शेतकरी अन् प्रक्रियादारांच्या प्रयत्नांतून ‘गीतांजली’ तांदळाची वाढली मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

कटक येथील राष्ट्रीय भात संशोधन संस्थेने पुढाकार घेत भात उत्पादक, बियाणे उत्पादक कंपनी, महिला गट आणि प्रक्रिया कंपनीच्या माध्यमातून गीतांजली भात लागवड आणि विक्रीचा प्रकल्प यशस्वीपणे राबविला आहे. 

कटक येथील राष्ट्रीय भात संशोधन संस्थेने पुढाकार घेत भात उत्पादक, बियाणे उत्पादक कंपनी, महिला गट आणि प्रक्रिया कंपनीच्या माध्यमातून गीतांजली भात लागवड आणि विक्रीचा प्रकल्प यशस्वीपणे राबविला आहे. 
राष्ट्रीय भात संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी पहिल्यांना भात प्रक्रियादार आणि विक्रेत्यांशी चर्चा केली. या चर्चेतून ‘गीतांजली’ या भात जातीची निवड करण्यात आली. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे याचे दाणे लांबट आहेत; तसेच तांदळाला सुगंध आहे. या गुणधर्मामुळे ग्राहकांच्याकडून या तांदळाला चांगली मागणी असते. ‘गीतांजली’ जातीचे बियाणे ओडिशा राज्यातील भात उत्पादकांच्यापर्यंत पोचण्यासाठी राष्ट्रीय भात संशोधन संस्थेने मूलभूत बियाणे या प्रकल्पात सहभागी झालेल्या बियाणे कंपनीला दिले. या कंपनीने सत्यप्रत बियाणे तयार करून शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचविले. 

अनन्या महिला समितीने विविध गावांतील भात उत्पादकांच्यापर्यंत या प्रकल्पाची माहिती पोचविली. महानग कृषक विकास मंच या शेतकरी गटाने लागवडीचे तंत्र, व्यवस्थापनाबाबत उत्पादकांना मार्गदर्शन केले. या प्रकल्पाच्या माध्यमातून १६६ एकरावर ‘गीतांजली’ भात जातीची लागवड झाली. 

शेतकरी गट तसेच संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी विविध गावांतील शेतकऱ्यांना भात लागवडीचे सुधारित तंत्र, पीक व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. त्यामुळे तंत्रज्ञानाचा जलद गतीचे प्रसार झाला. सुधारित तंत्राने लागवड आणि तज्ज्ञांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ४ ते ४.५ टन उत्पादन मिळाले. प्रक्रिया करणाऱ्या कपंन्यांनी थेट शेतकऱ्यांकडून भाताची खरेदी केली. या प्रकल्पात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना बाजार दरापेक्षा २० टक्के जादा दर मिळाला. कंपनीने भात खरेदीपासून दहा दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पैसे दिले.  प्रकल्पात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी आणि घरगुती वापरासाठी काही प्रमाणात भात ठेवले. प्रकल्पात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी २०२ टन भात प्रक्रिया कंपनीला विकले. प्रक्रिया कंपन्यांनी दर्जेदार तांदळाची निर्मितीकरून बाजारपेठेत विक्री केली. ग्राहकांकडून या तांदळाची मागणी वाढू लागली आहे.