उच्च प्रतीची वंशावळ, अधिक दुग्धोत्पादनासाठी - कृत्रिम रेतन

कृत्रिम रेतनातून गोठ्यातच जातीवंत जनावरे तयार होतात.
कृत्रिम रेतनातून गोठ्यातच जातीवंत जनावरे तयार होतात.

कृत्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूची रेतनमात्रा वापरून अधिक दूध देणाऱ्या संकरित गाई-म्हशींची पैदास केली जाते; परंतु रेतन यशस्वी होण्यासाठी रेतनाची योग्य पद्धत व त्यातील उणिवा याची माहिती असणे अावश्यक अाहे.
 

उच्च प्रतीच्या वंशावळीसाठी व अधिक दुग्धोत्पादनासाठी कृत्रिम रेतन फायदेशीर अाहे; परंतु कृत्रिम रेतन पद्धतीमुळे गाई-म्हशी कमी प्रमाणात गाभण राहतात असा गैरसमज अाहे. कृत्रिम रेतन पद्धती हे कमी प्रमाणात गर्भधारणा राहण्याचे प्रत्यक्ष कारण नसून, त्या पद्धतीतील उणिवा हे कारण आहे.

कृत्रिम रेतनातील उणिवा -
गाई-म्हशी माजावर येण्याची योग्य वेळ माहीत नसणे.
वीर्याचा दर्जा कमी प्रतीचा असणे.
वीर्य योग्य जागी सोडले नसेल तर गाई-म्हशी गाभण राहत नाहीत.

कृत्रिम रेतनाचे फायदे -
संकरीकरण -

अतिशय उच्च प्रतीच्या विदेशी वळूचे वीर्य शास्त्रीय पद्धतीने गोळा केले जाते, त्याच्या अनेक चाचण्या घेऊन ते गोठविले जाते. प्रत्येक चाचणीमध्ये सिद्ध ठरलेले वीर्य गावठी व कमी उत्पादनक्षमता असलेल्या गाईंच्या गर्भाशयात कृत्रिम पद्धतीने सोडले जाते. या पद्धतीच्या संयोगातून निर्माण होणारी वासरे ही चांगल्या प्रतीची व भरपूर दूध उत्पादन देणारी असतात. अशा पद्धतीने उच्च गुणवत्तेची नवीन जात किंवा स्थानिक गाईंचे किंवा म्हशींचे रूपांतर उत्तम दूध देणाऱ्या जातीमध्ये करता येते.

वळूची उपयुक्तता 
पैदाशीच्या वळूपासून एकावेळी गोळा केलेल्या वीर्यापासून किमान २०० ते ७०० वीर्यकांड्या तयार होतात, त्यामुळे उच्च गुणवत्तेच्या वळूची उपयुक्तता वाढविता येते.

कृत्रिम रेतनासाठी वापरण्यात येणारे वीर्य निरोगी असते, त्याशिवाय वळू व मादी यांचा प्रत्यक्ष संबंध येत नाही, त्यामुळे आनुवंशिक अाणि संसर्गजन्य रोगाच्या प्रसाराला अाळा बसतो.

गाईच्या/ म्हशीच्या गर्भाशयाची तपासणी -
कृत्रिम रेतनासाठी आलेले पशुवैद्यक गर्भाशयाची योग्य तपासणी करू शकतात, त्यामुळे अयोग्य माज, गर्भाशयाचा दाह इ. बाबींचे निदान होऊ शकते अाणि या समस्यांवर वेळेत उपाययोजना करून बऱ्याच अंशी गाई-म्हशींतील वांझपणाचे प्रमाण कमी करता येते.

कृत्रिम रेतन पद्धतीमध्ये पशुपालकांना वळू जोपासण्याची गरज नसते.

कमी प्रतीचे, आनुवंशिक व सांसर्गिक रोगाचे लागण झालेल्या, वळूचा वापर बऱ्याच वेळा नैसर्गिक रेतनासाठी केला जातो. त्यामुळे तयार होणारी पिढी ही कमी उत्पादन देणारी होते. त्याचा पशुपालकांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. ही समस्या कृत्रिम रेतनामध्ये येत नाही.

गाय गाभण न राहण्यामागची कारणे
कृत्रिम रेतन केल्यानंतर २१ दिवसांनी गाय परत माजावर अाली तर गाय उलटली असे म्हणतात. याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे अाहेत.
गर्भाशयाचा दाह (गर्भाशयाचे अाजार) असल्यास.
माजाच्या काळात योग्य वेळी रेतन न करणे (लवकर किंवा उशिरा)
गाय अशक्त असणे.
प्रथिनांची व क्षारांची कमतरता असणे.
अगोदरच्या वेतामध्ये विल्यानंतर जार गर्भाशयात अडकून राहिल्यामुळे गर्भाशयाला सूज येणे.
माजानंतर स्त्रीबीज गर्भाशयात उशीरा उतरणे.
जीवनसत्त्व अ ची कमतरता.
वळूच्या बीजात मृत शुक्रजंतूचे प्रमाण जास्त असणे.
गाभण काळात दूर्लक्ष होणे.
मागील वेतात गर्भपात झाल्यास. 

गाय वेळेवर गाभण राहण्यासाठी घ्यायची काळजी
गाय नियमित गाभण राहण्यासाठी गायीमध्ये गाय पूर्वी कधी विली अाहे, किती दिवसांनी माजावर येते, माज किती वेळ टिकतो, सोट स्वच्छ अाहे का? मुका माज अाहे का? जार नीट पडला होता का? माज फार मोठा अाहे का? इ. बाबींचे निरीक्षण करावे. 

कृत्रिम रेतन यशस्वी होण्यासाठी घ्यावयाची काळजी 
वीर्याची गुणवत्ता -

गोठवलेले वीर्य हे उच्च दर्जाचे तसेच निरोगी असावे. वीर्य साठविलेल्या भांड्यातील द्रवरूप नायट्रोजनची पातळी वेळोवेळी तपासून घ्यावी लागते. तसेच, त्याचे तापमान हे १९६ अंश सेल्सिअस असावे.

वीर्यमात्रा गरम करणे - वीर्यकांडी वीर्य साठविलेल्या भांड्यामधून बाहेर काढल्यानंतर लगेच ३७ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या कोमट पाण्यात ३० सेकंदांकरिता ठेवावी.

कृत्रिम रेतन तज्ज्ञ पशुवैद्यकाकडूनच करावे, कारण रेतन यशस्वी होण्यासाठी सर्व बाबी शास्त्रीय पद्धतीने काळजीपूर्वक करायच्या असतात.

कृत्रिम रेतन करण्याची वेळ - कृत्रिम रेतन करण्यापूर्वी गाय-म्हैस योग्य माजावर आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. गाय व म्हैस माज सुरू झाल्यापासून १२ ते १८ तासांनंतर भरवावी. म्हणजे सकाळी माजावर असलेली गाय संध्याकाळी भरवावी किंवा सायंकाळी माज दाखवत असलेली गाय दुसऱ्या दिवशी सकाळी भरवावी.

वीर्य सोडण्याची जागा - सर्वसाधारणपणे गोठविलेले वीर्य गर्भाशयाच्या मुखात सोडावे.

उपकरणाचे निर्जंतुकीकरण - कृत्रिम रेतनासाठी वापरण्यात येणारी सर्व उपकरणे निर्जंतुक करावी.

रेतन करण्यापूर्वी वीर्यकांडीवरील माहिती जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

- डॉ. डी. के. देवकर, ९४२३००३३६४
(गो संशोधन विकास प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com