पोमणनगरचे सरपंच माणिक पोमण यांची सुयोग्य व्यवस्थापन असलेली पेरूची बाग .
पोमणनगरचे सरपंच माणिक पोमण यांची सुयोग्य व्यवस्थापन असलेली पेरूची बाग .

‘पुरंदर’च्या अंजीर पट्ट्यात पेरूतून पीक बदल...

पाणीटंचाई, मजूरबळावर शोधला नव्या पिकातून पर्याय  

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याची ओळख अंजीर, सीताफळ या पिकांसाठी आहे. मात्र पाणीटंचाई व अपुरे मजूरबळ व त्यांचे वाढलेले दर या कारणांमुळे अंजिराचे पीक आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहे. त्या तुलनेत देखभाल खर्च कमी, व्यवस्थापनाला सोपे असलेल्या पेरू पिकाचा हुकमी पर्याय शेतकऱ्यांना सापडला आहे. बांधावरील तसेच मुंबईचे मार्केट उपलब्ध झाल्याने पेरू उत्पादकांची चांगली सोयही झाली आहे. येथील अनेक गावांमधून आता पेरूतून पीकबदल घडला आहे.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याचे नाव अंजीर पिकाशी जोडले गेले आहे. या भागातील हवामानात व मातीत पिकणाऱ्या अंजिराची गोडीच काही वेगळी आहे. वास्तविक पाहता हा भाग पर्जन्यछायेचा. बहुतांश शेती विहीर बागायत. सिंचनासाठी वर्षभरात कसेबसे सात ते आठ महिने पाणी मिळते. त्याचा काटेकोर वापर करीत येथील शेतकऱ्यांनी अंजीर फळबागा जोपासल्या, वाढवल्या. अलीकडील काही वर्षांमध्ये पुरंदर तालुक्याची ही अोळख पुसू लागली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या भागात महत्त्वाचा पीकबदल घडतो आहे तो म्हणजे पेरू पिकाचा. येथील अधिकाधिक अंजीर उत्पादक पेरू पिकाकडे आकर्षित होताना दिसत आहेत.

पेरूतून पीकबदल
तालुक्यातील पिंपळे, पोमणनगर, जाधववाडी, काळेवाडी, झेंडेवाडी, वाघापूर, कुंजीरवाडी, राजेवाडी, आंबळे, सिंगापूर, आंबोडी, वनपूरी, उदाची वाडी, नाझरे, खळद अशा अनेक गावांमध्ये आज अंजिराच्या बागांएेवजी पेरूच्या बागा दिसू लागल्या आहेत. कमी पाण्यात हे पीक शेतकऱ्यांना चांगला परतावा देत असल्याचे चित्र आहे. पिंपळे ग्रामपंचायतीमधून सुमारे आठ वर्षांपासून पोमणनगर ग्रामपंचायत वेगळी झाली आहे. मात्र दोन्ही गावांतील शिवारे एकमेकांमध्ये मिसळलेली आहेत. पंधरा वर्षांपूर्वी प्रमोद ऊर्फ बाबू विजय पोमण यांनी पेरूच्या ‘बॉटल गुलाबी’ या स्थानिक वाणाच्या शंभर रोपांची या भागात प्रथम लागवड केली. त्यानंतर प्रादेशिक संशोधन केंद्र, जाधववाडी येथील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. विकास खैरे यांच्या मार्गदर्शनातून गावातील काही शेतकऱ्यांनी पेरूचा ललित वाण लावला. हा पेरू आकाराने गोल व गुलाबी गराचा असल्याने बाजारात त्याला चांगली मागणी आहे. या शेतकऱ्यांना होत असलेला फायदा पाहून अन्य शेतकरीही टप्प्याटप्प्याने पेरू लागवडीकडे वळू लागले.

पाणी व मनुष्यबळ याच मुख्य कमतरता
गेल्या दशकामध्ये पिंपळे व पोमणनगर शिवारात केवळ २० ते ३० टक्के प्रमाणातच अंजीर बागा शिल्लक राहिल्या असाव्यात असा शेतकऱ्यांचा कयास आहे. अंजीर पीक चांगले उत्पादन व उत्पन्न देणारे असले तरी पाण्याची व मनुष्यबळाची कमतरता या पिकाला प्रामुख्याने भासत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचा कल अंजीर बागा कमी करण्याकडे असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून वाटते.

पिंपळे व पोमणनगर या गावांमध्ये अंजिराची जागा पेरू व्यतिरिक्त काही प्रमाणात सीताफळदेखील घेत आहे. परिसरात गणेश पोमण, जयहिंद पोमण, अनिल पोमण, बाळूअण्णा पोमण, श्रीकांत पोमण, माणिक पोमण (सरपंच, पोमणनगर), दीपक पोमण, नामदेव पोमण, संभाजी पोमण, मुरलीधर पोमण, महादेव पोमण, पोपट पोमण असे अनेक शेतकरी पाहण्यास मिळतात. त्यांच्याकडे सरासरी १०० ते १५० संख्येने पेरूची झाडे असून, त्यापासून ते उत्तम उत्पादन घेत आहेत. पंचक्रोशीत पिंपळे व पोमणनगर यांची पेरूची गाव ही ओळख निर्माण झाली आहे.

पेरूचे वाण
हळूहळू शेतकऱ्यांनी विविध ठिकाणाहून पेरूचे विविध वाण आणले. आजमितीला गावात नऊ ते दहा वाण रुजले आहेत. ते असे.
लंबगोल गुलाबी गराचा (बॉटल)-स्थानिक वाण, ललित (गोल व गुलाबी गर)
नागपूर रेड (थोडासा गडद गुलाबी गर)
सरदार (लखनौ ४९), श्वेता, जी विलास
जंबो पेरू - मोठा आकार, वजन सुमारे एक ते दीड किलोपर्यंत
बारामती भागातील वाण (बियांचे प्रमाण कमी, लंबगोलाकार, गडद गुलाबी, गोडी अधिक)

तयार केले मार्केट
या भागात वर्षातील बहुतांश कालावधीत पेरू उपलब्ध असतो. त्यामुळे व्यापाऱ्यांसाठी सोयीचे होतेच शिवाय शेतकऱ्यांना बांधावरच मार्केट उपलब्ध झाले आहे.
प्रति झाड वयानुसार ४० ते ५० किलो फळे  हंगामामध्ये मिळतात. अर्थात झाडाच्या वयानुसार ते  वाढतेही. 
पेरूची स्थानिक बाजारपेठ तालुक्यातील सासवड येथे आहे. गावातील काही शेतकरी येथे माल पाठवतात.
सुरवातीला माल कमी असताना प्रामुख्याने सासवडमध्ये व मालाची आवक वाढल्यानंतर मुंबई अशा दोन बाजारपेठांत पेरू पाठवला जातो. दर्जा व आकार यानुसार प्रति क्रेट  किमान ४०० रूपये तर कमाल ९०० ते क्वचित एकहजार रुपयांप्रमाणे दर मिळतो. एका क्रेटमध्ये १८ ते २० किलो फळे बसतात.
मुंबईत नऊ नगांचा एक बॉक्स या प्रमाणे दोन बॉक्स एकत्रित बांधून पाठवले जातात. या दुहेरी बॉक्सला १५० ते २५० रुपये या प्रमाणे दर मिळतो. मुंबईत पेरूचा व्यापार करणारे मोठे सहा -सात व्यापारी आहेत.
गावातील पाच ते सहा शेतकऱ्यांचा पेरू एकत्र करून नेणारे छोटे व्यापारी थेट बांधावर येतात. यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाचून दरही बऱ्यापैकी मिळतो.

आश्वासक मार्केट 
सप्टेंबर- आॅक्टोबर काळात आवक कमी राहिल्याने दर चांगले मिळतात. या काळात ते किलोला ४० ते ४५ रुपयांपर्यंतही पोचतात. डिसेंबरच्या दरम्यान म्हणजे हंगामाच्या अखेरीस ते चांगले राहतात.  मात्र एकूण बहराचा विचार केल्यास किलोला २० ते ३० रुपयांच्या दरम्यान दर राहतो. १६ बाय १६ फूट लागवड अंतराच्या हिशेबाने एकरी १७० झाडे बसतात. प्रति झाड सरासरी ५० किलो फळ धरल्यास साडेआठ टन उत्पादन मिळते. किलोला २० रुपये दर धरल्यास एक लाख ७० हजार रुपये मिळतात. झाडांची एकरी संख्या, प्रति झाड उत्पादन व दर यांनुसार नफ्याचे प्रमाण बदलते.
 

लागवडीच्या पद्धती
पारंपरिक (२० बाय २० फूट किंवा १६ फूट बाय १६ फूट)
मिडो ऑर्चर्ड (सघन लागवड)- सघन लागवडीत हवा खेळती राहण्यात व आंतरमशागतीला अडचणी येतात. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. या कारणास्तव परिसरात ही पद्धत फारशी वापरली जात नसल्याचे शेतकरी सांगतात.

चिंच, आंबा, चिकू, सीताफळ, जांभूळ बागेत आंतरपीक म्हणून पेरूची लागवड. या पद्धतीत सहा वर्षांनंतर पेरूची झाडे काढून टाकली जातात.

पेरू रुजण्याची कारणे
पेरू लागवडीनंतर फळे सुरू होण्यास किमान दोन वर्षे लागतात. या काळात त्यामध्ये विविध आंतरपिके घेता येतात. त्यामुळे क्षेत्राचा पुरेपूर वापर करीत उत्पन्न मिळत राहते. पाण्याची उपलब्धता असल्यास वर्षात दोन बहर धरता येतात. मात्र या भागातील पाण्याची कमतरता लक्षात घेता खरिपातील पावसावरच बहुतांश शेतकरी बहराचे नियोजन करतात.
 ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे असे शेतकरी आगाप बहर धरतात. ही फळे बाजारात लवकर म्हणजे ऑगस्ट अखेर ते सप्टेंबरमध्य येतात. त्यांना अधिक दर मिळतो. जूनमध्ये बहर धरल्यानंतर फळे ऑक्टोबरपासून सुरू होतात.

सिंचनासाठी सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांनी आपल्या आर्थिक व जमीन क्षमतेनुसार शेततळी उभारली आहे. त्यातील पाण्याचा वापर ठिबकद्वारे केला जातो.

अन्य फळांपेक्षा पेरू का फायदेशीर?
कोरडवाहू फळपीक असलेल्या डाळिंबाचा पर्याय देखील इथल्या शेतकऱ्यांसमोर होता. मात्र या विषयी बोलताना पोमणनगर येथील शेतकऱ्यांनी सांगितले, की डाळिंब हे पीक कमी पाण्यावरील असले तरी त्याला अत्यंत वेळेवर पाणी द्यावे लागते. विशेषतः फळधारणा सुरू झाल्यानंतर पाण्याची कमतरता चालत नाही. आमच्या भागामध्ये नेमकी त्यातच अडचण येते. सध्या आमच्या गावातही काहीजणांकडे डाळिंब बागा असल्या पाणी कमी पडण्याची स्थिती वारंवार येते. तसेच किडी- रोगांचा प्रादुर्भावाची समस्या मोठी आहे. त्यामुळे आवश्यक दर्जा मिळण्यात अडचणी येतात.

पेरू लागवडीचे तुलनात्मक अन्य फायदे
मनुष्यबळ तुलनेने कमी लागते.
रोग-किडींचे प्रमाण कमी. पर्यायाने पीक संरक्षणाचा खर्च कमी.
अंजिराच्या तुलनेत व्यवस्थापन सोपे, सुटसुटीत.
पाणी असेल तर वर्षातून दोन बहर घेता येतात.
आर्थिकदृष्ट्या अधिक निव्वळ फायदा मिळतो.

नवीन पेरू लागवडीविषयी... 
गणेश पोमण यांनी दिलेल्या टिप्स 
उन्हाळ्यात अडीच फूट लांबी रुंदीचे खोल खड्डे घेऊन उन्हामध्ये चांगले तापू द्यावेत. 
त्यामध्ये शेणखत, कंपोस्ट खत प्रत्येकी एक पाटी, सुपीक माती, निंबोळी पेंड, सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण भरावे. शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा भुकटी मिसळल्यास सुरवातीच्या काळात येणाऱ्या मर रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. 
रोपांच्या सुरवातीच्या अवस्थेमध्ये कीड व रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दाणेदार कीडनाशकांचा वापर केला जातो. 
पावसाळी वातावरणामध्ये विशेषतः जुलै ते नोव्हेंबर या काळामध्ये या खड्ड्यामध्ये रोपांची लागवड केली जाते. त्यानंतर भरपूर पाणी देतात.   पुढे आवश्यकतेनुसार प्रति महिना नत्र, स्फुरद, पालाश खतांचे व पाण्याचे नियोजन केले जाते. 

बहर व्यवस्थापन  
कुंडलिक पोमण यांच्या टिप्स 

काही सुधारित जातींमध्ये लागवडीनंतर पाच- सहा महिन्यांमध्ये फुलोरा येत असला, तरी झाडांची चांगली वाढ होण्यासाठी फळे घेतली जात नाहीत. 
मार्च महिन्यामध्ये मशागत करून, काकरणी व रोटरचा वापर केला जातो.
एप्रिल, मे महिन्यांत प्रत्येक झाडाचे आळे व्यवस्थित केले जाते. झाडांचे पाणी कमी करून विश्रांती दिली जाते.
त्यानंतर बहर धरण्यापूर्वी प्रति झाड पाच मोठ्या पाट्या शेणखत, अर्धा किलो निंबोळी पेंड, एक किलो १०-२६-२६ ही सेंद्रिय व रासायनिक खते दिली जातात. 
वर्षातून एक वेळा बहर धरण्यापूर्वी हलकी छाटणी केली जाते.  आंबवणी व चिंबवणी असे हलके पाणी दिले जाते. पुढे पाण्याचे व खतांचे योग्य नियोजन केले जाते. 
बाग तणनियंत्रण करून स्वच्छ ठेवली जाते.
फुलोरा अवस्थेमध्ये फुलगळ कमी करण्यासाठी पोटॅश २५० ग्रॅम अधिक १०-२६-२६ एक किलो प्रति झाड या प्रमाणे दिले जाते. 

कीड- रोगनियंत्रण
मावा, फुलकिडे, पांढरी माशी, मिलीबग, पाने खाणारी अळी या किडींचा, तर देवी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. आवश्यकतेनुसार वेळेवर उपाययोजना केल्या जातात. 

शेततळ्यांचे गाव ही देखील ओळख 
पुरंदरमध्ये सर्वाधिक शेततळी पिंपळे व पोमणनगर गावांमध्ये झाली असल्याचे सरपंच माणिक पोमण यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गावातील सुमारे ७५ टक्के लोकांकडे शेततळी अाहेत. त्यातील पाणी पेरूसह सीताफळ, डाळिंब, अंजीर या फळबागांसाठी वापरले जाते. गेल्या तीन- चार वर्षांमध्ये पाण्याचा काटेकोर वापर करण्यासाठी बहुतांश शेतकरी ठिबक सिंचनकडे वळले आहेत.

अनुभव पेरू उत्पादकांचे
पिंपळे गावचे सरपंच प्रमोद ऊर्फ बाबू विजय पोमण म्हणाले, की पंधरा वर्षांपूर्वी पीक बदल म्हणून प्रथम काळेवाडी (ता. पुरंदर) येथून बॉटल गुलाबी वाणाची रोपे आणून २० बाय २० फूट अंतरावर लागवड केली. फळांची विक्री त्या वेळी पुणे परिसरातीलच वाकड, लोणी काळभोर येथील व्यापाऱ्यांकडे करायचो. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नांचा विचार करता पेरूची लागवड वाढवत नेली. आज माझ्याकडे ५०० झाडे आहेत. पुढील लागवड १६ बाय १६ फूट अंतरावर केली आहे. पुढे गाव परिसरातील पेरूच्या रोपांची मागणी होऊ लागली. दरवर्षी ४ ते ५ हजार रोपे दाब कलम पद्धतीने तयार करतो. एक वर्ष रोपांची चांगली काळजी घ्यावी लागते. प्रति रोप साधारणपणे १५० ते २०० रुपये दर मिळतो. आतापर्यंत सुमारे ४५ हजार रोपे पुरंदर तालुक्यातील गावांमध्ये विकली. त्यातूनही चांगले उत्पन्न मिळाले. पेरू झाडाचे व्यवस्थापन प्रामुख्याने जैविक आणि सेंद्रिय पद्धतीने करतो. त्यासाठी तीन देशी गाई सांभाळल्या आहेत. शेणखत, सूक्ष्मजीवांवर आधारित सेंद्रिय उत्पादन आणि जिवामृत यांचा भरपूर वापर केल्याने फळांचा आकार, लकाकी आणि गोडी यामध्ये भर पडते. रासायनिक खतांचा तुलनेने कमी वापर केल्याने खर्चामध्ये एकरी ८ ते १० हजार रुपये बचत साधली जाते. सिंचनासाठी विहीर हा पाण्याचा मुख्य स्रोत आहे. त्याला पूरक म्हणून ३० मी. बाय ३० मी. बाय २० फूट आकाराचे शेततळे केले आहे.
 - प्रमोद ऊर्फ बाबू पोमण, ८६२५९१९३९२.

कुंडलिक पोमण यांची १० एकर शेती आहे. त्यांच्याकडे पेरू ४५० झाडे, सीताफळ ५५०, डाळिंब ३००, चिकू ४० व अंजिराची ७५ झाडे आहेत. पूर्वी त्यांच्याकडे अंजिराची २५० झाडे होती. त्यांचे बंधू जयहिंद यांचीही १० एकर शेती अाहे. त्यात पेरूची ५००, सीताफळ एक हजार, अंजीर ७५ व डाळिंबाची ४५० झाडे आहेत. या दोघांनीही कामांसाठी मजूरबळाची कमतरता असल्याने अंजिराची झाडे कमी केली आहेत. गेल्या चार वर्षांपासून पेरूसह अन्य फळझाडे वाढवली आहेत. डाळिंबात रोग- किडींच्या नियंत्रणाकडे अधिक लक्ष द्यावे लागते. त्याचप्रमाणे उत्पादन खर्चही अधिक आहे. त्या तुलनेत पेरू कमी कष्टामध्ये आर्थिकदृष्ट्या अधिक फायदा देत असल्याचे कुंडलिक यांनी सांगितले.
- कुंडलिक पोमण, ९८२३२३५५४४,  - जयहिंद पोमण- ९८२२६५३५४४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com