खरिपात खर्चही निघेल असं वाटत नाही

नेप्ती (ता. नगर) - वाळलेल्या मुगाचा शेंडा तोडण्याचे काम सुरू आहे.
नेप्ती (ता. नगर) - वाळलेल्या मुगाचा शेंडा तोडण्याचे काम सुरू आहे.

मागचे पाच-सहा वर्षे दुष्काळात गेली, गेल्या दोन वर्षांपासून जरा बरा पाऊस पडतोय. यंदाही चांगला पाऊस होईल असं वाटलं होतं. पण सारं फेल गेलं. मोठा खर्च करून खरिपाची पेरणी केली, मात्र पाऊस गायब झाल्याने पेरलेलं वाया जाऊ लागलं आहे. पिकाची वाढ खुंटली, पिकं माना टाकू लागल्याने आता उत्पादनात घट होणार हे निश्‍चित आहे. त्यामुळे खरिपात बियाणे-खताला केलेला खर्चही निघेल असं वाटत नाही. यंदाचा खरीपही आतबट्ट्याचाच राहणार हे दिसत आहे, अशी हतबलता पाथर्डी, पारनेर, नगर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील करंजी घाटाखाली दगडवाडी, लोहसर, करंजी, तिसगाव पट्ट्यातील घाटशिरस, मढी, देवराई भागातील शेतपिकांची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली. या भागात डाळिंब बागा आहेत. शिवाय खरिपातील बाजरी, तूर, मूग, सोयाबीनची पिके आहेत. मुगाचे पीक आता काढणीला आलेले आहे. मात्र पाऊस नसल्याने मुगाला शेंगाच आल्या नाहीत.

पिंपळगाव लांडगा, कौडगाव भागातही परिस्थिती गंभीर आहे. उडीद, मुगाच्या उत्पादनात सुमारे सत्तर टक्के घट झालेली दिसत आहे.  कापूस, बाजरी, तुरीच्या पिकांची वाढ खुंटलेली आहे. अनेक ठिकाणी पिके जागेवर करपत आहेत. नेप्ती, जखणगाव, वडगाव आमली, खातगाव टाकळी, हिवरेबाजार, पिंपळगावकौडा, पिंगळगाव वाघा (ता. नगर) या भागांत सर्वाधिक मुगाचे पीक घेतले जाते. बहुतांश ठिकाणी शेतकरी हाती आलेल्या मुगाच्या शेंडा तोडताना दिसून आले. अनेक ठिकाणी मूग जागेवरच करपलेला दिसला. पारनेर, भाळवणी, कान्हुर पठार आदी भागांत वटाणा अडचणीत आला आहे. दुष्काळी पट्ट्यात वटाण्याचे पीक पावसाअभावी करत आहे. ‘पेरणी, बियाणे खताला खर्च केला; पण आता खर्चही निघेल असे वाटत नाही, असे शेतकरी सांगतात. शेवगाव, बोधेगाव, आधोडी, पाथर्डीमधील भालगाव, खरवंडी, येळी, जांभळी, पिंपळगाव भागातील कापसाच्या पिकांनी माना टाकल्या आहेत. कर्जत तालुक्‍यातील अनेक भागात कापूस, तूर, सोयाबीन संकटात आले आहे. 

फळबागा संकटात
नगर जिल्ह्यामध्ये साधारण ९० हजार हेक्‍टर क्षेत्रावर सध्या फळबागा आहेत. गेल्या दोन एक महिन्यापासून थेंबभरही पाऊस झाला नाही. त्याचा परिणाम खरीप पिकांबरोबरच फळबागांवरही झाला आहे. जामखेड, श्रीगोंदा, कर्जत, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, या आकरा तालुक्‍यांत फळबागा अडचणीत आल्या आहेत. डाळिंब, मोसंबी, संत्र्याचे करंजी भागात सर्वाधिक क्षेत्र आहे. 

पिण्याच्या पाण्याचेही संकट
यंदा भर पावसाळ्यात सध्या पारनेर, पाथर्डी व संगमनेर तालुक्‍यातील २३ गावांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पन्नासपेक्षा अधिक गावांत भीषण टंचाई आहे. पाऊस नसल्याने चराई क्षेत्रावर चारा उपलब्ध झाला नाही, त्याचा पशुधनावर परिणाम होत आहे.

माझ्याकडे चार एकर फळबाग आहे. यंदा डाळिंबासाठी मृग बहर धरला होता. मात्र पाऊस नसल्याने डाळिंबाला फळ आले नाही. जे काही थोडेफार फळ आले, त्याची वाढ झाली नाही. तूर, बाजरीही वाया गेल्यात जमा आहे.
- दिलीप शिंदे, शेतकरी दडगवाडी (ता. पाथर्डी)

अल्प पावसावर उडीद, मूग, सोयाबीनची पेरणी केली, मात्र पेरणीनंतर पाऊस झालाच नसल्याने उगवलेली सगळी पिके करपून वाया गेली आहेत. 
- दादा बिटके, बिटकेवाडी (ता. कर्जत)

वाटाण्याच्या उत्पादनात पन्नास टक्‍के घट झाली. हवा तसा दर्जा मिळाला नाही, त्यामुळे त्यामुळे दर मिळाला नाही. 
- संतोष जपकर, शेतकरी भाळवणी (ता. पारनेर)

खरिपाची पेरणी केली, पण पाऊस नसल्याने सारी पिके जवळपास वाया गेली आहेत. शासनाने पंचनामे करावेत. खरिपातील सर्व पिकांना नुकसान भरपाई आणि पीक विमा लागू व्हावा.
- पद्माकर कोरडे, शेतकरी, वाकोडी (ता. नगर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com