व्यवस्थापनातील योग्य बदलासाठी जनावरांचे निरीक्षण अावश्यक

गोठ्यातील निरीक्षणामुळे जनावरांचे आजार, आरोग्य, आहाराबद्दल पूर्वकल्पना मिळते.
गोठ्यातील निरीक्षणामुळे जनावरांचे आजार, आरोग्य, आहाराबद्दल पूर्वकल्पना मिळते.

गोठ्यातील सूक्ष्म निरीक्षणाद्वारे व्यवस्थापनामध्ये सुधारणा करता येतात, आजार टाळता येतात, उत्पादनातील घट टाळता येते. म्हणून दररोज पहाटे व रात्री उशिरा जनावरांच्या गोठ्याचे निरीक्षण करणे फायदेशीर ठरते.
 

गोठ्यातील जनावरांचे दैनंदिन निरीक्षण हे व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. निरीक्षणामुळे जनावरांचे आजार, आरोग्य, आहाराबद्दल पूर्वकल्पना मिळते, त्यामुळे व्यवस्थापनात योग्य ते बदल करणे शक्‍य होते. व्यवस्थापनातील योग्य बदलावरच व्यवसायाचे यश अवलंबून असते. 

निरीक्षणाची वेळ
    गोठ्यातील जनावरांचे निरीक्षण पहाटे लवकर व रात्री उशिरा करावे. यावेळी बऱ्याच जनावरांचा माज लक्षात येतो. प्रजोत्पादनाचे योग्य व्यवस्थापन ठेवणे शक्‍य होते.
    सुरवातीला गोठ्यात फिरताना सर्व जनावरं शांत बसलेली असतात. अशावेळी त्यांना न उठवता पाठीमागून फेरफटका मारावा व निरणातून बळस किंवा सोट येत आहे का?, सोटाचा रंग, पारदर्शकता, सोट किती प्रमाणात पडतोय याचे निरीक्षण करून नोंद ठेवावी.  
    बसलेल्या जनावरांचे निरीक्षण झाल्यानंतर जनावरांना उठवून त्यांचे निरीक्षण करावे.  

गाभण किंवा माजावर आलेल्या जनावरांचे निरीक्षण 
    सोट काचेसारखा पारदर्शक व तार धरून येत असेल तर जनावर माजावर असलेले समजते. सोटाचा रंग लाल, पिवळा, पांढरा असेल तर गर्भाशयातील आजारांचे निदान करणे सोपे होते, त्यामुळे योग्य वेळी उपचार करता येतात. कधी कधी गाभण जनावरांमध्ये जास्त प्रमाणात बळस/सोट येत असेल तर गर्भपाताची समस्या उद्‌भवण्याची शक्‍यता असते. त्यावर वेळीच उपाययोजना करता येतात. 
    शेपटीला बळस/सोट चिकटला आहे का? ते पाहावे. निरण किंवा गर्भाशय मार्गात जखम असल्यास त्यावर योग्य उपचार करता येतात.
    जनावराच्या पाठीमागून फिरताना शेणाचा रंग, वास, घट्टपणा, पातळपणा, शेणातून धान्याचे कण, शेणामध्ये धागेधागे पडणे, जंत पडणे या बाबींचे सूक्ष्मपणे निरीक्षण करावे. 
    शेण अति घट्ट असेल तर जनावराला पुरेसे पाणी मिळत नाही किंवा त्याची तहान कमी आहे हे लक्षात येते. जर शेण पातळ असेल तर अपचन किंवा जंतूंमुळे हगवण उद्‌भवल्याचे लक्षात येते. 
    शेणाला वास येत असेल तर खाद्याचे पचन नीट होत नाही आणि शेणात धान्याचे कण येत असतील तर अपचनाच्या बाबी लक्षात येतात. 
    शेणात जंत दिसल्यास वेळीच जंतनिर्मूलन करणे शक्‍य होते. 

निरीक्षणातून विविध आजारांचे निदान
    पार्श्‍वभागाला जास्त शेण लागल्यास जनावराला हगवण लागली अाहे हे लक्षात येते. 
    जनावराची लघवी पिवळी, लाल होते आहे का? याचे निरीक्षण करावे जेणेकरून गोचीडताप, स्फुरद कमतरता, यकृताचे आजार यांचे निदान करणे सोयीचे जाते. 
    गोठ्याभोवती फिरताना सर्व जनावरं रवंथ करत आहेत का? कोणते जनावर स्तब्ध, शांत पडून आहे का? मलूल आहेत का? तडफडत आहे का? सतत उठ-बैस करत आहे का? या बाबींची नोंद घ्यावी. 
    शांत, स्तब्ध जनावर आजारी असण्याची शक्‍यता असते. सतत ऊठ-बैस करणारे जनावर पोटशूळ किंवा अपचनामुळे अस्वस्थ असू शकते.
    गोठ्यातील जनावरांचे पोट जास्त फुगले आहे का अति खोलवर गेले आहे याचे निरीक्षण केल्यास पोटात तयार झालेल्या गॅसची, अपचनाची, जनावर चारा खात नसल्याची कल्पना येऊ शकते.
    गोठ्यातील सर्व जनावरांच्या केसाचे, त्वचेचे निरीक्षण करावे. केस व त्वचा तेजदार असेल तर जनावर तंदुरुस्त आहे असे समजावे. केस निस्तेज, चमक नसलेली त्वचा असेल तर जनावरामध्ये काहीतरी कमतरता आहे असे समजावे. त्याचे योग्य निदान करून उपचार करावेत.

बाह्य निरीक्षणातून आजाराची ओळख
    गोठ्यातील गाभण, विणाऱ्या जनावराचे निरीक्षण केल्यास विण्याचा कालावधी, विण्यातील अडथळा, झार अडकणे या समस्या लक्षात येऊन वेळीच योग्य उपचार करणे शक्‍य होते.
    जनावराने कोणता पाय उचलून धरला आहे का? टेकवत नाही का? पायावर सूज आहे का? मार लागला आहे का? याची नोंद घेऊन यावर योग्य ते उपचार करता येतो. 
    जनावराची कास सर्वसाधारण आहे का? सूज आलेली आहे का? याचे निरीक्षण करावे जेणेकरून कासदाहावर तात्काळ उपचार करणे शक्‍य होईल. जनावराच्या कासेचा कमी होणारा आकारही लक्षात घ्यावा. जेणेकरून कोणत्या तरी घटकाची कमतरता आहे किंवा कासेचा आजार लक्षात येऊन दूध उत्पादनात होणारी घट टाळता येते.
    जनावरांच्या शेपटीवरचे केस कमी होत आहेत, शेपूटगोंड्याचे पूर्ण केस गेले आहेत का? ते पाहावे यावरून शेपटीला जंतुसंसर्ग, सरड्या या रोगाचे योग्य निदान करून उपचार करणे शक्‍य होते.
    जनावराच्या शरीरावर कुठे सूज आहे का? उदा. बेंबीजवळ, पुढच्या दोन्ही पायाच्या मध्ये, जबड्याचा इ. ठिकाणी पाहावे यावरून बेंबीची अंतर्गळ (हर्निया), बेंबीला झालेला जंतूसंसर्ग, दोन्ही पायांच्यामध्ये (पुढच्या) सूज असल्यास पोटात गेलेली अखाद्य वस्तू, जबड्याखालील सूजेवरून घटसर्प, जंतप्रादुर्भाव याचे निदान करता येते.
    दोन्ही डोळ्यांचे निरीक्षण करावे. डोळे पाणीदार, टवटवीत आहेत का? डोळ्यातून स्राव किंवा घाण येत आहे का? ते पाहावे. डोळा पांढरा, निळा झाला आहे का? ते पाहावे. यावरून डोळ्यांचे आजार, डोळ्याला लागलेला मार लक्षात येऊन वेळीच उपचार होतात. बऱ्याच वेळा इतर आजारांमुळेही जनावरांच्या डोळ्यातून पाणी येताना दिसते.
    जनावरांच्या पुढच्या बाजूंनी पाहणी करताना नाकपुडीचे निरीक्षण करावे. कोरडी नाकपुडी जनावर आजारी असल्याचे दर्शवते तर पाणीदार नाकपुडी जनावर निरोगी असल्याचे दर्शवते.
    जनावराच्या तोंडून सतत लाळ गळते का ते पाहावे जर सतत लाळ गळत असेल तर तोंडामध्ये जखमा किंवा लाळ खुरकूत रोगाचा प्रादुर्भाव किंवा पिसाळणे यासारखे आजार असू शकतात. इतर लक्षणांची सांगड घालून त्याचे योग्य निदान होऊ शकते.
    बऱ्याच गायी/म्हशी शिंग गोठ्यामध्ये गव्हाणी, भिंतीवर आदळतात, यामध्ये एकतर कानाच्या मधल्या भागाला सूज येऊन कानात पू तयार होणे किंवा शिंगाचा कॅन्सरही असण्याची शक्‍यता असते.  
    काही जनावरं सतत दात खातानाचा आवाज येतो किंवा कण्हण्याचा आवाज येतो. असा जनावरामध्ये एकतर पोटशूळ किंवा इतर आजार असण्याची शक्‍यता असते.
    बऱ्याचवेळा म्हशीमध्ये काळ्या त्वचेवर सुरवातीला काही भागावर पांढरे ठिपके दिसतात व नंतर हळूहळू त्याचा आकार वाढत जातो. अशावेळी कॉपरच्या कमतरतेमुळे पांढरे ठिपके दिसून येतात. यासाठी तज्ज्ञांकडून वेळीच उपचार करून घ्यावेत.

गोठ्यातील स्वच्छता 
    बऱ्याचवेळा काही जनावरांच्या गव्हाणीमध्ये चारा तसाच शिल्लक असल्याचे दिसून येते. चारा खात नाही म्हणजे एकतर जनावरामध्ये काहीतरी आजार आहे किंवा चाऱ्यामध्ये काहीतरी दोष आहे हे लक्षात घ्यावे. गव्हाणीतील शिल्लक चारा दररोजच्या दररोज काढून टाकावा.
    बाह्यपरजिवींचा प्रादुर्भाव तपासण्यासाठी जनावराच्या शेपटीखाली, कानात, मानेवर, पायांच्या मधल्या भागावर बाह्यपरजिवी आहेत का? ते ठराविक कालावधीने तपासावे, जेणेकरून त्यांचे वेळीच नियंत्रण करता येईल.
    गोठ्यामध्ये कोठे दलदल होते का? पाणी साठते का? स्वच्छता दररोज होते का? ते पाहावे. कारण यामुळेच रोगजंतूंची वाढ मोठ्या प्रमाणात होण्याची शक्‍यता असते.

- डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३. (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com