तेलकट  डाग रोगातून वाचविली बाग

तेलकट  डाग रोगातून वाचविली बाग

शेळगाव (जि. पुणे) येथील भारत शिंगाडे यांनी प्रभावी व्यवस्थापनाच्या आधारे तीन एकरांतील तेलकट डाग रोगाने ग्रस्त बागेचे जणू पुनरुज्जीवनच केले आहे. रोगाचा तीव्र प्रादुर्भाव पाहता ही बाग त्यातून बाहेर पडेल याबाबत त्यांनी आत्मविश्वासच गमाविला होता. मात्र जिद्द, चिकाटी, संयम, योग्य मार्गदर्शन आणि जैविक व्यवस्थापन याद्वारे त्यांनी या बागेला नवसंजीवनी दिली. उल्लेखनीय उत्पादन घेत गमाविलेला आत्मविश्वासही पुन्हा खेचून आणला.

पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील शेळगाव हे डाळिंब शेतीसाठी प्रसिद्ध असलेले गाव. आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित व्यवस्थापनाच्या आधारे येथील शेतकरी गुणवत्तापूर्ण डाळिंबाचे उत्पादन घेत असतात. शेळगावातील भारत शिंगाडे यांची एकूण पाच एकर शेती आहे. डाळिंब हेच सध्या त्यांचे मुख्य पीक असून, त्याचे चार एकर क्षेत्र आहे. दोन ठिकाणी स्वतंत्र प्लॉट्स आहेत. त्यातील एक एकरातील बागेतून त्यांना मागील वर्षी सुमारे सात टनांपर्यंत उत्पादन मिळाले. दिवाळी ते फेब्रुवारी या दरम्यान विक्री झालेल्या मालाला किलोस ५० ते ७० रुपये दर मिळाला. शिंगाडे या प्रयोगाबाबत समाधानी होते. 

तेलकट डाग रोगात सापडली बाग 
शिंगाडे यांनी भगवा वाणाच्या डाळिंबाच्या आपल्या तीन एकरांतील स्वतंत्र प्लॉटचे नियोजनही उत्साहाने सुरू केले. पहिल्या बहराचे उत्पादनही घेतले. तीन एकरांत १५ ते १६ टनांच्या आसपास म्हणजे एकरी पाच टन उत्पादन मिळाले. अर्थात, त्या वेळी बागेत तेलकट डाग रोगाचा वीस टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात आले. त्यावर उपाय करण्याचे नियोजन करून पुढील बहरही धरला. त्या वेळी प्रति झाडावर १५० ते २०० फळे होती. मात्र तेलकट डाग रोगाचे प्रमाण इतके वाढत गेले की नियंत्रण हाताबाहेर गेले. तीन एकरांत असलेली सुमारे १४०० झाडे प्रादुर्भावग्रस्त झाली. प्रादुर्भावित भाग बागेबाहेर काढून त्यांचा नायनाट करावा लागला. सुमारे चार ट्रेलर एवढी रोगग्रस्त डाळिंबे बागेबाहेर काढून टाकणे म्हणजे शिंगाडे यांच्या धैर्याची परीक्षाच होती.    
बाग तोडण्याची मानसिकता 
दुसऱ्या बहरात हाती काहीच लागले नाही. शिंगाडे पूर्ण निराश झाले. आत्मविश्वासच हरवून बसले. प्रादुर्भावाची तीव्रता पाहता पुढील कोणताच हंगाम आपण साधू शकत नाही हे त्यांच्या डोक्यात पक्के बसले. संपूर्ण तीन एकर बाग तोडून टाकण्याचा विचार त्यांनी केला. अशातच बारामती येथील त्यांचे सल्लागार मित्र त्याचबरोबर बारामती कृषी विज्ञान केंद्र त्यांच्या मदतीला धावले. त्यांनी धीर दिला. प्रभावी जैविक व्यवस्थापन केल्यास बागेला पुन्हा एकदा संजीवनी मिळू शकते असा विश्वास त्यांनी शिंगाडे यांना दिला.

बागेचे जैविक व्यवस्थापन
शिंगाडे यांनीही सल्लागारांचे म्हणणे प्रमाण मानूले. आॅगस्ट- सप्टेंबर काळात बाग छाटल्यानंतर केव्हीकेच्या सल्ल्यानुसार ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक व पॅसिलोमायसीस हे दोन घटक जमिनीतून दिले. कळी सेट व्हावी यासाठी कंपनीचे संजीवक वापरले. मुख्य अन्नद्रव्यांबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा स्प्रे घेतला. जमिनीखालून अॅझोटोबॅक्टर, स्फुरद व पालाश विरघळवणारे जिवाणू (अनुक्रमे पीएसबी व केएसबी) हे देखील दिले. फुलोरा अवस्थेत केव्हीकेतर्फे परागीभवनासाठी मधमाश्यांची पेटी देण्यात आली होती. संपूर्ण बहरात जैविक घटकांचाच वापर करण्यावर भर असल्याने मधमाशीला हानी पोचण्याची तशी समस्या नव्हती.

रासायनिक कीडनाशकांचा कमी वापर 
शिंगाडे म्हणाले, की पूर्वी फूलकिडे वा अळीच्या नियंत्रणासाठी आठवड्यातून किमान दोन स्प्रे व्हायचे. ठिबक सिंचनातून रसायने सोडूनही कुजीची समस्या राहायची. यंदाच्या बहरात मात्र आठवड्याला किंवा पंधरवड्यातून एखादा स्प्रे झाला. रासायनिक कीडनाशकांच्या फवारण्या पूर्वीच्या तुलनेत किमान ३० ते ५० टक्क्यांनी कमी झाल्या. अगदी गरज भासली तेथेच रसायने वापरली. जैविक कीडनाशकांमध्ये नीमतेल, व्हर्टिसिलियम लेकॅनी यांच्या फवारण्या आठवड्यातून दोन वेळा लागोपाठ घेतल्या. तेलकट डाग रोगाच्या नियंत्रणासाठी स्युडोमोनास आणि बॅसिलस सबटिलिस यांचा वापर फवारणीद्वारे १२ ते १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा केला. 
 
प्रयोगातून उंचावला आत्मविश्वास 
चिकाटीने बागेचे व्यवस्थापन करीत राहिल्याचे चांगले फळ शिंगाडे यांच्या वाट्यास आले. तेलकट डाग रोगामुळे बाग आपल्या हातून गेली, पुढे वाचू शकत नाही असा विचार करून बाग काढण्याच्या विचारापर्यंत शिंगाडे आले होते. त्याच तीन एकरांतून ३० टन म्हणजे एकरी १० टन उत्पादन घेण्यात त्यांनी यश मिळवले. तेलकट डाग रोगावर त्यांनी चांगले नियंत्रण मिळवले. बागेत फळांवर कुठेही तेलकट डागाची लक्षणे आढळली नाहीत. गमावलेला आत्मविश्वास शिंगाडे यांनी पुन्हा कमावला. आता बागेतून अधिक गुणवत्तेचे उत्पादन घेण्यासाठी ते सरसावले आहेत. पूर्वीच्या व्यवस्थापनात होणारा दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्चही आता एक लाख रुपयांनी कमी झाला हे देखील वेगळे समाधान आहेच.

सनबर्निंग रोखण्याचा प्रयोग 
उत्पादनाने समाधान दिले. पण संकटांनी पाठ सोडली नाही. सुमारे वीस टन उत्पादन उत्तम गुणवत्तेचे होते. मात्र भर उन्हाळ्यातील तीव्र तापमानाचा फटका १० टन डाळिंबांना बसला. ‘सनबर्निंग’ होऊ नये म्हणून एक एकर बागेतील प्रत्येक फळ पॉलिथिनच्या छोट्या बॅगने झाकण्याचा केलेला प्रयोग यशस्वी ठरला. एकूण २० किलो बॅग्स वापरल्या. प्रतिबॅग ४० पैसे तर मजुरीसह एकरी १५ हजार रुपये खर्च आला. या प्रयोगात फळांची चमकदेखील चांगली होती. 

दरांनी केली निराशा  
चांगल्या दरांची प्रतीक्षा होती. मात्र यंदा ती काही पूर्ण झाली नाही. किलोला ३५ ते ४० रुपये दर मिळाला. दहा टन मालाची विक्री जागेवर झाली. तर पुणे, इंदापूर व सोलापूर या ठिकाणी उर्वरित माल विकला.  
भारत शिंगाडे, ९६८९३२५५०४

ठळक बाबी 
शिंगाडे म्हणाले, की जैविक खतांच्या वापराने बागेतील पांढऱ्या मुळींची संख्याही चांगली वाढली. पूर्वी सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होता. त्या वेळी रान उकरायचे म्हटले तरी ते उकरले जायचे नाही. आता रान अगदी भुसभुशीत झाले आहे. 
तीन एकर बागेत पहिल्या बहराच्या वेळी १६ ट्रेलर शेणखत व दोन ट्रेलर राख यांचा वापर केला.   
शिंगाडे यांना शेतीत भावाचीही समर्थ साथ आहे. आईसह त्यांचे संयुक्त कुटुंब गुण्यागोविंदाने एकत्र नांदते आहे. वडिलांच्या निधनानंतर दोन हजार सालापासून शिंगाडे शेतीची जबाबदारी समर्थपणे निभावत आहेत. 

काळ्या जमिनीत प्रभावी व्यवस्थापन 
शिंगाडे यांच्याकडे पूर्वी ऊस होता. मात्र त्यास मिळणारे असमाधानकारक दर पाहून ते डाळिंबाकडे वळले. केव्हीकेकडून माती परीक्षण करून घेतल्यानंतर काळ्या जमिनीत डाळिंब घेऊ नये, असा सल्ला त्यांना मिळाला होता. मात्र शिंगाडे यांना दुसरा प्रभावी पर्यायही दिसत नव्हता. मात्र जिद्द बाळगून रोटाव्हेटर फिरवून, दोन वेळा नांगरट करून त्यांनी जमीन चांगली तयार केली. ठिबक केले. निचरा होण्यासाठी चाऱ्या काढल्या. मागील वर्षी पावसाळ्यात शेळगावातील सुमारे ७० टक्के बागा फेल गेल्या, त्या तुलनेत आपल्या पिकाची व जमिनीची परिस्थिती चांगली असल्याचे शिंगाडे यांनी अभिमानाने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com