शेतीमध्येही गिरविले आधुनिकतेचे धडे

शेतीमध्येही गिरविले आधुनिकतेचे धडे

घाटकोपर (मुंबई) येथील तानाजी मोहिते यांनी शिक्षकीपेक्षा सांभाळात रहिमतपूर (जि. सातारा) येथील वडिलोपार्जित शेती चांगल्या पद्धतीने विकसित केली आहे. प्रयोगशील शेतकरी, कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने  जिरायती शेती बागायती करत ऊस, आले आणि भाजीपाला लागवडीस त्यांनी सुरवात केली. शेती नियोजनात त्यांना घरच्यांचीही मोलाची साथ लाभली आहे.
 

घाटकोपर (मुंबई) येथील तानाजी मारुती मोहिते हे दि नॉर्थ बॉम्बे वेल्फेअर सोसायटी सेकंडरी स्कूलमध्ये ३४ वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत होते. २०१४ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. तानाजी मोहिते यांना जितेंद्र व महेंद्र ही दोन मुले. दोन्ही मुलांचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले असून, सध्या मुंबईमध्येच नोकरी करतात. त्यामुळे मोहिते कुटुंब मुंबईमध्येच स्थिरस्थावर झाले आहे. शिक्षकीपेशा सांभाळत तानाजी मोहिते यांनी रहिमतपूर (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील वडिलोपार्जित शेती विकासामध्ये बारकाईने लक्ष दिले आहे. 

शेती नियोजनाबाबत तानाजी मोहिते म्हणाले, की २००८ मध्ये कुटुंब विभक्त झाल्यावर मला चौदा एकर शेतजमीन वाटणीस आली. त्या काळी पाण्याची पुरेशी सोय नसल्याने सर्व शेती जिरायती होती. पावसाच्या पाण्यावर पीक लागवडीचे नियोजन असायचे. या काळात मी प्रामुख्याने ज्वारी, सोयाबीन, भुईमूग लागवड करीत होतो. बागायत शेती करण्यासाठी मी २००९ मध्ये विहीर खोदली. रहिमतपूर गावशिवारात माझी दोन ठिकाणी शेती विभागलेली आहे. प्रत्येक शेतात पाणी नेण्यासाठी सुमारे पाच हजार फूट पाइपलाइन केली. विहीर आणि पाइनलाइनसाठी सुमारे बारा लाख रुपये खर्च आला. विहिरीला चांगले पाणी चांगले लागल्याने पीक लागवडीच्या उत्साहात वाढ झाली. 

मुंबईत शिक्षक म्हणून नोकरी करत असल्याने शेतीकडे लक्ष देण्यास फारसा वेळ मिळत नव्हता. परंतु शेती चांगल्या प्रकारे करण्यासाठी सुरवातीच्या काळात माझ्याकडे मजुरी करणाऱ्यास मी पीक उत्पादनातील चौथा वाटा देत होतो. प्रत्येक रविवारी मी गावी येऊन व्यवस्थापन पाहणाऱ्याच्या बरोबरीने पुढील आठवड्यातील पीक नियोजन करायचो. या काळात पाण्याच्या उपलब्धतेनुसार मी ऊस, रब्बी ज्वारी, गहू, भुईमूग लागवडीकडे वळलो. लागवड करताना परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला उपयुक्त ठरत गेला. त्यामुळे पीक व्यवस्थापनातील तंत्र समजत गेले. शाळेत शिकविण्याच्या बरोबरीने मी स्वतःच्या शेतीमध्ये पीक बदल करण्यासाठी कृषी तज्ज्ञ, तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून स्वतःही शेतीमधील बदल शिकत होतो. त्याचा सध्या मला पीक नियोजनासाठी फायदा होत आहे. 

पीक नियोजनात केला बदल 
तानाजी मोहिते हे २०१४ मध्ये शिक्षकी पेशातून निवृत्त झाले. त्यामुळे मुंबईहून गावाकडे जाण्यासाठी जास्तीचा वेळ मिळू लागला. त्यामुळे त्यांनी पीक व्यवस्थापनामध्ये अधिक लक्ष देण्यास सुरवात केली. याबाबत माहिती देताना मोहिते म्हणाले, की मी पहिल्यांदा शेती व्यवस्थापनात बदल केला. मजुरीसाठी पीक उत्पादनातील वाटा देण्याची पद्धत बंद केली. शेतीचे व्यवस्थापन स्वतःकडे घेतले. शेतीतील दैनंदिन कामासाठी सध्या मी तीन मजूर कायमस्वरूपी ठेवले आहेत. या मजुरांच्या माध्यमातून चौदा एकर क्षेत्राचे व्यवस्थापन केले जाते. पीक नियोजन करताना परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला मला फायदेशीर ठरतो. शेतीतील मशागतीची वेळेत कामे होण्यासाठी ५५ एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर, तसेच त्यासाठी लागणाऱ्या सर्व अवजारांची खरेदी केली. ट्रॅक्टरमुळे शेती मशागतीची कामे वेळेत होतात. पीक व्यवस्थापनात सुधारित तंत्राचा वापर करत आहे. त्याचा पीक उत्पादनवाढीसाठी फायदा होत आहे. सध्या माझ्याकडे दहा एकर क्षेत्रांवर ऊस लागवड आहे. आडसाली आणि सुरू हंगामात लागवड करतो.

दोन सरीत साडेचार फूट अंतर व दोन डोळ्याची कांडी एक फुटावर लावली आहे. सध्या पाच एकरावर को ८६०३२, अडीच एकरावर  व्हिएसआय ८००५ आणि अडीच एकरावर एमएस१०००१ या जातीची लागवड आहे. सध्या चार एकरावरील उसाला ठिबक सिंचन केले आहे. येत्या काळात संपर्ण १४ एकर क्षेत्र ठिबक खाली आणण्याचे नियोजन आहे. जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जास्तीत जास्त शेणखताचा वापर करतो. माती परीक्षणानुसार रासायनिक खत मात्रा दिली जाते. पूर्वी मला उसाचे एकरी ३० टन उत्पादन मिळायचे. परंतु आता सुधारित व्यवस्थापनाचा अवलंबनातून एकरी ६५ टन उत्पादन मिळते. यापेक्षाही उत्पादनवाढीचे मी ध्येय ठेवले आहे. मी गेल्या दोन वर्षांपासून आले लागवड करत आहे. लागवडीपूर्वी मी प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. यंदा दोन एकर क्षेत्रावर साडेचार फुटी गादी वाफ्यावर औरंगाबादी जातीच्या आल्याची लागवड केली आहे. गेल्या वर्षी मला आल्याचे एकरी ४० गाड्या उत्पादन मिळाले. दरही मला चांगला मिळाला. त्यामुळे नफा वाढला.

आले आणि ऊस पीक जास्तीत जास्त किफायतशीर कसे होईल यासाठी मी प्रयत्न करीत असतो. येत्या काळात मी ऊस आणि आले पिकातील आंतरमशागतीसाठी पॉवर टिलर खरेदी करणार आहे. सध्या भोपळ्याच्या लागवडीचे नियोजन केले आहे. याबाबत प्रयोगशील शेतकऱ्यांकडून माहिती घेत आहे.

व्यवस्थापनातील बाबी 
शेतीतील कामे वेळेत करण्यासाठी यांत्रिकीकरणावर भर.
उसाला ठिबक सिंचनाचा वापर. 
पिकांना योग्य वेळी खते देता यावीत म्हणून शिफारशीत खतांचा साठा.
जमीन सुपीकतेसाठी शेणखत, तसेच सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर. 
शिफारशीनुसारच रासायनिक खतांचा वापर.
सातत्याने प्रयोगशील शेतकरी आणि 
कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने पीक नियोजनावर भर. 
 

कुटुंबाची मिळाली साथ 
शेती व्यवस्थापनाबाबत मोहिते म्हणाले, की शिक्षकाची 
नोकरी सुरू असताना प्रत्येक शनिवारी, रविवारी गावाकडे येऊन मी मजुरांना पुढील आठवड्यातील शेतीकामाचे नियोजन करू देत होतो. त्यानुसार आठवडाभर शेतातील काम सुरू राहायचे. सध्या सेवानिवृत्ती झालो असलो, तरी मुंबई येथेच मी मुलांच्या बरोबरीने राहतो. सेवानिवृतीमुळे आता गावी जाण्यास जास्त वेळ मिळतो. शेतीमध्ये घर बांधले आहे. माझ्याप्रमाणे माझी मुले जितेंद्र आणि महेंद्र यांना देखील शेतीची आवड आहे. दोन्ही मुले व्यस्त नोकरीतून महिन्यातून एक ते दोन वेळा गावी येऊन शेती नियोजनासाठी मला मदत करतात. माझी पत्नी लीलावती यांची देखील मोलाची साथ मिळाली आहे.

- तानाजी मोहिते, ९००४०१९१८४ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com