जिद्द बाळगून काम केल्यानेच घडवल्या सुधारणा

संतोष मुंढे
बुधवार, 26 जुलै 2017

वडिलोपार्जित ३५ एकर शेती. ती एकट्याने समर्थपणे सांभाळताना कपाशी पिकात सुधारणा केली.पाण्याची शाश्वत सोय केली. कपाशी व आले पिकात एक ते दीड महिना कालावधीतील मेथी, कोथिंबीर अशी आंतरपिके घेत मुख्य पिकाचा खर्च कमी केला. खामखेडा येथील (जि. जालना) अभ्यासू व डोळसवृत्तीचे सोमनाथ नागवे डोळस यांनी अभ्यासूवृत्तीने पीक उत्पादन व उत्पन्नवाढ याकडे अधिक लक्ष देत शेतीत उल्लेखीनय वाटचाल केली आहे.

वडिलोपार्जित ३५ एकर शेती. ती एकट्याने समर्थपणे सांभाळताना कपाशी पिकात सुधारणा केली.पाण्याची शाश्वत सोय केली. कपाशी व आले पिकात एक ते दीड महिना कालावधीतील मेथी, कोथिंबीर अशी आंतरपिके घेत मुख्य पिकाचा खर्च कमी केला. खामखेडा येथील (जि. जालना) अभ्यासू व डोळसवृत्तीचे सोमनाथ नागवे डोळस यांनी अभ्यासूवृत्तीने पीक उत्पादन व उत्पन्नवाढ याकडे अधिक लक्ष देत शेतीत उल्लेखीनय वाटचाल केली आहे.

जालना जिल्ह्यातील खामखेड्याचे (ता. भोकरदन) युवा शेतकरी सोमनाथ किसनराव नागवे यांच्या वडिलांकडे गावची पाटीलकी होती. घरची सुमारे ३५ एकर शेती आणि मुलगा सोमनाथ एकुलता एक  असल्याने कला शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर वडिलांनी नोकरीच्या मागे लागल्यापेक्षा घरची शेती कसण्याचा सल्ला दिला. शिक्षण सुरू असतांनाच सोमनाथ यांचं शेतीत लक्ष देणं सुरू होतं. वडिलांचा अनुभव आणि संपर्कातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळत होते. त्या बळावर शेतीची वाट सहज सोपी कशी करता येईल यासाठीच सोमनाथ यांचे प्रयत्न सुरू झाले.

पेलली शेतीची जबाबदारी  
वय वर्षे २७. चार वर्षांपूर्वी पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोमनाथ घरच्या ३५ एकर शेतीत करिअर करण्यासाठी उतरले. आई-वडील, पत्नी व एक मुलगा असे कुटुंब. खरिपात सर्वाधिक कपाशी, त्यापाठोपाठ सोयाबीन, त्यानंतर मका, उडीद मूग, भूईमूग तर रब्बीत हरभरा, मालदांडी ज्वारी अशी पिके सुरवातीला घेतली जायची. कपाशी चार बाय चार फूट, मका दोन बाय एक फूट, तर कपाशीच्या आठ ओळी त्यानंतर तुरीची एक ओळ अशी पद्धत होती. या पिकांसाठी हंगामी पाणी पुरविणाऱ्या दोन विहिरी होत्या. 

सुधारणांना सुरवात 
उपलब्ध पाणी शेतीला काटेकोर पुरवायचे तर ठिबकचा वापर अनिवार्य असल्याचे ओळखून २०१३  मध्ये शक्‍य तेवढी शेती ठिबकवर आणण्याचा निर्णय घेतला. बॅंकेचे कर्ज काढून तीन एकरांवर ठिबकची सोय केली. कपाशीची लागवड चार बाय दीड वा चार बाय एक फुटावर आणली. आज याच पद्धतीने लागवड करतात. ठिबकची सोय झाली. व्यवस्थापनातही बदल केला. उत्पादन वाढत गेलं तसं ठिबकच क्षेत्रही वाढवलं. पूर्वी एकरी ९ ते १० क्विंटलच्या पुढं न जाणारं कपाशीचं उत्पादन आज २० क्विंटलवर पोचले आहे. ठिबकचं क्षेत्र १२ एकरांवर पोचलं आहे. 
 

सोमनाथ यांच्या शेतीची वैशिष्ट्ये 

यांत्रिकीकरणाची जोड देताना रोटावेटर, बीबीएफ यंत्र यांचा वापर 
एक वर्षाआड करतात मातीपरीक्षण 
हरभऱ्याचे एकरी दहा क्‍विंटलपर्यंत उत्पादन 
एकरी किमान १० ट्रॉली शेणखत वापरण्यावर भर  
कडधान्यांलाठी उडीद, मुगासह खरीपात भूईमूग  
शेतावरील काम करणाऱ्या गड्यांना प्रशिक्षित व्यक्‍तीची जोड 
एकरी २२ क्‍विंटल कापसाच्या उत्पादनापर्यंत मजल  
पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी तुषार सिंचनाचाही प्रसंगी वापर. 

व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे तंत्रज्ञान लाभ  

सोमनाथ यांनी शेती तंत्रज्ञानाविषयी माहितीची देवाणघेवाण करणारा व्हॉट्सॲप ग्रुप ॲपद्वारे सुरू केला आहे. त्यात शेतकरी, विविध शास्त्रज्ञ, कृषी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याच संपर्कातून वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी.बी. भोसले (सर्वात डावीकडे) तसेच जालनाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी नागवे  यांच्या शेतीला भेट दिली. त्यांच्या प्रयोगशीलतेचे व प्रयत्नांचे कौतुक केले.  

शेततळ्यांची सुविधा 
हंगामी विहिरी जेव्हा पाण्याची आत्यंतिक गरज असायची त्यावेळीच दम तोडायच्या. त्याला पर्याय म्हणून २०१३ मध्ये एक कोटी लिटर क्षमतेचं शेततळं घेतलं. शेततळ्यामुळे कपाशीचे पूर्वहंगामी उत्पादन घेणं शक्य झालं. सन २०१५ मध्ये पुन्हा ५० लाख लिटर क्षमतेचं शेततळं घेतलं. पूर्वीच्या दोन विहिरींना आणखी एका खोदलेल्या विहिरीची जोड दिली. शेतीची ‘लेव्हल’ही या काळात केली.  

अाले पिकाने दिले आर्थिक बळ 
पाण्याची उपलब्धता वाढल्याने २०१५ मध्ये बेड पद्धतीने आल्याची लागवड केली. यात १८ टन उत्पादन मिळाले. त्यास २२०० रुपये प्रति क्‍विंटल दर मिळाला. सन २०१६ मध्ये पुन्हा तीन एकरांत आले घेतले. त्यातून १० टनांचा उतारा मिळाला. मात्र दर पडल्याने केवळ ९२५ रुपये प्रतिक्‍विंटल दराने जागेवरूनच विक्री केली. उत्पादन व उत्पन्न वाढवलेल्या सोमनाथ यांनी मग शेतीची सुपीकताही  वाढविण्यासाठी शेतात गाळही टाकला. 

जनावरांची साथ 
शेतीला लागणारे शेणखत आपल्याकडेच उपलब्ध व्हावे यासाठी दोन बैल व सहा म्हशींचे पालन केले आहे. त्याचबरोबर दुधाचाही प्रश्न मिटला आहे.  

आंतरपीक प्रयोग 
तीन एकर आले क्षेत्रात दोन वर्षांपूर्वी कोथिंबीर घेतली. या प्रयोगात २५ ते ३० क्‍विंटल धने उत्पादन घेतले. त्याची थेट ग्राहक व विक्रेत्यांना प्रतिकिलो १५० रुपयांप्रमाणे विक्री करीत ४२ हजारांचे उत्पन्न मिळविले. पैकी काही धने अजूनही विकणे सुरू आहे. मागील वर्षी आले पिकातच मेथी घेतली. संपूर्ण प्लाॅट ४५ हजार रुपयांना व्यापाऱ्याला दिला. यासाठी लागणाऱ्या मजुरांचा व वाहतुकीचा खर्च स्वत: व्यापाऱ्याने उचलला. मागील नुभवावरून यंदा कपाशीत मेथीचा प्रयोग केला. मात्र आवक वाढल्याचा फटका बसला. दर न मिळाल्याने मेथीचे खत करून जमिनीची सुपीकता वाढविण्याचा निर्णय घेतला. मात्र मुख्य पिकांत कमी कालावधीची पिके घेतल्याचा फायदा मिळत असल्याचे सोमनाथ सांगतात. अलिकडे कोथिंबिरीला चांगले दर होते मात्र मेथी घेतल्याने हे पीक घेतले नव्हते. 
- सोमनाथ नागवे, ९८८१६३७१७९