ बाबासाहेब देशमुख यांनी १९५९ मध्ये स्वतःची शंभर एकर जमीन आणि गावकऱ्यांनी १०० एकर जमीन संस्कृती संवर्धन मंडळाच्या नावे करून सगरोळी येथे शिक्षण संस्था सुरू केली. प्रारंभीच्या काळात एका झोपडीत प्राथमिक शिक्षणाचे रोपटे लावलेल्या या संस्थेचा गेल्या ५९ वर्षांत वटवृक्षात रूपांतर झाले. संस्थेचे हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. समाजातील अनाथ, निराधार, निराश्रीत  मुलांचे ‘आनंद बालग्राम`च्या माध्यमातून संगोपन केले जाते. कर्मयोगी बाबासाहेब देशमुख हे शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांनी सेंद्रिय शेती तसेच विविध शेतीविषयक प्रयोग सुरू केले. सध्या संस्कृती संवर्धन मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रमोद देशमुख, संचालक रोहित देशमुख यांनी या भागातील शेती आणि शेतकरी तसेच गावांच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

१९९२-९३ पासून पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम तसेच गावात उपलब्ध नैसर्गिक संसाधनाच्या माध्यमातून गावे पाण्याच्या बाबतीत स्वंयपूर्ण करण्यासोबतच शाश्वत ग्राम विकासाठी मंडळाने नाबार्ड सोबत विविध उपक्रम सुरू केले.  

लोकसहभागातून नाल्याचे पुनरुज्जीवन 
दुष्काळ निवारणासाठी मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यातील संस्थांना एकत्रित करून जलसंधारणाच्या कामांवर भर. नांदेड जिल्ह्यातील बिलोली, सगरोळी, आदमपूर, काटकळंबा, बिजेवाडी, खानापूर, काठेवाडी, नरंगल, रामपूर, कंधार या ठिकाणी डोह पध्दतीने नैसर्गिकरित्या नाल्याची दुरुस्ती तसेच निजामकालीन तलावातील गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य.

सगरोळी येथील सहा किलोमीटर लांबीच्या नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरणाचे काम. यासाठी मंडळाने ५० टक्के आणि शेतकऱ्यांनी ५० टक्के खर्चाचा वाटा उचलला. हा नाला २० फूट रुंद आणि एक फूट खोल करण्यात आला. नाल्यामध्ये १५० मीटर अंतरानंतर २० मीटरचा बांध ठेवल्यामुळे डोहनिर्मिती झाली. प्रत्येक १५० मीटर अंतरावरील डोहामध्ये सुमारे सात लाख ५० हजार लिटर पाणीसाठवण क्षमता तयार झाली.

नाला खोलीकरण, रुंदीकरणामुळे सगरोळी गावातील २०० ते ३०० एकर पडीक जमीन लागवडीखाली आली.

काठेवाडी, काटकळंबा या गावातील प्रत्येकी एक किलोमीटर आणि आदमपूर येथील सात किलोमीटर असे एकूण चार गावातील १५ किलोमीटर नाल्याचे पुनरुज्जीवन डोह पद्धतीने करण्यात आले. 
गाव तलावांची वाढली क्षमता 

कंधार येथील जलतुंग तलावाचे २५० एकर साठवण क्षेत्र आहे. या तलावातून गतवर्षी ४५ हजार ब्रास गाळ काढण्यात आला. त्यामुळे १२ कोटी ७३ लाख ५० हजार लिटर पाणीसाठा निर्माण होणार आहे.

खानापूर तलावातून १६ हजार ब्रास, नरंगल तलावातून ५ हजार ब्रास, बिलोली तलावातून ४ हजार ब्रास, बीजेवाडी तलावातून १० हजार ब्रास गाळ काढण्यात आला.

सगरोळी तलावातून २००७, २०१२ आणि २०१५ या वर्षी गाळ काढण्यात आला. लोक सहभागातून गाळ शेतामध्ये मिसळण्यात आल्यामुळे जमिनीची सुपिकता वाढत आहे. यावर्षीही जिल्ह्यातील गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानात मंडळाचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे.

जलसंधारणातून ग्राम विकास 
मंडळामार्फत माथा ते पायथा जलसंधारणाची कामे केली जात आहेत. सलग समतल खोल चर, अनघड दगडी बांध, नाला खोलीकरण, बंधाऱ्यातील गाळ काढणे आदी उपाययोजनांवर भर दिलेला आहे. 

जलसंधारणाची कामे तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने केली जातात. यामुळे अपेक्षित फायदा होत आहे. सगरोळी परिसरातील पाणी टंचाई असणारी तीस गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली. पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांनी पीक पध्दतीत बदल केले. यामुळे हळदीसह अन्य नगदी पिकांच्या लागवडीकडे शेतकरी वळले.

सगरोळी गावाच्या ५० वर्षे जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या उद्भव विहिरी मांजरा नदी पात्रात आहेत. नदी पात्रातून केला जाणारा बेसुमार वाळू उपसा आणि कमी पाऊस यामुळे विहिरींना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसे. या विहिरीजवळ भूमिगत बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आल्यामुळे पात्रातून वाहून जाणारे पाणी अडले. परिणामी विहिरींची पाणीपातळी वाढण्यास मदत होत आहे.

महिला कौशल्य विकास कार्यक्रम 
 स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन. संस्थेने कार्यक्षेत्रातील गावात ६०० बचत गट स्थापन केले असून ९००० महिला संस्थेच्या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत.
 कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गंत ग्रामीण भागातील युवक, युवतींना कृषी अवजारे निर्मिती, शिवणकाम, अन्नप्रक्रिया, इलेक्ट्रीशियन आदी व्यवसायांचे प्रशिक्षण.

शेती आणि शेतकरी विकासासाठी विविध उपक्रम 
 संस्कृती संवर्धन मंडळाने २०१२ मध्ये कृषी विज्ञान केंद्राची स्थापना केली. नांदेड जिल्ह्यातील आठ तालुके कार्यक्षेत्र असलेल्या या ‘केव्हिके` मार्फत शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. दरवर्षी २५ हजारांवर शेतकरी ‘केव्हिके`ला भेटी देतात. 
 दरवर्षी सुमारे ८ ते १० हजार माती नमुन्यांचे परीक्षण करून शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप. 
 शेतकऱ्यांना विविध पिकांच्या सुधारित जातीचे बियाणे, भाजीपाला रोपे, चारा पिकांचे ठोंबांची उपलब्धता. 
 शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून बीजप्रक्रिया तसेच स्वच्छता, प्रतवारी युनिटची उभारणी.
 विविध पिकांबाबत माहिती देण्यासाठी २२ व्हाॅट्‌सअप ग्रुपची स्थापना.‘केव्हिके` पोर्टलच्या माध्यमातून आठवड्याला नांदेड जिल्ह्यातील १ लाख ३० हजार शेतकऱ्यांना कृषी संदेश पाठविले जातात.
 सत्तर गावातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन मार्गदर्शन.
 विविध गावांमध्ये पीक प्रात्यक्षिकांचे आयोजन. दरवर्षी कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन.
 रेशीम शेती, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, हायड्रोपोनिक चारा निर्मिती, अझोला, गांडूळ खत, निंबोळी अर्क, खत निर्मिती आदी विषयाचे प्रशिक्षण.
 पिकांच्या देशी जातींचे  संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र जीन बॅंक उपक्रम.
 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाच्या वारसांना शेळीपालन व्यवसायासाठी मदत.
 वरताळा(ता. मुखेड) हे गाव रेशीम ग्राम करण्यात येत आहे.

नैसर्गिक संसाधनातून ग्रामविकासावर भर   
मंडळाची गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाची संकल्पना आहे. बालाघाट डोंगररांगातील जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी मंडळामार्फत प्रयत्न केले जातात. ‘केव्हिके`च्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन कृषी तंत्रज्ञान पोचविले जाते. विविध गावांमध्ये जलसंधारणावर भर दिला आहे. 
- रोहित देशमुख : ९१५८९८७७८७ ( संचालक, संस्कृती संवर्धन मंडळ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com