अमेरिकेतल्या वादळामुळे भारताच्या कापसाला `अच्छे दिन`

अमेरिकेतल्या वादळामुळे भारताच्या कापसाला `अच्छे दिन`

जगातील सगळ्यात मोठा कापूस निर्यातदार देश असलेल्या अमेरिकेला हार्वे आणि इरमा चक्रीवादळाचा तडाखा बसल्यामुळे तिथे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जगातील आघाडीच्या आयातदार देशांनी कापूस खरेदीसाठी भारताकडे मोर्चा वळवला आहे. भारतात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. 

गेल्या आठवड्यात भारतातून १० लाख गाठी कापूस निर्यातीसाठी करार करण्यात आले. हा कापूस चीन, तैवान, व्हिएतनाम, पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडोनेशिया या देशांना निर्यात केला जाईल. दोन आठवड्यांपूर्वी भारतातून होणाऱ्या निर्यातीचे प्रमाण ३ लाख गाठी इतके होते. गेल्या आठवड्यातील निर्यातीचा ट्रेन्ड पुढील काही महिने असाच चालू राहण्याचा निर्यातदारांचा अंदाज आहे. परिणामी ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या २०१७-१८च्या नवीन हंगामात देशाची कापूस निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्के वाढण्याची शक्यता आहे. भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा कापूस निर्यातदार देश आहे.   

`देशातील कापसाला यंदाच्या हंगामात चांगली संधी आहे. आशियातील कापूस खरेदीदार अमेरिकेऐवजी भारताकडे वळाले आहेत,`` असे जयदीप कॉटन फायबर्स प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग पटेल यांनी सांगितले. 

अमेरिकेला गेल्या काही दिवसांत हार्वे आणि इरमा या चक्रीवादळांचा जोरदार तडाखा बसला आहे. त्यामुळे टेक्सास आणि जॉर्जिया या प्रमुख कापूस उत्पादक प्रांतातील कापसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कापसाचे उत्पादन आणि गुणवत्ता यांना मोठा फटका बसला आहे. टेक्सास प्रांतात तुलनेने जास्त नुकसान झाले आहे. तेथे जवळपास पाच ते सहा लाख गाठी कापसाचे नुकसान झाल्याचा अंदाज डीलर्सनी व्यक्त केला आहे.

आशियाई देश कापसासाठी प्रामुख्याने अमेरिकेवर अवलंबून होते. अमेरिकी कृषी विभागाच्या (यूएसडीए) आकडेवारीनुसार गेल्या हंगामात (२०१६) अमेरिकेतील एकूण कापूस उत्पादनापैकी ८६ टक्के कापसाची निर्यात झाली; त्यापैकी सुमारे ६९ टक्के कापूस आशियाई देशांनी खरेदी केला. परंतु, आता अमेरिकेत कापूस उत्पादन घटल्यामुळे या देशांनी भारतातून कापूस खरेदीला पसंती दिली आहे. अमेरिकेत कापूस उत्पादन गडगडल्याच्या पार्श्वभूमीवर ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया या देशांनाही निर्यातीसाठी संधी आहे. परंतु, भारतातील कापसाच्या दराशी तुलना करता तिथले दर चढे आहेत. भारतात यंदाच्या हंगामात विक्रमी कापूस उत्पादन होण्याचा अंदाज असल्यामुळे दर कमी आहेत. त्यामुळे ब्राझील आणि ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारतातील कापसाची मागणी वाढली आहे.       

भारतात २०१७-१८ या हंगामात कापसाचे ४०० लाख गाठी इतके विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या हंगामात देशाचे कापूस उत्पादन ३४५ लाख गाठी इतके होते. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार यंदा देशात १२१ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचा पेरा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत लागवडीत तब्बल १९ टक्के वाढ झाली आहे. 

कापसाच्या पिकाला पोषक वातावरण आणि जागतिक बाजारात मोठी मागणी असल्यामुळे यंदा कापूस निर्यातीत मोठी वाढ अपेक्षित आहे. यंदाच्या हंगामात (२०१७-१८) देशातून ७५ लाख गाठी कापसाची निर्यात होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. गेल्या हंगामात ६० लाख गाठी कापूस निर्यात झाला होता. काही तज्ज्ञांच्या मते चीनने आयातीचा निर्णय घेतला तर यंदा भारताची कापूस निर्यात ८० लाख गाठींवर जाऊ शकते. चीनने आपल्याकडील शिल्लक साठ्यातून ६ मार्च पासून कापूस विक्रीला सुरवात केली. आधीच्या नियोजनानुसार ऑगस्टपर्यंत ही विक्री सुरू राहणार होती.

ऑगस्टअखेरीस दैनंदिन लिलाव थांबविण्यात येणार होते. परंतु, देशात कापसाचा पुरवठा कमी असल्यामुळे दरात तेजी आल्याने कापूस विक्रीला आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. या घडामोडींमुळे चीन यंदा कापसाची आयात करेल, असे संकेत मिळत आहेत. 

गेल्या काही आठवड्यांपर्यंत भारताच्या कापूस निर्यातीचे चित्र फारसे समाधानकारक नव्हते. रुपया मजबूत झाल्यामुळे आणि जागतिक बाजारात दर आकर्षक नसल्यामुळे कापसाची निर्यात संकटात सापडली होती. परंतु, अमेरिकेतील वादळामुळे जागतिक बाजारात दरात तेजी आल्याने चित्र एकदम पालटून गेले. तसेच आशियाई देशांना भौगोलिक दृष्ट्या अमेरिकेच्या तुलनेत भारत जवळ असल्यामुळेही निर्यातीला फायदा होत आहे.

अमेरिकेतून व्हिएतनाम, बांगलादेश आणि पाकिस्तानला कापूस पोचण्यासाठी सुमारे ५० दिवस लागतात. त्या तुलनेत भारतातून माल पोचायला केवळ दोन आठवडे लागतात. तसेच भारतात ऑक्टोबरपासून कापसाची आवक सुरू होईल; तर अमेरिकेत पीक हाती यायला जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागेल, हा मुद्दाही महत्त्वाचा आहे.     

यंदा देशात विक्रमी कापूस उत्पादनाचा अंदाज असल्यामुळे भाव उतरणीला लागतील अशी भीती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील घडामोडींमुळे निर्यातीसाठी मागणी वाढल्याने कापूस उत्पादकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याचे चित्र आहे. परंतु, यदा जागतिक पातळीवर कापूस उत्पादन वाढण्याचा अंदाज असल्यामुळे दरातील ही तेजी मर्यादीत राहील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

भारतात २०१७-१८मध्ये कापसाचे विक्रमी ४०० लाख गाठी उत्पादन होण्याचा अंदाज.
२०१६-१७ मध्ये ३४५ लाख गाठी उत्पादन. 
यंदा देशात १२१ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचा पेरा.
गेल्या वर्षीच्या तुलनेत १९ टक्के वाढ.
२०१७-१८ मध्ये  देशातून ७५ ते ८० लाख गाठी कापूस निर्यातीचा अंदाज.
२०१६-१७ मध्ये ६० लाख गाठी कापूस निर्यात झाला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com