जनावरांतील गर्भधारणेसाठी अावश्यक बाबी

गर्भधारणा ते प्रसूती या काळात जनावराकडे विशेष लक्ष द्यावे.
गर्भधारणा ते प्रसूती या काळात जनावराकडे विशेष लक्ष द्यावे.

सतत उलटणारा माज दूध व्यवसायामध्ये नुकसानकारक ठरतो. प्रतिबंधात्मक उपचार करण्याची क्षमता वाढवल्यास जनावरे प्रसूतीनंतर ३-४ महिन्या़ंत हमखास गाभण राहतात. पशुप्रजननातील वंध्यत्वाबाबत सर्वाधिक संशोधन उलटणाऱ्या माजाबाबत झाले असले, तरी या दोषाचे प्रमाण आजही सर्वाधिक आहे.

उलटणारी दुधाळ जनावरे आयुष्यात कमी वेत देणार नाहीत यासाठी दक्षता घेणे महत्त्वाचे ठरते. अपुऱ्या निदान सुविधांमुळे उलटणाऱ्या जनावरांच्या निदानाची कारणे पशुवैद्यकाकडे ठोसपणे मिळत नाहीत. जगात ३९ वेत पूर्ण केलेली गाय आणि राज्यात २१ वेत पूर्ण झालेल्या गाईची नोंद झाली अाहे. माजचक्र एक-दोन फेऱ्या पूर्ण करत गर्भधारणेत परिवर्तित झाले, तरच गायी-म्हशीचे संगोपन करणे परवडते. रोगजंतूंमुळे गर्भाशयाचा दाह होतो आणि जंतूसंसर्गाचा प्रजननसंस्थेतील प्रादुर्भाव शरीरावर येणाऱ्या ताणामुळे वाढतो. त्यामुळे गर्भधारणा ते प्रसूती या काळात जनावराकडे विशेष लक्ष द्यावे लागते.  

उपाययोजना 
गर्भाशयदाह नसतानाही माजचक्र थांबत नसणाऱ्या गायी-म्हशींत रेतनाची अचूकता वाढविणे, गरजेप्रमाणे दोनदा रेतन करणे, स्त्रीबीज सुटणारा ओजसरस उपचार योग्य प्रमाणात माजाच्या काळात करणे, गर्भधारणेस पूरक पीत ग्रंथी सशक्त करणे, गर्भपात होऊ नये म्हणून उपयुक्त ओजसरस मात्रा माजानंतर देणे असे उपाय तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून करणे उचित ठरते. 

बाजारात गर्भधारणापूरक सुरक्षित वनौषधी उपलब्ध असून, त्यांचा वापर करून घेता येतो. 

माजानंतर १५ दिवस आहार, ऊर्जा अाणि क्षाराचे प्रमाण योग्य राहील अाणि ताण कमी होईल असे जनावरांचे व्यवस्थापन ठेवणे अावश्यक असते.
लक्षात असू द्या

सतत उलटणाऱ्या जनावरात माज उलटण्याची कारणे शोधणे कठीण असते. रोगनिदान करण्याचे तंत्र वर्गवारीतून मिळवावे लागते.

माजाच्या काळातील प्रजननतपासणी, माजाच्या दुसऱ्या व दहाव्या दिवशी तपासणीतून स्त्रीबीज परिपक्वता, स्त्रीबीज सुटणे आणि पीतग्रंथी रचना स्थापना अनुक्रमे पडताळल्या जातात.

माजाचा कालावधी रेतनाची वेळ ठरविण्यास गरजेचा असतो.

माजाचा स्त्राव सामू पडताळणीस, भौतिक परीक्षणास, रासायनिक चाचण्यांतून गर्भाशय तीव्रता ओळखण्यासाठी पशुवैद्यकास मदतीचा ठरतो.

गर्भाशय स्त्रावातील सुरक्षा पेशींची संख्या गर्भाशय दाहाचे प्रमाण दर्शवते.

जंतूसंसर्ग नाहीसा करण्यासाठी माज स्त्रावाची प्रयोगशाळेत प्रतिजैवकासह तपासणी करून सर्वाधिक परिणामकारक प्रतिजैविक  शोधण्याची चाचणी आवश्‍यक असते.

ओजसरसाचा स्वैर, चुकीचा, अनावश्‍यक वापर टाळण्यासाठी उपचाराच्या नोंदी लिखित स्वरूपात ठेवाव्यात.

चार- पाच वेळेपेक्षा अधिक माज विफल ठरल्यास तज्ज्ञ पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा.

उपचारांची दिशा केवळ सतत उलटणाऱ्या माजाच्या प्रकारावर ठरविली जाते. फलन होत नाही का फलनानंतर गर्भ टिकत नाही याची विभागणी करता येत नाही.

गर्भाशयदाह उपचार करताना आधी जंतूसंसर्ग नाहीसा करणे आणि मग सूज कमी करणे अपेक्षित असते.

गर्भाशयदाह नसताना वेळेवर स्त्रीबीज सुटणे, पीतग्रंथीची वाढ नियंत्रित करणे, पीतग्रंथींच्या अपुऱ्या स्त्रवणासाठी बाहेरून मदत पुरविणे, ओजसरस इंजेक्‍शन असे उपयुक्त उपचार तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून करावेत.

पहिले तीन माज प्रतिबंध उपचारांचे, नंतरचे तीन माज उपचारांचे, पुढील तीन माजाचे निदान तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून करावे. मात्र त्यानंतरही वांझपणा टिकून राहत असेल तर अशी जनावरे पैदाशीतून वगळण्यास पात्र ठरतात.
- डॉ. नितीन मार्कंडेय, ८२३७६८२१४१ (पशुवैद्यक महाविद्यालय, परभणी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com