ब्रॉयलर कोंबड्यांना द्या मोजून खाद्य

ब्रॉयलर कोंबड्यांना द्या मोजून खाद्य

कोंबड्यांना देण्यात येणारे खाद्य तपासून घ्यावे. शेडमध्ये साधारण पन्नास कोंबड्यांसाठी एक खाद्य भांडे असावे. तज्ज्ञांशी चर्चा करून कोंबड्यांसाठी लागणारे प्रीस्टार्टर, स्टार्टर व फिनिशर खाद्य ठरवावे. गरजेनुसार खाद्य खरेदी करावी. 

प्रक्षेत्रावर निष्काळजीपणा, कोंबड्यांच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे खाद्याची नासाडी होते. साधारणः एका कोंबडीमागे ५० ते १०० ग्रॅम खाद्य नासाडी झाल्यास साधारणः २.५० ते ३ रुपयांचे नुकसान होय. हे लक्षात घेऊन काटेकोर खाद्य व्यवस्थापन ही महत्त्वाची बाब आहे. 

खाद्य व्यवस्थापन करताना आपल्याकडे किती खाद्य उपलब्ध आहे, हे लक्षात घ्यावे. अनेकदा शेतकरी खाद्य मोजण्यात चूक करतात. कोणते खाद्य शिल्लक आहे ते कोंबडीचे वय, वजन किंवा खाद्याचा प्रकार, आकार व पोषकता याचा विचार न करता कोंबड्यांना खाण्यास दिले जाते. योग्य वयात पाहिजे ते खाद्य न दिल्यामुळे कोंबड्यांना अपचनास सामोरे जावे लागते. पोटाचे विकार विष्टेद्वारे दिसू लागतात. बऱ्याचदा शेतकरी ही चूक लपविण्याचा प्रयत्न करतात. परिणामी, वेगवेगळ्या औषधांचा वापर करतात. कोंबडी वाढविण्याच्या खर्चात वाढ होते. कोंबड्यांना त्रास होतो. 

कोंबड्यांना देण्यात येणारे खाद्य तपासून घ्यावे. तसेच पुढील काही दिवसांत अपेक्षित लागणारे खाद्य मोजून घ्यावे. सर्वप्रथम शिल्लक असलेल्या कोंबड्या, वातावरणात पुढील काही दिवसांत होणारी त्याची वाढ, बाजारपेठेची मागणी आणि शिल्लक खाद्य या बाबींचा विचार करून नवीन खाद्य खरेदी करावे.

बऱ्याचदा विजेचा लंपडाव आणि बाजारपेठेतील मागणी यानुसार कोंबड्यांची नियोजित वेळेपेक्षा लवकर विक्री होते. शिल्लक खाद्य शेडमध्ये पडून राहते. त्यावर बुरशी तयार होण्याची शक्‍यता असते. यासाठी अनेक गोष्टी पूरक असतात. उदा. वातावरणातील दमटपणा, खाद्य साठवणूक पद्धत, खेळती हवा नसणे. यामुळे पूर्वनियोजित खाद्य खरेदी आणि कोंबड्यांची विक्री अत्यंत महत्त्वाची आहे. 

शेडमध्ये साधारण पन्नास कोंबड्यांसाठी एक खाद्य भांडे असावे. खाद्य भांड्याची उंची ही नेहमी कोंबडीच्या पाठीच्या उंचीबरोबर असावी. जेणेकरून कोंबड्यांकडून खाद्याची नासाडी कमी प्रमाणात होते. खाद्य भांड्यावर लागलेले ग्रील व्यवस्थित बसलेले आहे का? कोंबड्या त्यामधून खाद्य खाऊ शकतात का? याबाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.

उन्हाळ्यात शेडमधील खाद्य भांडी उंचीवर ठेवावीत.जेणेकरून दुपारच्या वेळी तीन ते चार तास कोंबड्यांना खाद्य खाण्यापासून थांबविणे शक्‍य होते. यामुळे कोंबड्यांच्या वाढीवर चांगले परिणाम दिसतात. याउलट कोंबड्यांना रात्रीच्या थंड वेळी जास्तीत जास्त खाद्य खाण्यास द्यावे. याचा कोंबड्यांच्या वाढीवर अनुकूल परिणाम होतो. 

तज्ज्ञांशी चर्चा करून कोंबड्यांसाठी लागणारे प्रीस्टार्टर, स्टार्टर व फिनिशर खाद्य ठरवावे. गरजेनुसार खाद्य खरेदी करावी. 

शेडमधील भांड्याची वेळोवेळी तपासणी करावी. जर कोंबड्या खाद्य कमी प्रमाणात खात असतील, भांड्यात खाद्य शिल्लक असेल तर लगेच आजाराचा निष्कर्ष न काढता त्याचे काय कारण असू शकते याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून उपाययोजना करावी.  

कोंबड्यांना खाद्य देण्याची वेळ 
निश्‍चित करावी. त्याप्रमाणे कामगारांना सूचना द्याव्यात. खाद्य देण्याच्या वेळेतील अचानक बदलामुळे कोंबड्यांमध्ये अप्रत्यक्षरीत्या ताण निर्माण होतो.

खाद्य भांड्यातील अंतर हे सुद्धा महत्त्वाचे आहे. ब्रॉयलर कोंबडी ही इतर कोंबड्यासारखी तत्पर नसते. त्यामुळे अशा कोंबड्यांना त्याच्याजवळ पाणी आणि खाद्य असेल तर त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते. साधारणतः सर्व ब्रॉयलर कोंबड्यांना आठ फूट अंतराच्या आत पाणी व खाद्य उपलब्ध होईल अशा प्रकारे भांड्याची मांडणी करावी. जर एखादे खाद्य भांडे रिकामे आहे आणि त्यालगतचे खाद्य भांडे भरलेले असेल तर त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, एखाद्या भांड्याची उंची, कोन, ग्रील, बऱ्याचदा शेडच्या लांबी लगतच्या भांड्यावर सरळ ऊन पडल्यामुळे कोंबड्या त्या भांड्यातील खाद्य खात नाहीत. अनेकदा चांगली दिसणारी भांडीसुद्धा आतून खराब असल्याने खाद्यास एक विशिष्ट वास येतो. त्यामुळे कोंबड्या त्या भांड्यातील खाद्य खात नाहीत. 

कोंबड्यांचे व्यवस्थापन -

शक्‍यतो एका शेडमधील खाद्य भांडी दुसऱ्या शेडमध्ये वापरू नयेत. खाद्य भांड्यात भरतेवेळेस शेडमधून चालताना कोंबड्यांवर कमीत कमी ताण येईल असे नियोजन करावे. अनेकदा कामगार भांडी भरताना पुरेशी काळजी घेत नसल्यामुळे खाद्याची नासाडी मोठ्या प्रमाणात होते. नवीन कामगारांना कोंबड्यांच्या व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण द्यावे. शक्‍यतो एक अनुभवी कामगार नवीन शिकाऊ कामगारासोबत ठेवावा. 

असे दिसून आले आहे, की खाद्य भांडी साधारणः दर तीन ते चार तासांनी हलविली की कोंबड्यांची खाद्य खाण्याची क्षमता वाढते. परिणामी वजनात वाढ होते. 

प्रक्षेत्रावरील सर्व कोंबड्यांना खाद्य देऊन झाल्यावर गोदामातील शिल्लक खाद्य पिशव्यांचा हिशेब लावावा. रिकाम्या झालेल्या पिशव्या नीट झटकून गुंडाळून वेगळ्या ठिकाणी ठेवाव्यात. अनेकदा असे दिसून येते, की कामगार रिकाम्या पिशव्या शेडच्या आजूबाजूला फेकून देतात. यामुळे उंदीर, खार इत्यादी प्राणी शेडमध्ये येतात.  

कोंबड्यांचे वजन जास्त वाढावे या कारणाने बरेचदा कोंबड्यांची विक्री करेपर्यंत खाद्य दिले जाते. खरे तर हे चूक आहे. विक्रीपूर्वी किमान आठ तास आधी कोंबड्यांच्या पुढील खाद्य भांडी काढून घ्यावीत. जेणेकरून कोंबड्या कापतेवेळी त्यांच्या आतड्यात अन्नकण राहणार नाहीत. कोंबड्यांपासून चांगल्या प्रतीचे मांस उत्पादन मिळेल. भांड्यातील शिल्लक खाद्य वेगळे काढून जमा करावे. शिल्लक खाद्य दुसऱ्या प्रक्षेत्रावर वापरू नये. कारण असे खाद्य अनेकदा आजार पसरविण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. 

कोंबड्यांना उपाशी ठेवणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे. कोंबड्यांना शास्त्रीय पद्धतीने खाद्य देणे महत्त्वाचे आहे. 

प्रक्षेत्रावरील व्यवस्थापनाची योग्य नियमावली आणि त्याची अंमलबजावणी ही यशस्वी व्यवसायासाठी आवश्‍यक बाब आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com