शेततळ्यात मोती पिकवण्याचा घेतला ध्यास

शेततळ्यातील शिंपले बांधलेली दोरी बाहेर काढून दाखवताना वडील सुरेश धुमाळ यांच्यासह सागर.
शेततळ्यातील शिंपले बांधलेली दोरी बाहेर काढून दाखवताना वडील सुरेश धुमाळ यांच्यासह सागर.

‘कोशिश करने वालों की हार नहीं होती’ या सोहनलाल द्विवेदी यांच्या प्रसिद्ध कवितेत समुद्राच्या खोल तळातून यशापयशाची फिकीर न करता चिकाटीने प्रयत्न करत राहणाऱ्या पाणबुड्याचेही वर्णन येते. अनेक फेऱ्यांत रिकाम्या हाताने परतावे लागले तरी कधीतरी त्याच्या मुठीत मोती येतात. हे वर्णन तंतोतंत लागू पडते, ते नाशिक जिल्ह्यातील गाजरवाडी येथील सागर सुरेश धुमाळच्या धडपडीला. कारण या युवा शेतकऱ्याने गेल्या तीन वर्षांपासून खरोखरच मोत्याच्या शेतीचा ध्यास घेतलाय. शेततळ्यात केवळ मत्स्यपालनच नाही, तर मोतीही पिकविता येतात, हे दाखवून देण्याची सागरची जिद्द वाखाणण्याजोगी आहे.

नाशिक जिल्ह्यातील गाजरवाडी (ता. निफाड) हा परिसर प्रामुख्याने द्राक्षशेतीसाठी प्रसिद्ध आहे. निफाड लासलगाव रस्त्यावर नैताळे गावाजवळून गाजरवाडीला जाता येते. गावालगत सुरेश धुमाळ कुटुंबीयांची ६ एकर शेती असून, त्यातील सुमारे पाच एकर क्षेत्रावर द्राक्षबाग आहे. त्याला जोडून उर्वरित १५ गुंठे क्षेत्रावर शेततळे आहे. या शिवाय गोठ्यात ४ होलस्टिन फ्रिजीयन गाई असून, त्यांच्यासाठी काही प्रमाणात चारा पिके घेतली आहेत. शेतीमध्ये रमलेल्या सुरेश व जिजाबाई धुमाळ यांना सुनील आणि सागर ही दोन मुले आहेत. सुनील हा पूर्ण वेळ शेती करतो. सागरने गेल्या तीन वर्षांपासून मोती उत्पादन घेण्यासाठी पूर्णपणे झोकून दिले आहे. 

सागरने (वय २७) सुरवातीला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा केला. त्यानंतर एक वर्ष नोकरी केली. त्यानंतर इंजिनिअरींगची पदवी पूर्ण केली. त्यानंतर एम.बी.ए. (मार्केटींग) हा व्यवस्थापनाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम केला. त्यानंतर २ वर्षे एका खासगी कंपनीत नोकरीही केली. या काळात त्याला मोती उत्पादनाविषयी (पर्ल फार्मिंग) उत्सुकता निर्माण झाली. 

मत्स्यपालनाच्या शोधातून मोत्याकडे
बी.ई.च्या अंतिम वर्षामध्ये घरच्या शेतीत शेततळे तयार करत होते. त्यात मत्स्यबीज सोडून मत्स्यपालन करण्याविषयी विचार सुरू होता. याच काळात गोड्या पाण्यातून मोत्याचे उत्पादन घेण्याविषयी समजले. कल्पना वेगळी असल्याने उत्सुकता वाढली. त्याचाच ध्यास घेत शोध सुरू झाला.

इंटरनेटवरून माहिती घेत गेले. या शोधामध्येच नाशिकमधील आर. वाय. के. शास्त्र महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. चेतन जावळे यांच्याशी संपर्क केला. त्यांच्याकडून शिंपले, मोती याविषयीची शास्त्रीय माहिती घेतली. पुढेही प्रयोगामध्ये येणाऱ्या अडचणींमध्ये जावळे यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरल्याचे सागर यांनी सांगितले.     
  
अपयश पदरी आले
शिंपल्यामध्ये मोती बनतो. शिंपल्यांचा शोध सुरू झाला. परिसरात गोदावरी नदीवर नांदूरमध्यमेश्‍वर धरण असून, पक्षी अभयारण्य आहे. या धरणातून व गंगापूर धरणांतून स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने सुमारे ५ हजार शिंपले गोळा केले. घरच्या ५० फूट बाय १०० फूट आकाराच्या व २४ फूट खोलीच्या शेततळ्यात शिंपले सोडून प्रयोग सुरू झाले. या शिंपल्यांसाठी मोती बीज (न्युक्‍लियस) हा महत्त्वाचा भाग असतो. त्याचाच मोती बनतो. सुरवातीला प्रति नग १० रुपये खर्चून ग्रेटर नॉयडा (दिल्ली) येथून न्युक्‍लियस खरेदी केले. मात्र बहुतांश शिंपले परजिवींच्या प्रादुर्भावामुळे मृत झाले. ही बॅच अयशस्वी झाली. परिणामी ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले. काही तरी चुकलेय, हे समजत असले तरी नेमके काय ते कळत नव्हते. मग या विषयाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. योग्य संस्थेचा शोध सुरू झाला. 
 
अभ्यास, प्रात्यक्षिके आणि प्रत्यक्ष पाहणीतून शिकत गेलो
भुवनेश्‍वर (ओडिशा) येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ॲक्वा कल्चर (सीफा) या केंद्र शासनाच्या संस्थेत ५ दिवसांचे प्रशिक्षण असल्याचे समजले. वर्ष २०१५ अखेरीला तिथे जाऊन सागर यांनी प्रशिक्षण घेतले. अर्थात, या प्रशिक्षणात मत्स्यपालनावर प्रमुख भर असतो. मोत्यांच्या शेतीविषयी कमी माहिती असली तरी सागर यांची जाण विकसित झाली. माहिती मिळाली असली तरी प्रत्यक्षात त्याच्या अंमलबजावणीचे प्रयोग सुरू झाले. शिंपले आणि न्युक्‍लियस यांच्यातील प्रक्रिया, प्री ऑपरेटिव्ह स्थिती, पोस्ट ऑपरेटिव्ह स्थिती या बरोबरच ज्या पाण्यात मोत्याची शेती करायची, त्याविषयीचे बारकावे ( सामू, टीडीएस, शेवाळाचे महत्त्व) प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सीफा संस्थेकडून मिळालेल्या माहिती पुस्तकांमध्ये बहुतांश प्रक्रियेच्या आकृत्या दिल्या आहेत. त्यानुसार कामे केली. एकीकडे नोकरी सुरू असल्याने वेळेशी स्पर्धा सुरू होती. त्या परीक्षेच्या काळात आई वडिलांसह बंधू सुनील, बहीण प्रांजल यांनी कामांमध्ये सतत मदत केली. अमृतसर, पानिपत येथील प्रत्यक्ष सुरू असलेले पर्ल फार्मिंगचे प्रयोग पाहण्यासाठी अनेक वेळा गेलो. अभ्यास, प्रात्यक्षिके आणि प्रत्यक्ष पाहणी यातून अनेक बारकावे समजत गेल्याचे सागर म्हणाले.

डिसेंबर २०१६ मध्ये सूर सापडू लागला. टप्प्याटप्प्याने मोती बीजे टाकत होतो. सुरवातीला ६०० शिंपले सोडले. जानेवारीमध्ये पुन्हा १००० शिंपल्याची बॅच घेतली. या दोन्ही बॅचचे उत्पादन ऑक्‍टोबर, नोव्हेंबर २०१७ मध्ये मिळाले. ६०० शिंपल्यातून ४५०, तर १००० शिंपल्यातून ८५० मोती मिळाले. यशाचा दर वाढत चालला आहे. 

मोती उत्पादनात राउंड आणि डिझाईन असे दोन प्रकार आहेत. राउंड म्हणजे गोल मोती उत्पादनाला १५ महिने कालावधी लागतो. डिझाईन प्रकारातील मोतीसाठी ८ ते १० महिने लागतात. आतापर्यंतचे सर्व अनुभव हे डिझाईन प्रकारातील आहेत. राउंड प्रकारच्या बॅचेस या वर्षी २०१८ पासून सुरू केल्या आहेत. 

ऑक्‍टोबर, नोव्हेंबर २०१७ मध्ये २ हजार शिंपले आणि जानेवारी, फेब्रुवारी २०१८ मध्ये २ हजार शिंपले व आणखी १ हजार शिंपले टाकले आहेत. असे एकूण ५ हजार शिंपल्यात मोती बनण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात निम्म्यापेक्षा जास्त राउंड प्रकारातील आहेत. डिझाईन मोती हा प्रकार यशस्वी झाला असून, राउंड मोती निर्मितीमध्ये शिकण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. 

अर्थशास्त्र
सुरवातीला मोती निर्मितीसाठी लागणारे न्युक्लिअस विकत घेत होता. त्यासाठी अधिक खर्च होत असे. मागील तीन वर्षात न्युक्‍लियसला २५ हजार रुपये खर्च आला. मात्र, न्युक्‍लियस निर्मितीचे तंत्र शिकून त्यांची निर्मिती केली आहे. त्यामुळे खर्चात मोठी बचत झाली आहे. नुकतीच ५ हजार न्युक्‍लियसच्या बॅचसाठी केवळ १२ हजार रुपये खर्च आला. 
आतापर्यंतचे डिझाईन प्रकारातील १३०० मोती विकले गेले. त्यांना किमान १०० रुपये, तर कमाल ७५० रुपये किंमत मिळाली. सरासरी दर ३०० रुपये मिळाला. यातून ३ लाख ९० हजार इतके उत्पन्न मिळाले.

मोती उत्पादनातील महत्त्वाचे 
 पावसाळ्यात नदी नाल्यांना जोरदार पाणी आलेले असल्याने पुरेशा प्रमाणात शिंपले मिळत नाहीत. 

   हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात चांगले उत्पादन मिळते. 

     शेततळ्यात कमीत कमी ५ ते ७ फूट सतत पाणी असावे. शिंपल्याच्यावर अडीच ते तीन फूट पाणी असावेत. उन्हाळ्यात तळ्यातील १ ते दीड फुटापर्यंत तापमान वाढते. त्याच्या खाली वाढत नाही.

     शेततळ्यात खेकडे नसावेत. 

     बॅच टाकण्यासाठी शेततळ्याला दोन्ही बाजूने दोऱ्या बांधण्यास जागा असावी

     शेततळ्यात फारसा पालापाचोळा पडणार नाही, याची काळजी घ्यावी. 
 शेततळे शक्यतो शांत जागी असावे. जास्त आवाजाच्या ठिकाणी शेततळे असल्यास आवाजामुळे मोती निर्मिती प्रक्रियेत अडथळा येतो.

     दोरी बांधतांना सकाळी ९ च्या आत किंवा सायंकाळी ५ वाजेनंतरच बांधाव्यात. शिंपल्याच्या दोऱ्या दुपारच्या वेळी (उन्हात) वर काढू नयेत.

     दोरी बांधतांना दोन शिंपल्यांतील अंतर अडीच ते तीन इंच अंतर असावे. 

     महिन्यातून एकदा शिंपल्यावरील चिकटलेले शेवाळ कपडे धुण्याच्या ब्रशने काढून टाकावे. 

     तळ्यात मासे असल्यास त्याचा मोती निर्मितीला उपयोगच होतो. शिंपले एका जागी असतात. मासा हा सतत फिरत असतो. त्यामुळे पाणी हलते व शैवाल हलते राहते. 

     सीफा संस्थेने १० बाय २० फुटांच्या हौदात मोती निर्मितीचेही प्रयोग केले आहेत. मात्र, त्यातून व्यावसायिक उत्पादन घेणे शक्य होत नाही. 

मोत्यांचे प्रकार व बाजारपेठ 
     राउंड मोती : गोल मोती जो अंगठीत वापरला जातो. या उत्पादनामध्ये चीन आणि जपान देश आघाडीवर आहेत. येथे १८ व्या शतकांपासून गोल मोत्याचे उत्पादन घेतले जाते. या मोत्यांच्या निर्मितीची प्रक्रिया अवघड असून, त्यासाठी अधिक काळ लागतो. मात्र, याला मागणीही चांगली आहे. 
 डिझाइन मोती : हे सीफाचे संशोधन आहे. उदा. साईबाबांचा साचा शिंपल्यात वापरून साईबाबांच्या मूर्तीच्या आकारातील मोती मिळवता येतो. धार्मिक क्षेत्रात विविध देवदेवता, क्रॉस अशा मोत्यांना जगभर मागणी असते. 
 भारतात जयपूर येथे मोती उत्पादनाची प्रयोगशाळा आहे. हैद्राबाद, कोलकाता (पश्‍चिम बंगाल) आणि मुंबईतील झव्हेरी बाजार येथील काही सोनार या मोत्यांची खरेदी करतात. विक्रीच्या अनुषंगाने अधिक अभ्यास सुरू आहे.  
 गोल मोती जितक्या अधिक कॅरेटचा तितकी त्याची किंमत जास्त मिळते. मात्र, बाजारात ५ ते ७ कॅरेट (एक ते दीड ग्रॅम वजनाच्या) मोत्यांना अधिक मागणी असते. 
 
खाद्य व्यवस्थापन  
पाण्यामधील सूक्ष्म शेवाळ हे शिंपल्यातील कालवांचे खाद्य आहे. ते तयार होण्यासाठी २० गुंठे शेततळ्यासाठी प्रति माह १० किलो शेण, दोन ते अडीच किलो सिंगल सुपर फॉस्फेट, युरिया २ किलो, दगडी चुना अडीच ते तीन किलो गाळून द्यावे.

एक हजार शिंपल्यांचे गणित
प्रातिनिधिक खर्च

 शिंपले मिळवण्यासाठी ५०० रुपये.
 शिंपले सोडण्यासाठी जाळी (एक किलो) ५०० रुपये.
 नायलॉन दोरी : ६०० रु. 
 शस्त्रक्रियेची साधने (डिसेक्शन बॉक्सप्रमाणे) - ७०० रु.
 खते - १००० रु.
 १२ महिने कालावधीत देखभालीसाठी कायमस्वरुपी माणसांची आवश्यकता नाही. मात्र, महिन्यातून एकदा शिंपल्यांच्या स्वच्छता, खते टाकणे यासाठी माणसे लागतात. : ६० हजार रुपये वार्षिक.
 अन्य किरकोळ खर्च : २० हजार रुपये. 
  एकूण खर्च ८३,३०० रुपये 
 सध्या आपल्या फार्मवरील यशाचा दर ६० टक्केच धरला तरी १००० शिंपल्यातून ६०० पर्यंत मोती मिळतात. सरासरी ३०० रुपये दराप्रमाणे १.८० लाख रुपये मिळू शकतात. खर्च वजा जाता एक लाखापर्यंत उत्पन्न मिळू शकते. 

मोत्याची शेती हे कौशल्याचे काम आहे. त्यासाठी शिक्षणापेक्षाही अनुभवाचीच गरज अधिक आहे. अशिक्षित व्यक्तीही ही शेती करू शकतो. मोत्याच्या शेतीतील बारकावे अद्यापही मी शिकत आहे. ज्ञान, कौशल्य या गुणांचा कस यात लागत असल्याने मी कष्टाचाही आनंद घेत आहे.
- सागर धुमाळ, ८५५१९८९७४७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com