‘जलयुक्‍त’मध्ये नाशिक विभाग राज्यात अव्वल

Jalyukt-Shivar
Jalyukt-Shivar

नाशिक - जलयुक्‍त शिवार योजनेमुळेे नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमधील ९०० गावांमध्ये जलक्रांती झाली आहे. विभागातील पाचही जिल्हे मिळून ९७ टक्के कामे पूर्ण झाली असून, नाशिक विभाग राज्यात अव्वलस्थानी आहे. त्याखालोखाल नागपूर विभागाने ९६ टक्के, तर कोकण विभागाने ९६.५५ टक्के कामे पूर्ण करत अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले आहे. 

राज्यात गेल्या दोन वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या जलयुक्‍त शिवारच्या कामांमुळे हजारो गावे दुष्काळाच्या छायेतून बाहेर पडली आहेत. २०१६-१७ मध्ये नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांतील एकूण ९०० गावांची निवड जलयुक्‍त शिवार उपक्रमात करण्यात आली होती. या गावांमध्ये विविध प्रकारची कामे करण्यासाठी सरकारने ५३८ कोटी ७४ लाखांचा निधी दिला. दरम्यान, या निधीमधून निवड झालेल्या गावांमध्ये विहिरी खोदणे, नाला खोलीकरण व रुंदीकरण, विहीर पुनर्भरण, गाळ काढणे, मचकीची तसेच इतर जलसंधारणाची अंदाजे १० हजारांच्यावर कामे पूर्ण करण्यात आली. 

नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमधील २१९ गावांमध्ये ५ हजार ४९४ कामे पूर्ण झाली आहेत. नगरमधील २६८ पैकी २५२ गावे ही जलयुक्तमुळे ओलिताखाली आहे. उर्वरित १६ गावांमधील कामे अंतिम टप्प्यात आहेत. धुळ्यातील १२३ पैकी ११५ गावांमध्ये १०० टक्के कामे झाली आहेत. जळगावमधील २२२ पैकी २१७ गावे तर नंदुरबारमधील ६९ पैकी ६७ गावांमध्ये १०० टक्के जलयुक्तची कामे पूर्णत्वास आली आहेत. 

विभागात २०१६-१७ च्या आराखड्यानुसार ८६९ गावांमधील कामे पूर्ण झाली असून, ३१ गावांमधील कामे अंतिम टप्प्यात आहे. या कामांमुळे जिल्ह्यांच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ झाली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील चांदवड, कळवण तसेच सिन्नर तालुक्यांमध्ये दोन वर्षांत जलयुक्तअंतर्गत झालेल्या कामांमुळे हे भाग टंचाईमुक्त झाले आहेत. इतर जिल्ह्यांमधील तालुक्यांची भूजलपातळीत वाढ होण्यास मदत मिळाली आहे.

४४३९ गावांमध्ये १०० टक्के कामे
राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ५ हजार २८८ गावांमध्ये २०१६-१७ मध्ये जलयुक्त शिवारची कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी ४ हजार ४३९ गावांमधील १०० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. ६४३ गावांमधील कामे हे ८० टक्क्यांच्या वर तर १८२ गावांमधील कामे ५० टक्के पूर्ण झाली आहेत. ३० टक्के काम पूर्ण झालेल्या गावांची संख्या २१ असून, ३ गावांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी कामे झाली आहेत. या सर्व गावांमधील कामांसाठी एकूण २५५४ कोटी ३७ लाखांचा खर्च झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com