गोड्या पाण्यातील ‘कोळंबी’चा पहिला प्रयोग शिरोळ तालुक्‍यात

राजकुमार चौगुले 
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - क्षारपडीने त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारा गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धनाचा प्रयोग अकिवाट (ता. शिरोळ) येथे यशस्वी झाला आहे. अरुण आलासे यांनी केंद्र शासनाच्या सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली कोळंबी उत्पादन घेतले आहे. गोड्या पाण्यातील कोळंबीपालनाचा हा देशात पहिलाच प्रयोग असल्याचा त्यांचा दावा आहे. 

कोल्हापूर - क्षारपडीने त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारा गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धनाचा प्रयोग अकिवाट (ता. शिरोळ) येथे यशस्वी झाला आहे. अरुण आलासे यांनी केंद्र शासनाच्या सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली कोळंबी उत्पादन घेतले आहे. गोड्या पाण्यातील कोळंबीपालनाचा हा देशात पहिलाच प्रयोग असल्याचा त्यांचा दावा आहे. 

शिरोळ तालुक्‍यात हजारो एकर क्षेत्र क्षारपड आहे. श्री. आलासे यांचेही क्षेत्र क्षारपड आहे. या जमिनीतून काही तरी करण्याच्या उद्देशाने त्यांनी २००५ मध्ये मत्स्यपालनाचा व्यवसाय सुरू केला. रोहू, कटला या नियमित माशांचे उत्पादन सुरू केले; पण काही कालावधीनंतर हे उत्पादन बंद केले. आता या तळ्यांचे काय करायचे, हा प्रश्‍न निर्माण झाला. यातून कोळंबी संवर्धनाची कल्पना सुुचली. कोळंबी उत्पादन घेणाऱ्या देशभरातील संस्था व शेतकऱ्यांकडे फिरून त्यांनी याबाबतची माहिती घेतली. क्षारपड जमिनीत आवश्‍यक इतके क्षार माशांना उपयुक्त ठरू शकतात, याचा अभ्यास करून हा प्रोजेक्‍ट उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी केंद्र शासनाच्या वाणिज्य खात्याअंतर्गत येणाऱ्या सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाकडे याबाबतचा प्रस्ताव सादर केला. सुरवातीला रोजन बर्गी या कोळंबीचे उत्पादन घेतले.

‘वेनामी’ जातीची कोळंबी 
चेन्नईतील नर्सरीतून ‘वेनामी’ कोळंबीची १ लाख ७० हजार बियाणे (पिली) आणले. ही पिली अर्ध्या एकराच्या तळ्यात सोडली. तळ्यातील पाण्याचे दररोज पृथक्करण केले. क्षारता, कॅल्शिअम, व पोटॅशची योग्य मात्रा ठेवली. कोळंबीला जेवढे ऑक्सिजन जास्त मिळेल तितकी वाढ चांगली होते. यामुळे हवेतील ऑक्सिजन पाण्यात देणारी इलेक्ट्रिक यंत्रे आणली. लहान पिली पाण्यात टाकल्यानंतर १२० दिवसांनी त्याची वाढ २५ ग्रॅम इतकी झाली आहे. कोळंबीला बाजारात ४०० रुपये किलो प्रमाणे दर मिळत आहे. ती निर्यात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. २० गुंठ्यातील शेततळ्यात साधारणपणे एकूण अडीच टन उत्पादन अपेक्षित आहे. यातून ९ ते १० लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. चार लाखांचा खर्च वजा जाता चार ते पाच लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळेल, असे श्री आलासे यांनी सांगितले. (अरुण आलासे - ९८२२३७००४४)

कोळंबी संवर्धनासाठी काटेकोर नियोजन, व्यवस्थापन व तज्ज्ञ व्यक्तींचे सल्ले खूप महत्त्वाचे आहेत. श्री. आलासे यांनी या बाबीकडे लक्ष दिल्याने त्यांना हा मार्ग गवसला आहे. हा प्रयोग क्षारपड असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक आहे.
- डॉ. विजय जोशी, माजी सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी