भारतातील पहिल्या जीआयचा मानकरी दार्जिलिंगचा चहा

गणेश हिंगमिरे
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

भारत हा चहाचा सर्वांत मोठा उत्पादक अाहे. सन २००२ मध्ये भारताने ८४६ दशलक्ष किलो चहा उत्पादित केला. जगातील एकूण चहा उत्पादनापैकी ३१ टक्के चहा एकट्या भारताने उत्पादित केला, अशी विशेष नोंद करण्यात आली आहे.

भारत हा चहाचा सर्वांत मोठा उत्पादक अाहे. सन २००२ मध्ये भारताने ८४६ दशलक्ष किलो चहा उत्पादित केला. जगातील एकूण चहा उत्पादनापैकी ३१ टक्के चहा एकट्या भारताने उत्पादित केला, अशी विशेष नोंद करण्यात आली आहे.

दार्जिलिंगच्या चहाची गुणवत्ता 
भारतात उत्पादित अनेक प्रकारच्या चहापैकी दार्जिलिंग चहा हा एका शतकापेक्षा जास्त काळापासून त्याची गुणवत्ता आणि चवीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे दार्जिलिंग भागातील भौगालिक परिस्थिती. समुद्रसपाटीपासून दोन हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर या चहाच्या बागा वसल्या आहेत. उत्तम डोंगराळ पर्जन्यमान हे या चहाच्या लागवडीसाठी वरदान आहे. हवेतील विशेष आर्द्रता, बाष्पीभवन दर, वाऱ्याची गती, दररोज दोन ते चार तास मिळणारा सूर्यप्रकाश, भरपूर ढग आणि धुके असे अद्वितीय वातावरण या चहाच्या उत्पादनासाठी अनुकूल आहे. याच हवामानामुळे दार्जिलिंग प्रदेशातील चहाची गुणवत्ता नैसर्गिकरित्या खुलली आहे. त्यातूनच या चहाने जग पादाक्रांत केले आहे.

मातीचा गुणधर्म 
दार्जिलिंग प्रदेशातील माती चहाच्या लागवडीसाठी अतिशय उपयुक्त आहे. भारतात इतर चहाच्या पट्ट्यातील जमिनीचा सरासरी कार्बन स्तर एक टक्क्यापेक्षा कमी आहे. परंतु दार्जिलिंग प्रदेशामध्ये हे प्रमाण जास्त आहे. वन क्षेत्रातील सेंद्रिय पदार्थांतून व अंतर्भूत खडकांच्या समृद्धीमुळे इथल्या मातीमध्ये आवश्यक पोषकद्रव्ये आहेत.

पहिला जीआय मिळाला 
दार्जिलिंग चहा हे २००४ मध्ये “जीआय” टॅग प्राप्त करणारे पहिले भारतीय उत्पादन ठरले आहे. हा चहा जगातील सर्वांत महागडा आणि अतिशय स्वादयुक्त आहे. या चहाने युरोपमध्येही जीआय संकेत मिळविला आहे. दरवर्षी जपान, रशिया, अमेरिका, इंग्लंड अादी देशांत हा चहा निर्यात केला जातो.  

पारंपरिक उत्पादन आणि कुशल सहकारी  
दार्जिलिंग प्रांतातील चहाची लागवड येथील स्थानिक अनेक पिढ्यांपासून करीत आले आहेत. त्यामुळे स्थानिक व्यवस्था कुशल कामगारांनी चोख केली आहे. या पारंपारिक ज्ञानाचा फायदा चहाचे पीक घेण्यासाठी होतो.

चहाच्या बागेतील मुख्य कामगारांची कार्यशक्ती स्त्री प्रधान अाहे. येथील महिला चहाची शेती फारच कुशलतेने करतात. चहाची झाडे अत्यंत संवेदनशील असतात. त्यामुळे या कुशल स्त्रिया फार महत्त्वाची भूमिका बजावतात. दार्जिलिंगच्या चहा उद्योगात ५२ हजारांहून जास्त लोकांना कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. चहाच्या खुडणीसाठी आणखी १५ हजार लोकांचा  उद्योगास हातभार लागला आहे. या कार्यशक्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात स्त्रियांची संख्या सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त आहे. येथे कामगारांना मोफत निवास व्यवस्था, अन्नधान्य आणि विनामूल्य वैद्यकीय सेवा पुरवली जाते. 

चहाचा आंतरराष्ट्रीय प्रवास
आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव टिकवून ठेवण्यासाठी सर्वांत महत्त्वाची बाब असते, ती म्हणजे निर्यात केल्या जाणाऱ्या उत्पादकाची गुणवत्ता टिकवणे. त्यासाठी दार्जिलिंग चहाचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नियोजन करण्यात आले. याअंतर्गत १९५३ च्या कायदा प्रणालीनुसार दार्जिलिंग चहाच्या वितरकांना वार्षिक परवाना शुल्क भरल्याबद्दल भारतीय चहा मंडळासोबत करार करणे बंधनकारक असते. त्याचबरोबर चहाचे उत्पादन, संबंधित माहिती, लिलाव किंवा विक्री संबंधित सर्व नियमांचे पालन करण्यासंबंधी प्रक्रियेवर देखरेख ठेवली जाते. अशा प्रकारे विक्री होणाऱ्या दार्जिलिंग चहाच्या एकूण खंडांची गणना तयार करण्यासाठी चहा बोर्डाने नियम सक्षम केले. या प्रमाणीकरण प्रक्रियेअंतर्गत दार्जिलिंग चहाशी संबंधित १७१ कंपन्या चहा मंडलाकडे नोंदणीकृत आहेत. त्यातील ७४ कंपन्या उत्पादक, तर ९७  निर्यात करणाऱ्या आहेत. चहाच्या गुणवत्तेची खात्री देणारे प्रमाणपत्रक मिळाल्यानंतर त्याची निर्यात करण्याची परवानगी दिली जाते. 

आंतरराष्ट्रीय संस्थेची नियुक्ती
दार्जिलिंग चहा आणि लोगोचा गैरवापर रोखण्यासाठी चहा मंडळाने १८८६ सालापासून कॉम्प्युमार्कची सेवा बजावली आहे. त्यामुळे लोगोचा अनधिकृत वापर केल्यास ते उघडकीस येते. 

शासनाकडून जारी करण्यात आलेल्या विविध आदेशांची तसेच चहाची लागवड, प्रक्रिया व विक्री या सर्व प्रक्रिया नियमांचे पालन आणि अंमलबजावणीची जबाबदारी चहा मंडळ अर्थात टी बोर्ड ऑफ इंडिया अनेक वर्षांपासून बजावत आहे. ‘दार्जिलिंग प्लॅन्टर असोसिएशन’च्या सहकार्याने दार्जिलिंग चहासाठी उत्पादक मंच प्राप्त करून देण्यामागे या मंडळाचा मोठा वाटा आहे.

संरक्षण आणि अंमलबजावणी
जपान, फ्रान्स, रशिया, अमेरिकेत या चहाचे नाव व लोगो यांचे संरक्षण करण्यासाठी चहा मंडळाला अथक प्रयत्न करावे लागले. त्याची कायदेशीर प्रक्रिया आणि नोंदणी, आंतरराष्ट्रीय पाहणी संस्थेची  नियुक्ती आणि परदेशातील न्यायालयात  लढा देण्यासाठी भारताने हजारो डॉलर्स खर्च केले. 

सध्या दार्जिलिंगमध्ये १५० वर्षांहून अधिक काळापासून उच्च दर्जाच्या चहाची निर्मिती होते. या चहाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच निर्यातीतील आवश्यक देखरेखीसाठी चहा मंडळ कार्यरत आहे. दार्जिलिंग चहा, त्याचा जीआय आणि लोगोचे संररक्षण करण्यासाठी दार्जिलिंगमधील चहा उत्पादकांचाही मोठा वाटा आहे. मंडळ व शेतकरी यांच्यातील समन्वयामुळेच या चहाला जागतिक पातळीवर संरक्षण मिळाले.
- गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१ (लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)