नैसर्गिक, औषधी गुणधर्माचे मणिपूरचे कचई लिंबू

भारतात उत्पादीत होणाऱ्या लिंबू वाणांपेक्षा कचई लिंबू उच्च गुणधर्माचे मानले जाते.
भारतात उत्पादीत होणाऱ्या लिंबू वाणांपेक्षा कचई लिंबू उच्च गुणधर्माचे मानले जाते.

अन्नाला खास चव आणणारा घटक म्हणजे लिंबू. शास्त्रीयदृष्ट्या आम्लयुक्त दर्जाचा अन्नपदार्थ असल्याने तेलकट गुणधर्म नष्ट करण्याची नैसर्गिक क्षमता लिंबामध्ये उपजत असते. उन्हाळ्यात लिंबू लवकर खराब होतो. एकजरी लिंबू खराब झाले तर त्याच्याबरोबर अनेक लिंबू खराब होतात. लवकर खराब न होणारे आणि नैसर्गिक औषधी गुणधर्म असलेले, तसेच ते सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले आणि भारत सरकारकडून जीआय मानांकन मिळालेले लिंबू अापल्याला मिळाले, तर हो असेच जीआय मानांकन मिळालेले सर्वगुणसंपन्न बहुगुणी कचई लिंबू जे मणिपूर राज्यात मिळतात. 

जीअाय मानांकनासाठी झालेले प्रयत्न
केंद्र शासनाच्या मालकीची उत्तर-पूर्व विभागीय कृषी विपणन निगम लिमिटेड (NERAMAC) ने जीआय मानांकन मिळण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या संस्थेने १० डिसेंबर २०१३ मध्ये जीआय रजिस्ट्रीकडे जीआय मानांकनासाठी अर्ज सादर केला होता. 

साधारणपणे दीड वर्षाच्या अथक प्रयत्नांनंतर २७ मार्च २०१५ मध्ये त्यांना जीआय मानांकन मिळाले. जीआय मिळाल्यामुळे मणिपूरचे हे लिंबू जागतिक बाजारपेठांमध्ये पोचले आहेत. यामुळे येथील आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

जागतिक प्रदर्शनात मिळाले स्थान
मागील आठवड्यात १४-१६ सप्टेंबर २०१७ दरम्यान पार पडलेल्या अन्नपूर्णा-वर्ल्ड फूड ऑफ इंडिया या भारत सरकारने आयोजित केलेल्या जागतिक प्रदर्शनात इतर राज्यांतील तसेच महाराष्ट्रातील वायगाव हळद, नवापूर तूरडाळ, सांगली बेदाणे, वेंगुर्ल्याचे काजू, नागपूरची संत्री, पुरंदरचे अंजीर, नाशिकची वाइन आणि मणिपूरमधील कचई लिंबू हे जीआय मानांकन मिळालेले उत्पादने ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनात विदेशी व्यापाऱ्यांकडून लिंबाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

कचई लिंबाचे वेगळेपण
भारतात वाढलेल्या इतर लिंबू वाणांपेक्षा कचई लिंबू हे एकमेवाद्वितीय असे मानले जाते, कारण त्यात ५१ टक्के एस्कॉर्बिक ॲसिड आहे. जे आतापर्यंत सिट्रसच्या फळांमध्ये उपलब्ध असलेले उच्चतम आहे. इतर लिंबू जातींमध्ये केवळ २० ते ३० टक्के एस्कॉर्बिक अॅसिड असते. 

रसाचे प्रमाण ३६-५६ मिलि प्रतिफळ एवढे आहे. झाड कापणीच्या वेळी फुलांच्या झाडांसारखे दिसतात. फळे पूर्णपणे तयार झाल्यावर सुंदर, रंगीत आणि आकर्षक दिसतात. या फळाची काढणी नोव्हेंबरपासून एप्रिलपर्यंत सुरू असते. 

झाडांची उंची साधरणतः ३ ते ४ मीटर एवढी असते. एक झाड साधारणतः ३० वर्षांपर्यंत जगते. एका फळाचे वजन ७० ते १०० ग्रॅमएवढे असते. लिंबाचा स्वाद अन्य लिंबू जातींपेक्षा वेगळा आहे. चव गोड आणि आंबट अशी मिश्र आहे. 

हे फळ आरोग्यासाठी, नैसर्गिक, रसायनमुक्त आहे.  

मिळाले वैशिष्ट्यपूर्ण हवामान
येथील लिंबू उत्पादन पूर्णतः नैसर्गिक साधनांवर अवलंबून आहे. येथील हवामान उष्ण कटिबंध आणि आर्द्रतायुक्त आहे. येथील वार्षिक तापमान सरासरी १९ ते २१ अंश सेल्सिअस असते. 

सरासरी १३०० ते १५०० मिमी. पाऊस पडतो. हिवाळ्यामध्ये येथे मोठ्या प्रमाणात धुके तयार होते. धुक्यामधून बऱ्याच प्रमाणात झाडांना पाणी मिळते. 

उखरूल जिल्ह्यात उच्च उत्पादन देणारी जमीन आहे. साधारणपणे ८८० हेक्टर क्षेत्रामध्ये ५७३७ मेट्रिक टन लिंबू तयार होते. येथील काही शेतकऱ्यांच्या मते २०० लिंबू झाडांमध्ये दरवर्षी ४० ते ५० हजार रुपये मिळतात.  

लिंबाचा उपयोग रस आणि लोणचे बनवण्यासाठी केला जातो. या 
फळामध्ये सर्वात जास्त जीवनसत्व ‘सी’ आहे. त्याचबरोबर जीवनसत्व ‘ए’, फाॅलिक अॅसिड, फायबर मुबलक प्रमाणात आहे.

लागवडीसाठी दिले जाते प्रोत्साहन
कचई येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात कचई लेमन महोत्सवाचे आयोजन केले जाते. हा महोत्सव खरेदीदार आणि उत्पादक याची बैठक आयोजित करून या फळाविषयी जास्तीत जास्त माहिती देणे, उत्पादकांना नवीन खरेदीदार मिळवून देणे, उत्पादकांना नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती देणे, कचई लिंबू लागवडीचे क्षेत्र वाढवण्यासाठी उत्पादकांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने आयोजित करण्यात येतो.

कचई लिंबाचा इतिहास
मणिपूर राज्यातील उखरूल जिल्ह्यापासून सुमारे १६ किमी अंतरावर कचई हे गाव आहे. हे गाव लिंबू लागवड आणि उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या लिंबाचा ६० वर्षांपेक्षा जुना इतिहास असल्याचा उल्लेख आढळतो. उत्तर-पूर्व भारतातील दहा बागायती उत्पादनांपैकी कचई लिंबू या नावाने प्रसिद्ध असलेल्या लिंबाला जीआय मानांकन मिळाले आहे. 
  
- गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१ (लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com