शेळीच्या दुधाचे महत्त्व

डॉ. सारीपूत लांडगे, डॉ. वैशाली बांठिया
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

शेळ्या पारंपरिकरीत्या प्रामुख्याने मांस किंवा मटणासाठी पाळल्या जातात. मात्र त्यांच्या मांस, लेंडीखतासोबतच दूधही महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी शेळीपालनाला प्राधान्य देता येईल.

शेळ्या पारंपरिकरीत्या प्रामुख्याने मांस किंवा मटणासाठी पाळल्या जातात. मात्र त्यांच्या मांस, लेंडीखतासोबतच दूधही महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी शेळीपालनाला प्राधान्य देता येईल.

जागतिक दूध उत्पादनामध्ये शेळीचे दूध हे २ टक्के असून, गेल्या काही वर्षांमध्ये मागणी वाढत आहे. त्यामुळे अधिक दूध देणाऱ्या शेळी जाती उदा. सानेन आणि जमनापारी यांचे पालन वाढविण्यास वाव आहे. 
शेळीचे दुधामध्ये गाईंच्या दुधाप्रमाणेच प्रथिने आणि इतर घटक उपलब्ध असून, त्यात चरबीचे प्रमाण कमी असते. शेळीचे दूध नैसर्गिकरीत्या पचनास सोपे असते. परिणामी, आरोग्यासाठी अधिक उपयुक्त म्हणून लोकांमध्ये त्याची मागणी वाढत आहे. 

शेळीच्या दुधाचे औषधी गुणधर्म -
गाईंच्या दुधासाठी ॲलर्जी असणाऱ्यांना शेळी दूध पचू शकते. 
शेळीचे दूध शरीरातील विविध दाह कमी करण्यास मदत करते. 
शेळीच्या दुधामुळे मज्जासंस्थेचे रोग बरे होण्यास मदत होत असल्याचा दावा अनेक संशोधक करतात. 
काही संस्कृतीमध्ये सौंदर्यवर्धक पेय मानले जाते. 
शारीरिक वाढ आणि आरोग्यास लाभदायक असते.
स्थौल्यत्व नियंत्रणासाठी उपयुक्त. 
शेळीच्या दुधाचा सामू हा त्वचेप्रमाणे असल्याने विविध त्वचारोगावर वापर करतात. त्यामुळे शेळीचे दूध असणारे काही साबणदेखील बाजारात उपलब्ध आहेत. 

शेळी दुधावरील प्रक्रिया -
भारतीय कृषी संशोधन परिषदेने शेळीच्या दुधापासून बिस्किटे, श्रीखंड, पनीर, आइस्क्रीम आणि साबण तयार केले आहेत.
परदेशामध्ये शेळीच्या दुधापासून तयार केलेले काही विशिष्ट पदार्थ लोकप्रिय आहेत. 
१)     पेटा - शेळीच्या दुधापासून तयार केलेल्या मुलायम चीजला पेटा म्हणतात. आखाती देश व इस्राईलमध्ये हा प्रकार खाल्ला जातो. 
२)     पिकोरीनो - इटलीतील हा खाद्यपदार्थही शेळ्यांच्या दुधापासून तयार केलेले 
चीज आहे. साठवणीतील पिकोरीनो चीज हा एक अत्यंत स्वादिष्ट खाद्यप्रकार आहे.

शेळीच्या दुधातील घटक -
पोषक तत्त्व - स्निग्ध पदार्थ (फॅट) १३ टक्के, प्रथिने ७ टक्के, ऊर्जा ३ टक्के, कर्बोदके ९ टक्के यांसह रायबोप्लेविन प्रथिने ८ टक्के, जीवनसत्त्व ‘अ’ ४ टक्के, जीवनसत्त्व ‘ड’ ३ टक्के, जीवनसत्त्व ‘क’ थायमीन ३ टक्के, 

खनिजे -
कॅल्शिअम - १३ टक्के
फॉस्फरस - ७ टक्के
पोटॅशिअम - ६ टक्के
मॅग्नेशिअम - ३ टक्के
सेलेनियम - ३० टक्के

- डॉ. सारीपूत लांडगे, ७३५०६८६३८० (नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर )