लिंबू फळपिकातील खत व्यवस्थापन

रींग पद्धतीने लिंबाच्या झाडाच्या घेराखाली खत व्यवस्थापन करावे.
रींग पद्धतीने लिंबाच्या झाडाच्या घेराखाली खत व्यवस्थापन करावे.

लिंबू हे पीक संवेदनशील असल्यामुळे आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी पडल्यास त्याचा झाडावर विपरीत परिणाम लगेच दिसून येतो. त्यामुळे सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा योग्य प्रमाणामध्ये वापर करणे आवश्यक आहे.
 

पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ती अन्नद्रव्ये जमिनीतून उचलली जातात. त्या तुलनेमध्ये जमिनीमध्ये योग्य तितक्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्ये देणे आवश्यक असते. अन्यथा या अन्नद्रव्यांची जमिनीमध्ये कमतरता येत जाते. अशा कमतरतांचा प्रभाव तुलनेने संवेदनशील असलेल्या पिकांवर त्वरीत दिसून येतो. लिंबू हे फळपीक अन्नद्रव्यांच्या कमतरतेसाठी संवेदनशील असल्यामुळे, त्यावर त्वरीत विपरीत परिणाम दिसून येतात. परिणामी उत्पादनात घट येऊ शकते. माती परीक्षण आणि त्या आधारे केलेल्या शिफारशी यांचा उपयोग खतमात्रा ठरविण्यासाठी केला पाहिजे. त्याच प्रमाणे खते देण्याची योग्य वेळ व पद्धतीचाही अवलंब करावा.  

लिंबू पिकासाठी आवश्यक अन्नद्रव्ये -
नत्र - नत्र हे अन्नद्रव्याचे संतुलन चक्र असून, नत्रामुळे अन्य अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यास मदत होते. लिंबूला बहार येण्यासाठी नत्राची आवश्यकता आहे. बहार येते वेळी पानातील नत्र हा फुलांमध्ये जातो. फुले टिकून राहतात व फळधारणा होते. नत्रामुळे झाडाची वाढ जोमाने होते. पानांचा रंग गर्द हिरवा होतो आणि अधिक उत्पादन मिळते. 

स्फुरद - लिंबू झाडाला नवीन पालवी फुटते. पेशीची निर्मिती होते. मुळाची भरपूर वाढ होते. फळांचा आकार मोठा होऊन उत्तम प्रतीचे उत्पादन मिळते. 
पालाश :  पेशींचे विभाजन करण्यासाठी पालशची गरज असते. पालाशमुळे झाड रोगास किंवा किडीस बळी पडत नाही. पाण्याचा ताण व कडाक्याची थंडी सहन करण्याची क्षमता वाढते. फळाची प्रत सुधारते व उत्पादन वाढ होते. 

अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे 
नत्र - झाडाची पाने व शिरा पिवळ्या पडतात. झाडाची वाढ खुंटते, झाडावर सल येते. कळ्यांचा आकार लहान होऊन उत्पादनात घट येते. झाडाचे आयुष्य कमी होऊ शकते. 

स्फुरद - कमतरतेमुळे अन्नरस निर्माण होण्याची क्रिया मंदावते. झाडाची वाढ खुंटते. फळधारणा कमी होते. फळाची प्रत बिघडते. अपरिपक्व फळाची गळ होते. कळ्या सुप्तावस्थेत राहून सुकतात. झाडाची पाने निस्तेज दिसतात.

पालाश - पालाशच्या कमतरतेमुळे पानगळ होते. मोठ्या झाडात शेंड्याकडील वाढ खुंटते आणि लहान झाडात कमजोर फुटवे फुटतात. जास्त कमतरता असल्यास पाने वाकडी होतात व अपरिपक्व फळे गळतात. 

कॅल्शियम - कमतरतेमुळे पानातील शिरा पिवळ्या पडतात. पाने परिपक्व होण्याअगोदर गळून पडतात. 

गंधक - कमतरतेमुळे लिंबू झाडाची पाने पिवळी पडतात. फळांची साल जाड दिसून येते. फळे रसविरहीत होतात. 

तांबे - कमतरतेमुळे झाडाची पाने व शिरा रंगहीन बनतात. 

लोह - कमतरतेमुळे फळावर काळे ठिपके दिसून येतात. पानाचा आकार लहान होऊन पाने गळतात. 

बोरॉन - कमतरतेमुळे पाने कोमेजतात, वाकडी होऊन गळतात. फळे लहान व कठीण होतात.

मँगेनीज - कमतरतेमुळे फिकट रंगाच्या पानावर गर्द हिरव्या रंगाच्या शिरा दिसतात.  

लिंबू झाडासाठी खतमात्रेचे प्रमाण ठरवताना झाडाचे वय, जमिनीचा प्रकार, आम्लविम्ल निर्देशांक आणि होणारी फळधारणा यांचा विचार करावा.  

खत व्यवस्थापन -
१ ते ५ वर्षांपर्यंत झाडांसाठी खते देताना -
पूर्ण शेणखत मेच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात द्यावे. 
रासायनिक व सेंद्रिय खते जून, सप्टेंबर व फेब्रुवारी या महिन्यात तीन समान हप्त्यात विभागून घ्यावीत. 

सहा वर्षे व त्यावरील झाडांना खते देताना -
बहारासाठी पाण्याचा ताण संपताना - नत्राची अर्धी मात्रा, शेणखत, स्फुरद व आवश्यकतेनुसार पालाशचा पूर्ण हप्ता द्यावा.

फळे वाटण्याएवढी झाल्यावर (एक ते दीड महिन्याने) - उरलेली नत्राची अर्धी मात्रा अधिक शेणखत अधिक ७.५ किलो निंबोळी ढेप प्रति झाड द्यावी. 

खते देण्याची पद्धत -
खते देताना झाडाखाली न देता झाडाच्या घेराखाली जमिनीत ३ - ४ से. मी. खोल मातीत मिसळून द्यावीत. रासायनिक खते मातीत मिसळून दिली तरच त्याचा परिणाम चांगला होतो. झाडाची क्रियाशील मुळे झाडाच्या घेरासारखी असतात, म्हणून खते ही नेहमी घेराखालीच द्यावीत. 

शेणखत, गांडूळखताचे फायदे -
सेंद्रिय पदार्थ जमिनीत टाकल्यामुळे मातीच्या भौतिक-रासायनिक गुणधर्मावर चांगले परिणाम होतात. सेंद्रिय खत जमिनीत वाढणाऱ्या पिकांना समतोल अन्न पुरवण्यासोबतच जमिनीतील असंख्य सूक्ष्म जिवाणूंना आवश्यक अन्न व ऊर्जा पुरवतात. परिणामी सूक्ष्म जिवाणू जमिनीत क्रियाशील राहतात. 

सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील मातीच्या कणाची घडण रवेदार (रवाळ) राहण्यास मदत होते. लिंबू झाडाच्या मुळाशी हवा खेळती राहून झाडाची वाढ जोमाने होते. परिणामी उत्पादन वाढ मिळू शकते.

लिंबू बागेला सिंचनाची आवश्यकता असते, त्यामुळे जमिनीत पोत बिघडतो. सेंद्रिय खते जमिनीचा पोत सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतात. 

सेंद्रिय पदार्थांपासून सॅलिसीलिक आम्ल तयार होते. हे आम्ल चिलेटिंग एजंट म्हणून काम करते. त्यामुळे स्फुरद आणि सुक्ष्म अन्नद्रव्ये लिंबू झाडास सहज उपलब्ध होतात. 

सेंद्रिय खतापासून जमिनीत प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स) तयार होतात. लिंबू झाडांचे जिवाणूजन्य रोगांपासून संरक्षणास मदत होते.

सेंद्रिय खतामुळे संजीवकांच्या निर्मितीला चालना मिळते. बहार येण्यास मदत होते. 
- रवींद्र जाधव, ९४०३०१६१०१.     

- सुरेश फुलमाळी, ९४२१५४०६१६. (सहायक प्राध्यापक, सौ. के. एस. के. कृषी महाविद्यालय, बीड.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com