कलमी द्राक्ष बागेतील अडचणींवर उपाययोजना

कलमी द्राक्ष बागेतील अडचणींवर उपाययोजना

द्राक्ष बागेमध्ये सध्या कलम करण्याचा कालावधी सुरू आहे. त्यासाठी सायन काडीची योग्य निवड आवश्यक असते. या वेळी बागेमध्ये कलम करण्यासाठी पोषक वातावरण असूनही अनेक शेतकऱ्यांना त्यात अडचणी येत असल्याचे समजते. विशेषतः कलम केल्यानंतर १० ते ११ दिवसांमध्ये कलम डोळा फुटतो व तो लवकरच वाळायला सुरवात होत असल्याचे समजते.

द्राक्ष कलमांसाठी लांब मण्याच्या जातींची निवड, कलमासाठी वापरलेली सायन काडी कच्ची असणे आदी महत्त्वाच्या कारणांमुळे अडचणी येतात.

कारणे 
या वर्षी लागवडीसाठी लांब मण्याच्या द्राक्ष जातींची निवड केल्याचे दिसून येते.
उदा. सोनाकाचे क्लोन - ही जात अत्यंत संवेदनशील असून, त्यात गळ होणे, रोगांचा प्रादुर्भाव अशा समस्या दिसून येतात.

कलम करण्यासाठी वापरलेली सायन काडी कच्ची असते. अनेक वेळा बागेमध्ये ०-०-५० व बोर्डो मिश्रणासाठी फवारणी केलेली असल्यास काडीला बाहेरून तपकिरी रंग आलेला असला तरी आतमध्ये काडी कच्ची असल्याचे दिसून आले आहे. अशा काडीचा वापर केल्यास डोळा लवकर फुटतो.

फळछाटणी अशा काडीवर केल्यास नंतर त्यातून गोळी घड निघतो. त्यामुळे काडीच्या परिपक्वतेसाठी आवश्यक तो वेळ दिला पाहिजे.

काडीमध्ये अन्नद्रव्यांचा साठा कमी असणे. बऱ्याच वेळा काडीच्या पक्वतेच्या काळात पाऊस अधिक प्रमाणात सुरू असल्यास नवीन फुटीची वाढ जास्त होते. काडीची पक्वता लांबणीवर पडत जाते. सतत फुटी काढल्यामुळे अन्नद्रव्यांच्या साठ्यावर परिणाम होतो.
खुंट काडी जास्त रसरशीत असल्यास.

उपाययोजना 
ज्या बागेतून सायन काडी घेणार आहोत, तेथील काही काड्या कापून काडीच्या आतील पिथ तपकिरी रंगाच्या झालेल्या असल्यास काडी पक्व झाल्याचे समजावे. अन्यथा आणखी थोडे दिवस वाट पाहावी.

बऱ्याच वेळा नवीन फुटी काढल्यानंतर लगेच बागेतून काडी काढून दिली जाते. या काळात वेलीमध्ये शरीरशास्त्रीय हालचाली वेगात असतात.

वेलीच्या वाढीसाठी अन्नद्रव्यांचा प्रवाह शेंड्याकडे वाहत असतो. शेंडा काढल्यानंतर तो तिथेच थांबतो. कलम करण्याकरीता काडी तळाकडील किंवा सबकेनच्या पुढे एक दोन डोळ्यांपर्यंत वापरतो. ही अन्नद्रव्ये काडीमध्ये व्यवस्थित स्थिर झाल्यानंतर वापरल्यास त्याची मदत होईल. त्यासाठी कोवळ्या फुटी काढल्यानंतर दोन ते तीन दिवस कलमासाठी काड्या काढणे टाळावे.

खुंटकाडीवर कलम करतेवेळी वापरावयाच्या सायन काडीवर शक्यतो अर्धे देठ राहू द्यावे.

ज्या खुंटकाडीवर कलम करणार आहोत, ती जास्त कोवळी नसावी. कोवळ्या काडीमध्ये रसाचे प्रमाण अधिक असल्याने कॅलस तयार होण्यावर परिणाम होतो. त्याऐवजी काडी अर्ध पक्व असावी.

बऱ्याच बागामध्ये पानगळीसाठी संजीवकांचा वापर झालेला असतो. अशा फवारणीच्या ९ ते १० दिवसांनंतर कलम करण्यासाठी काडी काढल्यास डोळा आधीच फुगलेला असतो. तो लवकर फुटून नवीन ३ ते ४ पाने आल्यानंतर कॅल्स पूर्ण तयार झालेले नसल्यामुळे दोन ते तीन दिवसामध्ये जळून जातात.

पूर्ण पिवळी पाने असलेली काडी टाळावी. त्याचप्रमाणे खतांचा वापरही टाळावा.

या बागेत ट्रायकोडर्मा ड्रेंचिंग १ ते २ वेळा करून घ्यावे. यामुळे वेलीची प्रतिकारशक्ती वाढेल.

- डॉ. आर. जी. सोमकुंवर - ०२०-२६९५६०६०
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com