मेळघाटातील जीवनमान उंचावण्यासाठी शेतकरी कंपनी झाली सक्रिय

शेतकरी कंपनीची काटकुंभ व हतरू येथील कृषी सेवा केंद्रे.
शेतकरी कंपनीची काटकुंभ व हतरू येथील कृषी सेवा केंद्रे.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा आदिवासी, वन्य टापूचा प्रदेश. दळणवळण, संवादाच्या पुरेशा सोयी नाहीत. शासकीय यंत्रणांचा अभाव. अशा प्रतिकूल परिस्थितीत या भागातील ‘मेळघाट कृषकमित्र शेतकरी उत्पादक कंपनी’ नवी उद्दिष्टे, महत्त्वाकांक्षा घेऊन कार्यरत झाली आहे. तूर, हरभरा तसेच बीजोत्पादनातून येथील शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करताना दोन कृषिसेवा केंद्रांच्या माध्यमातून निविष्ठा सेवाही देण्यात तत्पर झाली आहे. 

व्याघ्र संरक्षित प्रकल्प, घनदाट जंगल त्यासोबतच दळणवळणाच्या पुरेशा सोयीसुविधा नाहीत असा मेळघाटचा टापू. हा भाग येतो अमरावती जिल्ह्यात. ‘मोबाईल नेटवर्क’ही जेमतेम काही गावातंच मिळते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांशी संपर्क साधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

प्रामुख्याने आदिवासी शेतकऱ्यांची संख्या येथे अधिक आहे. कुपोषण ही समस्या या भागात गंभीर बनली आहे. परंतु, प्रतिकूल परिस्थिती हीच खरे तर बदलाची, नव्या वाटा शोधण्याची संधी असते.

त्या दृष्टीने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे उद्दीष्ट घेऊन मेळघाट कृषकमित्र शेतकरी उत्पादक कंपनी कार्यरत आहे.

मेळघाटात कार्यरत शेतकरी कंपनी 
     चिखलदरा तालुक्यातील गांगरखेडा येथे या शेतकरी कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय  
     मेळघाट परिसरातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचावे हे कंपनीचे उद्दीष्ट 
     कंपनीचे दहा संचालक तर ३८२ भागधारक. प्रति एकहजार रुपयांचा समभाग (शेअर) असलेल्या या कंपनीची स्थापना सात मार्च २०१६ रोजीची.
     भविष्यात शेतीपूरक उद्योगाच्या उभारणीसाठी भागभांडवल हवे यासाठी कंपनी संचालक होण्यासाठी दहा हजार रुपये भरण्याची अट घालण्यात आली. त्याला या भागातील काहींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. काटकुंभ गावानजीकच्या दहा गावांतील संचालक आज कंपनीसोबत आहेत.

सध्याचे कंपनीचे प्रयत्न 
     तीन कृषी सेवा केंद्रे- पैकी काटकुंभ व हतरू अशा दोन ठिकाणी चालू अवस्थेत
     तूर, हरभरा यांचे उत्पादनवाढीचे प्रकल्प- मागील वर्षापासून सुरू
     यंदा हरभरा बीजोत्पादन
     शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याचे नियोजन
     बांधावरून शेतमालाची खरेदी
     शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचविणे, त्यासाठी     चिखलदरा कृषी विभाग व तज्ज्ञांच्या सहकार्याने कार्यशाळांचे आयोजन
     अंजनगावसुर्जी येथील एका संस्थेच्या माध्यमातून कवचबीज या आयुर्वेदीक वनस्पतीच्या लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात आला. वनौषधींच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न  

निविष्ठांसाठी १२० किलोमीटरचा प्रवास
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणराज पाटील म्हणाले, की शेजारील अचलपूर तालुक्यातील एकूण सुमारे १५६ कृषी सेवा केंद्रे आहेत. मात्र चिखलदरा तालुक्यात त्यांची संख्या सातपेक्षा जास्त नाही. 

अशा वेळी या तालुक्‍यातील काटकुंभ व नजिकच्या ३० ते ३२ गावांतील शेतकऱ्यांना बियाणे, खते किंवा कोणत्याही निविष्ठा खरेदी करण्यासाठी अचलपूर तालुक्‍यातील परतवाडा येथे जावे लागे. एकवेळचे ५५ किलोमीटर जाणे आणि तेवढाच परतीचा असा किमान १२० किलोमीटरचा प्रवास त्यासाठी करावा लागे. खरेदीनंतरही भाडेतत्त्वावर वाहन घेऊन खत वा बियाणे गावापर्यंत आणावे लागत होते. यात शेतकऱ्यांचा मोठा खर्च व्हायचा. शिवाय श्रमही खूप लागायचे. 

शेतकरी- खरेदीदार यांच्यातील दुवा
मेळघाट भागातील शेतकरी रासायनिक निविष्ठांचा वापर अत्यल्प करतात किंवा करीतच नाहीत. त्यामुळे उत्पादीत माल नैसर्गिक किंवा सेंद्रियच असतो. त्यामुळे सेंद्रीय माल खरेदीदार या भागात अनेकवेळा येतात. परंतु, एकाच ठिकाणावरून हजारो क्‍विंटल मालाची उपलब्धता कशी होईल याविषयी त्यांना माहिती मिळत नाही. शेतकऱ्यांकडील जमीनधारणा जेमतेम असल्याने एक-दोन शेतकऱ्यांकडून खरेदी करणे त्यांनाही किफायतशीर होणारे नसते. अशावेळी शेतकरी आणि खरेदीदार यांच्यातील दुवा बनण्याचे काम ही शेतकरी कंपनी करते. मुंबई येथील एका कंपनीने या शेतकरी कंपनीसोबत करार करून सोयाबीन खरेदीची तयारी दर्शविली आहे. काही निकषांवर क्विंटलला ३६०० रुपये दर निश्चित केला आहे. शेतकरी जेवढा पुरवठा करण्यास समर्थ असतील तेवढात घेण्याची या कंपनीची तयारी आहे. 

वाचले श्रम, वेळ
ही परिस्थिती बदलण्यासाठीच मेळघाट शेतकरी उत्पादक कंपनीने दोन कृषी सेवा केंद्रे सुरू केली आहेत. त्यासाठी लागणारे परवानेही मिळविले आहेत. नाममात्र नफ्यात शेतकऱ्यांना सेवा दिली जाते. पाटील म्हणाले की डीएपीच्या पोत्याची किंमत १७६ रुपये आहे. ते आम्ही शेतकऱ्यांना १४५ रुपयांत देतो. हतरु येथील कृषी सेवा केंद्र सद्यस्थितीत तोट्यात आहे. परंतु शेतकऱ्यांना गावपातळीवरच निविष्ठांची उपलब्धता व्हावी, यासाठी कंपनीने तोटा सहन करीत ही सेवा देणे सुरूच ठेवले आहे. चार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हतरु येथील व्यवस्थापन सांभाळले जाते. 

पूर्वी अगदी दोनशे रुपयांच्या निविष्ठा खरेदीसाठी अचलपूरला जाण्यासाठीचा एकूण खर्च तीनशे रुपयांपर्यंत यायचा. आता शेतकरी कंपनीने स्थानिक भागातच कृषी सेवा केंद्र सुरू केल्याने मोठी यातायात वाचली आहे. 
- रावजी लाभू जामूनकर, पाचडोंगरी, ता. चिखलदरा 

मेळघाट भागात कृषी तंत्रज्ञान अभावाने पोचत होते. आम्हाला जेव्हा बीजोत्पादन कार्यक्रमाची माहिती व त्याचे महत्त्व सांगण्यात आले त्या वेळी त्यात सहभाग घेण्यास आम्ही उत्सुक झालो. बीजोत्पादनातून नेहमीच्या शेतीपेक्षा अधिक लाभ मिळतात. हरभरा बीजोत्पादन आम्ही पहिल्यांदाच करणार अाहोत. त्यासाठी मेळघाट शेतकरी कंपनीने घेतलेला पुढाकार खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.
- इबास युनूस चव्हाण, काटकुंभ 

मेळघाटात चिखलदरा आणि धारणी हे दोनच तालुके आहेत. दोन्ही तालुक्‍यांचा विस्तार मोठा असल्याने कृषी विस्तारात शेतकरी उत्पादक कंपन्या, आत्मा गट आदींचे सहकार्य घेतले जाते. त्यादृष्टीने शेतकरी कंपनीने घेतलेली आघाडी मोठी आहे. 
- शिवा बाबू जाधव, तालुका कृषी अधिकारी, चिखलदरा 

कंपनी विकणार हरभरा बियाणे 
हरभरा बीजोत्पादनासाठीही मेळघाटच्या या कंपनीने पुढाकार घेतला आहे. यंदाच्या हंगामात सुमारे २५० एकरांवर बीजोत्पादनाचा प्रयोग सुरू आहे. डोमी, चिलाटी, कारंजखेडा, सिंभोरी आदी गावातील शेतकरी यात सहभागी आहेत. हेच उत्पादन कंपनी पुढे बियाणे म्हणून विकणार असून त्यातून शेतकऱ्यांच्या खिशात पैसा येणार आहे.  
 
मागील वर्षीच्या प्रकल्पातील ठळक बाबी
     तूर- सुमारे ५०० शेतकरी सहभागी- एकरी उत्पादन- १२ क्विंटलपर्यंत
     हरभरा- सुमारे २५० एकरांवर- पूर्वी हे शेतकरी एकरी ८ क्विंटलपर्यंत उत्पादन घ्यायचे. मागील वर्षी सरासरी ८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. 
     नाफेडला मालाची विक्री.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com