वाया जाणारा भाजीपाला, शेणापासून दर्जेदार गांडूळखत निर्मिती

वाया जाणारा भाजीपाला, शेणापासून दर्जेदार गांडूळखत निर्मिती

भाजीपाला व जनावरे बाजार यांच्यासाठी सातारा जिल्ह्यातील कराड शेती उत्पन्न बाजार समिती प्रसिद्ध आहे. बाजार परिसरात जनावरांचे पडणारे शेण व भाजीपाला यांचा योग्य विनियोग व्हावा यासाठी बाजार समितीने गांडूळखत युनिट उभारणी केली आहे. त्याद्वारे उत्कृष्ट खताची निर्मिती केली जात आहे. शेतकऱ्यांना नाममात्र किमतीत दर्जेदार खत उपलब्ध होत आहे.

सातारा जिल्ह्यातील कराड हे तालुक्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. 
जिल्ह्यातील सर्वात मोठी म्हणून कराड शेती उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. अत्यंत जुनी बाजार समिती अशी तिची अोळख असून स्थापना १९४४ ची आहे. भाजीपाला, गूळ आणि जनावरांसाठी ही बाजार समिती राज्यात प्रसिद्ध आहे.

बाजार समितीत मिळणाऱ्या सुविधा
कराड बाजार समितीत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, गोडाऊन, व्यापारी तसेच शेतकऱ्यांना बसण्यासाठी  कट्टे, लिलावसाठी सेस हॉल आहेत. त्याचप्रमाणे अंतर्गत वाहतुकीसाठी कॉंक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांसाठी प्रत्येक वर्षी भव्य कृषी प्रदर्शनाचे अायोजन केले जाते. त्यास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. बाजार समितीतमध्ये शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली असून लवकरच त्याची सुरवात केली जाणार आहे.

गूळ बाजार 
येथील बाजार समितीत नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दैनंदिन गुळाचे लिलाव होतात. नोव्हेंबर महिन्यापासून गुळाच्या आवकेस सुरवात होते. कर्नाटक, सांगली, कोल्हापूर तसेच स्थानिक शेतकऱ्यांकडून गूळ येथे येतो. खुल्या पद्धतीने लिलाव होतात. 

भाजीपाला शेतमालासाठी प्रसिद्ध 
जिल्ह्यात सर्वात मोठी अशी अोळख असलेल्या या बाजारसमितीत भाजीपाल्याची सर्वाधिक आवक होते. विशेष म्हणजे शुक्रवारचा दिवस वगळता हा बाजार दररोज सुरू असतो. येथे विविध भाजीपाल्याची आवक चांगली होते. त्यामुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधदुर्ग या जिल्ह्यांतील व्यापारी येऊन येथे खरेदी करतात. साहजिकच दरही चांगला मिळतो.  

जनावरांचा बाजार
कराड बाजार समितीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दर गुरुवारी भरणारा जनावरे बाजार. 

इतिहासाचे संदर्भ तपासायचे तर १९६९ मध्ये तो सुरू करण्यात आला. पश्‍चिम महाराष्ट्रातील मोठा बाजार म्हणून त्याची अोळख असल्याने मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीसाठी येतात. प्रत्येक महिन्याला  

बैल, गाई, म्हशी, शेळ्या- मेंढ्या आदींची एकूण पाच ते सहाहजारांच्या संख्येने आवक होते. खरेदी विक्रीसाठी स्थानिकासह शेजारील जिल्ह्यातून शेतकरी, व्यापारी येथे येतात. 

महिन्याला जनावरे बाजाराच्या माध्यमातून सुमारे सहा ते सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. तर हा बाजार व भाजीपाला बाजार असे मिळून हे उत्पन्न आठ ते नऊ लाख रुपयांचे होते.   

विक्री व उत्पन्न 
शेतकऱ्यांना प्रति किलो सात रुपये या दराने गांडूळखताची विक्री केली जाते. त्यातून वर्षाला एक लाख ते एक लाख ३० हजार रुपयांपर्यंतचे अर्थार्जन बाजार समितीस होते. शेतकऱ्यांना त्याची अागाऊ नोंदणी करावी लागते. गेल्या तीन वर्षांपूर्वी सुरू असलेल्या या प्रकल्पास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे खतनिर्मिती वाढवण्यासाठी आणखी पाच बेडस तयार करण्यात आले आहेत. 

गांडूळखत प्रकल्प 
जनावरांसह भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने पाला तसेच मोठ्या प्रमाणात शेण  या परिसरात उपलब्ध व्हायचे. त्याचा योग्य विनियोग होत नव्हता. त्यादृष्टीने माजी सहकार मंत्री विलास पाटील-उंडाळकर यांनी गांडूळखत प्रकल्प सुरू उभारण्याचे निश्‍चित केले. त्यानुसार प्रकल्पाचा आराखडा व उभारणीही झाली. मात्र २०१५ मध्ये तो कार्यान्वित झाला. जनावरांच्या बाजाराच्या पश्‍चिमेस सुमारे २० गुंठे क्षेत्रात सुमारे सहा लाख रुपये खर्च त्यासाठी करण्यात आला. 

प्रकल्पाची कार्यपद्धती 
प्रकल्पात सात फूट रुंदी व पंधरा फूट लांब असे दहा लोखंडी बेड तयार करण्यात आले. 
यावर गोलाकार पद्धतीचा सांगाडा आहे. त्यावर हिरवे नेट झाकले आहे. 
बेडसाठी कट्टे बांधले आहेत. 
बाजार समितीच्या आवारात उपलब्ध होणारे शेण तसेच भाजीपाला या बेडमध्ये टाकला जातो. 
कल्चरचा उपयोग करून दर्जेदार गांडूळखत तयार केले जाते. 
सुमारे ४५ दिवसांत खताचा एक लॉट तयार होतो. 
तयार झालेले खत यंत्राद्वारे चाळून घेतले जाते. त्यानंतर ते विक्रीस पाठवले जाते. 
पावसाळ्याचे दोन ते तीन महिने वगळता वर्षाला तीन 
बॅचेस घेतल्या जातात. 
वर्षाला काही टन गांडूळखत तयार होते. 
गांडूळखत युनिटचे फायदे 
बाजार समितीच्या आवारात स्वच्छता राहण्यास मदत झाली  
शेतकऱ्यांसाठी नाममात्र किंमतीत दर्जेदार गांडूळखत उपलब्ध होते.  
बाजार समितीच्या उत्पादन वाढ झाली आहे. 

गांडूळखत युनिटमुळे बाजार परिसरात साचणारा पाला व शेण यांचा उत्तमपणे विनियोग करता आला. दर्जेदार गांडूळखत निर्मितीमुळे शेतकऱ्यांना जमीन सुपीक करण्याबरोबरच पीक उत्पादनात वाढ करणे शक्य होणार आहे. 
- आत्माराम जाधव, उपसभापती, कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समिती

माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या संकल्पनेतून गांडूळखत निर्मिती उपक्रम सुरू झाला. या युनिटमध्ये तयार होणाऱ्या खतास चांगली मागणी अाहे. 
- बाबासाहेब निंबाळकर, सचिव  : ९८२२१९१९०३

बाजार समितीतून मिळणारे गांडूळखत उत्कृष्ट दर्जाचे आहे. झुकेनी, कलिंगड, टरबूज, टोमॅटो या पिकांत त्याचा वापर करीत आहे.  
- सतीश देसाई, काले, ता. कऱ्हाड. 
- बाजार समिती - 20164-222228 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com