सोयाबीन, भुईमुगासाठी काटोलची बाजारपेठ

काटोल बाजार समितीत सुरू असलेले भुईमूग शेंगांचे लिलाव.
काटोल बाजार समितीत सुरू असलेले भुईमूग शेंगांचे लिलाव.

संत्रांच्या बागांसाठी काटोल (जि. नागपूर) तालुक्‍याची सर्वदूर ओळख आहे. फळे-भाजीपाला शेतमाल नियमनमुक्‍त झाल्यानंतरही छोट्या संत्रा उत्पादकांचे हित लक्षात घेऊन काटोल बाजार समितीने विविध सुविधा पुरवल्या. त्याव्यतिरिक्त सोयाबीन व भुईमूग खरेदीचे ‘हब’ म्हणून देखील बाजार समितीने वेगळे अस्तित्व तयार केले आहे.
 

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुका संत्रा बागांसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. याच तालुक्याच्या ठिकाणी काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहे. सन १९४० मध्ये ब्रिटिश राजवटीत कापूस खरेदीसाठी तिची स्थापना झाली.

त्यानंतर १९६३ मध्ये पणन कायद्यांतर्गत समायोजन झाले. सुरवातीला अडीच एकरांवर मार्केट यार्ड व कार्यालय होते. सन २०१४ मध्ये त्याचे स्थलांतरण सध्याच्या १६ एकरांवरील विस्तीर्ण परिसरात झाले. जुना अडीच एकराचा परिसर आता तसेच कोंडाळी येथील सात एकर असे दोन उपबाजार आहेत. 

मुख्य बाजारात संत्रा मंडी

फळ बाजार नियमनमुक्‍त झाला असला तरी शेतकऱ्यांसाठी मंडीची व्यवस्था आहे. व्यापारी याच ठिकाणी संत्र्यांची खरेदी करतात. याच ठिकाणी पॅक़िग करून देशभरात तो पाठविला जातो. मुख्यत्वे सोयाबीन, भुईमूग शेंग, तूर, हरभरा आदींची आवक होते. मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर हा  तालुका असल्याने तेथील तालुक्यांतूनही सोयाबीनची आवक होते. गहू, ज्वारी, मका, उडीद, संत्रा, मोसंबी आदींचीही आवक सुरू असते.

जनावरांचा बाजार
दर मंगळवारी मुख्य बाजार परिसरात जनावरांचा बाजार भरतो. सन १९४० मध्ये तो अस्तित्वात  आला. मध्य प्रदेशातूनही येथे जनावरे येतात. दर आठवड्याला बाजार समितीला २५ ते ३०  हजार रुपयांचा सेस शेकडा एक रुपया पाच पैसे याप्रमाणे मिळतो.  

सामाजिक उपक्रमांवर भर

सर्पदंश, अपघाती मृत्यू, वीज पडून मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना दहा हजार रुपयांची मदत देण्याची योजना सामाजिक जाणिवेतून राबविली जाते. तालुक्‍यातील ५५ शेतकरी कुटुंबीयांना या अंतर्गत मदत देण्यात आली. 
माल विक्रीचा निर्णय घेणे सोपे व्हावे यासाठी एसएमएसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भाव कळविल जातात. त्याअंतर्गत पाच हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. 

नव्या बाजार समिती परिसराला संरक्षक भिंत व प्रवेशद्वाराचे काम प्रस्तावीत. ते लवकरच सुरू होईल. 

येत्या काळात आवारात सोलर पॅनल बसवून ऊर्जेत स्वयंपूर्ण होण्याचा बाजार समितीचा प्रयत्न. 

गौरवाद्वारे पाठीवर थाप 

तालुक्‍यातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या पाठीवर थाप पडावी यासाठी बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांना गौरविण्याचा उपक्रम राबविण्यात येतो. कुटुंबातील गुणवंत पाल्याचाही सन्मान केला जातो. 

भाग्यशाली शेतकरी योजनेतून १४ हजार शेतकऱ्यांना कूपन्स देण्यात आली. वार्षिक सर्वसाधारण सभेत  सोडत काढली जाते. अडीचशे शेतकऱ्यांना कृषी अवजारांचे वाटप याअंतर्गत होते. यात फवारणी पंप, ताडपत्री यासारख्या वस्तू बक्षीस स्वरूपात दिल्या जातात. शेतकऱ्यांसाठी गावपातळीवर चर्चासत्रे घेतली जातात. काटोल येथील उपबाजारातील सभागृह त्यासाठी निःशुल्क उपलब्ध केले जाते. 

कोंडाळी उपबाजार

काटोलपासून १५ किलोमीटरवर  बाजार समितीचा कोंडाळी उपबाजार आहे. पूर्वी या ठिकाणी सोयाबीन खरेदी व्हायची. मात्र उत्पादकतेत झालेली घट, दरातील चढउतार यामुळे क्षेत्र घटले. परिणामी या ठिकाणी सोयाबीनची आवक हंगामात झाली नाही. या ठिकाणी ६० टन मे. टन क्षमतेच्या वजनकाट्याची परिसरातील एकमेव सुविधा आहे. शेतकरीहिताचे उपक्रम राबविण्यासाठी आणखी जागा मिळावी यासाठी बाजार समितीने शासनाकडे लगतच्या चार एकर जागेच्या मागणीचा प्रस्ताव दिला आहे. बाजार समितीची सध्याची १६ एकर व ही जागा मिळून संपूर्ण परिसर २० एकरांचा होईल. 

बाजार समितीच्या सुविधा
लिलावात माल देऊन बाजार समिती कार्यालयात पट्टी दाखविल्यानंतर त्याच ठिकाणी पाच रुपयांचा भरणा करावा लागतो. तेथेच शेतकऱ्यांना जेवणाचे कुपन दिले जाते. आवारातील उपाहारगृहात पोटभर जेवणाची सोय आहे. 
मध्यवर्ती ठिकाणी आरओ तंत्राचे (रीव्हर्स आॅसमॉसीस) पाणी
सात मेट्रिक टन क्षमतेचा वजनकाटा. (इलेक्‍ट्रॉनिक काटा).
शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तात्काळ निरसन करण्यावर भर 
सिमेंटचे रस्ते असल्याने शेतमालाची नासाडी टळण्यास मदत  

शेतमाल साठवणुकीकरिता शेड
शेतमाल साठवणुकीसाठी दोन एकरांतील जागेत ७५ बाय १८ मीटर आकाराचे चार शेडस.  
सोळा हजार चौरस फुटांची दोन गोदामे (पाच हजार मे. टन क्षमता) 
गोदाम पूर्वी उपबाजार परिसरात होते. मुख्य मार्केट यार्ड परिसरातही नव्याने अडीच हजार मेट्रिक टन क्षमतेची दोन गोदामे नुकतीच उभारली. 

शेतमालाचे भाव कमी झाल्याच्या काळात शेतमाल तारण योजना. सोयाबीन तारणावर शेतकऱ्यांचा भर राहतो. यावर्षीच्या हंगामात १६ शेतकऱ्यांनी शेतमाल तारण ठेवला. त्यापोटी १३ लाख ६७ हजार ३५६ रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले. बाजार समितीच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी व्यावसायिक संकुल. त्या माध्यमातून १०४ गाळे बांधण्यात येतील. 

मुख्य सुविधा 
१. रस्त्यांचे काँक्रिटीकरण. त्यामुळे मालाची नासाडी होत नाही.
२. शेतमाल साठवणुकीसाठी नव्याने शेडची उभारणी सुरू आहे.
३. शेडमधील शेतमाल

- तारकेश्‍वर शेळके, ९८२२५७७०६५, सभापती, काटोल बाजार समिती.
- पराग दाते, ९८२२२०४४३२, सचिव, काटोल बाजार समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com