पन्नास हजार टन खते मागणीअभावी पडून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

कोल्हापूर - पावसाने दडी मारल्याने दक्षिण महाराष्ट्रात (कोल्हापूर, सांगली) सुमारे पन्नास हजार टन खते शिल्लक पडली आहेत. पावसाअभावी पेरण्या लांबत असल्याने शेतकऱ्यांनी खतेच उचलली नाहीत. तसेच, ऊस उत्पादकांनीही पाऊस नसल्याने खते घालण्याचे नियोजन पुढे ढकलल्याने बहुतांशी कंपन्यांची गोदामे खतांनी तशीच भरलेली आहेत. लवकर पाऊस नाही पडला, तर या खतांचे करायचे काय, याच चिंतेत कंपन्यांबरोबर विक्रेतेही आहेत. 

कोल्हापूर - पावसाने दडी मारल्याने दक्षिण महाराष्ट्रात (कोल्हापूर, सांगली) सुमारे पन्नास हजार टन खते शिल्लक पडली आहेत. पावसाअभावी पेरण्या लांबत असल्याने शेतकऱ्यांनी खतेच उचलली नाहीत. तसेच, ऊस उत्पादकांनीही पाऊस नसल्याने खते घालण्याचे नियोजन पुढे ढकलल्याने बहुतांशी कंपन्यांची गोदामे खतांनी तशीच भरलेली आहेत. लवकर पाऊस नाही पडला, तर या खतांचे करायचे काय, याच चिंतेत कंपन्यांबरोबर विक्रेतेही आहेत. 

गोदामे फुल 
खत कंपन्यांच्या दृष्टीने दक्षिण महाराष्ट्र हा महत्त्वाचा पट्टा आहे. खरीप- रब्बी हंगामांबरोबर ऊस क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणात खतांचा पुरवठा होतो. पाऊस सुरू झाला की खरिपाची खते आणि उसासाठी अशा दोन्ही प्रकारच्या खतांसाठी एकाच वेळी मागणी असल्याने दोन्ही जिल्ह्यांतील खरेदी- विक्री संघ मे च्या अखेरीसच गोदामे खतांनी भरून ठेवतात. जूनच्या पहिल्या सप्ताहात पाऊस झाल्यास पहिल्या पंधरवड्यातच जिल्ह्यातील बहुतांशी खतांची गोदामे रिकामी होतात. मे महिन्याच्या शेवटी शेवटी काही भागांत चांगला पाऊस झाल्याने धुळवाफ पेरण्या वेगात झाल्या. 

पावसाने केला अपेक्षाभंग 
यानंतर पावसाचीही शक्‍यता वर्तविण्यात आली. पहिल्या टप्प्यात तरी पाऊस येईल या अपेक्षेने खतविक्रेत्यांबरोबरच  खरेदी- विक्री संघांनीही या वर्षीच्या पेरणीचा अंदाज घेत व वाढलेले ऊस क्षेत्र पाहून मोठ्या प्रमाणात रासायनिक खते खरेदी करून स्टॉक करून ठेवला. पहिल्या आठवड्यात पावसाची भुरभुर होती. दुसऱ्या आठवड्यात काहीसा जोर चढेल असे वाटत असतानाच सर्वत्र कडक ऊन पडत असल्याने पेरण्यांची गती प्रचंड मंदावली. झालेल्या पेरण्याच संकटात आल्याने शेतकऱ्यांनी खतांकडे दुर्लक्षच केले. यामुळे खतांच्या दुकानांत शुकशुकाट पसरला. याचा परिणाम खत विक्रेत्यांच्या जूनच्या व्यवहारावर झाला आहे. जूनमध्ये शेतकऱ्यांनी खरेदी- विक्री संघ फुललेले असतात. नवी- जुनी देणी क्‍लीअर करून शेतकरी खते शेतात नेण्यासाठी धडपडत असतात. परंतु यंदा पाऊसच नसल्याने सगळ्या खरेदी केंद्रांमध्ये शुकुशकाट आहे. परिणामी खतांची विक्री कशी करायची, या चिंतेत विक्रेते आहेत. 

जूनच्या पहिल्या पंधरवड्यात आमची गोदामे मोकळी होतात; पण सध्या पाऊस नसल्याने खतांची मागणी क्वचितच होत आहे. जूनच्या मागणीच्या तुलनेत दहा टक्केही मागणी नाही. यामुळे आमच्या अर्थकारणावरच परिणाम झाला आहे. 
- व्ही. एल. खोत, व्यवस्थापक, यशवंत तालुका खरेदी- विक्री संघ, पन्हाळा, जि. कोल्हापूर 

माझी ऊस शेती आहे. मी पावसाळ्यामध्ये जूनच्या मध्याला खतांचा डोस देतो. परंतु कडक ऊन असल्याने जोपर्यंत संततधार पाऊस लागत नाही, तोपर्यंत खते देण्याचे वेळापत्रक मी पुढे ढकलले आहे. 
- रामराव पाटील, कापशी, जि. कोल्हापूर