पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला

पाली, जि. रायगड - कापणी करुन ठेवलेले भाताचे पीक मुसळधार पावसात भिजले आहे.
पाली, जि. रायगड - कापणी करुन ठेवलेले भाताचे पीक मुसळधार पावसात भिजले आहे.

मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सध्या सोयाबीन, मूग, उडीद, भात आणि कापूस वेचणीची कामे सुरू आहेत. मात्र, पावसाने काढणीच्या कामात व्यत्यय येत असून, पिकांचे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने काढणी केलेले पीक, भाजीपाला व पेरणी बियाण्याला फटका बसला. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने शेतकरी आडचणीत आले आहेत. पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. 

मराठवाड्यात सोयाबीनला फटका
मराठवाड्यातील काढणीला आलेल्या सोयाबीनच्या पिकासह मका व कपाशीचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. मंगळवारीही (ता. १०) बीड, जालना, औरंगाबाद जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम होता. पावसामुळे वेचणीला आलेला कापूस ओला होत असून, काढणीला आलेल्या सोयाबीनची पसरही भिजत आहे. त्यामुळे कसाबसा हातातोंडाशी आलेला घासही हिरवला जातो की काय याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या तीन-चार दिवसांपासूंन वादळी वाळे, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका काढणी सुरू असलेल्या सोयाबीनला बसला. बोंडे फुटून वेचणीला आलेल्या कपाशीचे मोठे नुकसान झाले. 

साताऱ्यात खरिपाला फटका
सातारा जिल्ह्याच्या अनेक भागांत परतीच्या पावसाने झोडपल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, बाजरी, ज्वारी, ऊस, भात आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पाच शेतकऱ्यांचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला आहे. दुष्काळी तालुक्याच्या अनेक भागांत दमदार पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे माण, फलटण, खंडाळा तालुक्यांतील बाजरी झोपली तर कोरेगाव, खटाव तालुक्यांत घेवडा, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पश्चिमेकडील सातारा, कऱ्हाड, वाई, जावली, पाटण तालुक्यांतील सोयाबीन पिकात पाणी साचून राहिल्यामुळे कुजू लागले.  

वऱ्हाडात पिकांचे नुकसान
वऱ्हाडात सोयाबीन सोंगणी सुरू झालेली अाहे. काही शेतांमध्ये सोंगणी झालेले सोयाबीन जमिनीवरच पडलेले अाहे. शिवाय सातत्याने पावसाचे वातावरण असल्याने सोयाबीनच्या शेंगांमधून कोंब फुटण्याची स्थिती तयार झाली. बऱ्याच भागात ज्वारी, मका सोंगणी सुरू झाली होती. जी ज्वारी उभी अाहे त्या कणसांमधील दाणे काळे पडत अाहेत. मॉन्सूनपूर्व लागवड झालेल्या कपाशीचा कापूस अोला झाला अाहे. अाता पाऊस बंद झाला तरी पुढील दोन ते तीन दिवस शेतामध्ये कुठलीच कामे करता येतील अशी स्थिती नाही. हाता तोंडाशी अालेला घास पाऊस हिरावून नेत अाहे. मात्र पुढील अाठवड्यात या भागात रब्बी पेरण्या वेग घेणार अाहेत. रब्बीची तयारी करीत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला. 

सांगलीत मूग, उडदाला फटका
सांगली जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे सोयाबीन आणि मूग, उडीद पिकांना फटका बसला. पीक काढणीच्या वेळी पावसाने दमदार हजेरी लावली. सोयाबीन पीक संपूर्ण धोक्‍यात आले आहे. शेतामध्ये वाफसा नसल्याने सोयाबीन काढणीसाठी अडचणी येतात. ऊन-पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा फुटू लागल्या आहेत. बहुतांश सोयाबीन उत्पादक बियाणे म्हणून विक्री करतात. विक्रीसाठी दर्जेदार बियाणे लागते. परंतु या पावसाने बियाणे दर्जेदार होणार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. मात्र, कृषी विभागाने पिकांची पाहणी करण्यासाठी कोणतीच तसदी घेतली नसल्याची चर्चा शेतकऱ्यांत सुरू आहे. 

खानदेशात केळी कापणी ठप्प
पावसामुळे शेतरस्ते चिखलमय झाल्याने केळी कापणीचे काम थांबले आहे. जवळपास सहा हजार हेक्‍टरवरील केळीच्या कांदेबागांची कापणी रखडली आहे. तसेच जवळपास ३० हजार हेक्‍टरवरील पूर्वहंगामी कपाशीचे बोंडे काळवंडली आहेत. पावसाळी वातावरणात केळीचा दर्जा घसरून केळी उत्पादकांचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. मागील दोन, तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे शेतरस्ते चिखलमय झाले आहेत. त्यावरून आजघडीला ट्रक, ट्रॅक्‍टर जाऊ शकत नाही. धुळ्यात पावसाचा कोरडवाहू कपाशी, मका या पिकांना दिलासा मिळाला. परंतु ज्वारी काळवंडू लागली आहे. पूर्वहंगामी कपाशीला फटका बसला आहे. 

कोकणात भात पिकाला फटका 
यंदा चांगलेच बहरून दसऱ्यापर्यंत सोन्यासारखे पिवळे धमक पडलेले भाताचे पीक पाऊस-वाऱ्यामुळे आडवे पडले आहे. कापून ठेवलेल्या पिकाचे दाणे कुजून फुटवे फुटले आहेत. शेतात आता भात कुजू लागल्याचा वास येऊ लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलझर परिसरात पावसामुळे सुपारी पिकाची गळ सुरू झाली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा तालुक्‍यांत तीन-चार दिवस परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे कापणीला आलेले उभे भातपीक आडवे झाले आहे.  

कोल्हापुरात भात, सोयाबीनचे नुकसान 
जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात काढणीस आलेल्या भाताचे तर पूर्व भागात सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. गगनबावडा, राधानगरी भागात पक्वतेकडे जाणाऱ्या भाताचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीस आलेल्या भाताच्या प्लॉटमध्ये पाणी साचून राहिल्याने काढणी खोळंबली आहेत. अगदी अशीच परिस्थिती सोयाबीनचीही झाली आहे. दिवसभर उन असल्याने सोयाबीनची काढणी करत असतानाच सायंकाळी सुमारे तासापर्यंत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीनची काढणी जागच्या जागी ठप्प झाली आहे.

विदर्भात कापूस धानाचे नुकसान 
पावसाने वेचणीस आलेला कापूस, काढणीस आलेले सोयाबीन आणि धान भिजल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. संकटावर मात करीत पीक वाचवलेल्या शेतकऱ्यांना काही तरी हाताला लागेल, अशी अपेक्षा होती. परंतु, पावसाने त्यांच्या या अपेक्षेवरदेखील पाणी फेरले. शेतात कापणीसाठी आलेले उभे पीक जास्त पाण्यामुळे कुजले, तर काही ठिकाणी धानाच्या लोंब्यांना अंकुर फुटले आहे. भंडारा जिल्ह्यातील टेभरी, खैरीपट, विहीरगाव, गवराळा, खैरणा, दोनाड, डांभेविरली, सावरगाव, मादेड, कुडेगाव, रोहिणी, किरमटी या गावातील अनेक शेतकऱ्यांचे धान पीक पाण्यामुळे कुजण्याच्या स्थितीत आहेत. 

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष पिकाचे नुकसान 
नाशिक भागातील टोमॅटोच्या हंगामाने वेग धरला आहे. बहुतांश भागातील टोमॅटो पीक उत्पादन सुरू होण्याच्या तयारीत आहे. त्याच बरोबर फुलोरापूर्व व फुलोरा अवस्थेत द्राक्ष व डाळिंब बागा आहेत. मागील चार दिवसांपासून दररोज पावसाचा कहर सुरू असून, त्यामुळे हजारो हेक्‍टरवरील या फळबागा व भाजीपाला पिके संकटात सापडली आहेत. कीड रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणाबाहेर गेला असताना दररोज फवारणी करण्यासाठीचा खर्च वाढला आहे. 

पूर्वहंगामी कपाशीला फटका बसला. आमच्याकडील केळीची कापणी रखडली आहे. रस्ते खराब झाल्याने तापीकाठावरील गावांमध्येही केळीची कापणी बंद आहे.
- शांताराम नहाळदे, केळी उत्पादक, डोमगाव (जि. जळगाव)

 ज्वारी, पूर्वहंगामी कपाशीचे नुकसान झाले. भाजीपाला काढणीही करता येत नाही, कापूस वेचणीची कामे आणखी आठवडाभर करता येणार नाहीत. पीकविमा योजनेतून भरपाई मिळावी.
- गयभू काशीनाथ पाटील, तरडी, जि. धुळे.

सोयाबीनची काढणी सुरू आहे. सहा एकरांवरील कापूस वेचणीस आला आहे. परंतु सोयाबीन काढणी सुरू असल्यामुळे वेचणीस मजूर मिळत नाहीत. अजून पाऊस सुरूच आहे. सोयाबीन तसेच सरकीला मोड फुटल्यानंतर हाती काहीच लागणार नाही.
- बाजीराव शेवाळे, शेतकरी, गणपूर, ता. जिंतूर, जि. परभणी
 

वेचणीस आलेला दोन एकरांवरील कापूस वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जमिनीवर पडून नुकसान झाले.
- मुरलीधर सांगळे, शेतकरी, येळी, ता. औंढा नागनाथ,  जि. हिंगोली.

परतीच्या पावसाने सोयाबीनचे एकरी दोन क्विंटल उत्पादन घटण्याची शक्‍यता आहे. बियाणे म्हणून विक्री केली जाते, त्याची उगवण क्षमता कमी होण्याची शक्‍यता आहे.
- तात्यासो नागावे, शेतकरी, खटाव, जि. सांगली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com