निमकोटेड युरियाचा वापर फायदेशीर...

निमकोटेड युरियाचा वापर फायदेशीर...

पिकांच्या संतुलित वाढीसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश ही अन्नद्रव्ये प्रामुख्याने आवश्यक असतात. त्यातही पिकाच्या सुरवातीपासून वाढीच्या विविध टप्प्यांमध्ये नत्राचा वापर अधिक प्रमाणात होतो. या अन्नद्रव्यांमुळे पीक हिरवेगार आणि तजेलदार दिसत असल्याने शेतकरी याचा वापर अनेकवेळा अंसुतलित व गरजेपेक्षा अधिक करत असल्याचे आढळले आहे. परिणामी पिकांची वाढ समतोल होत नाही. पिकांची वाढ खुंटते. जमिनीचे आरोग्य बिघडते. त्याचा दुष्परिणाम पिकांच्या उत्पादनावरही होतो. 

युरिया वापरल्यानंतर होणारी प्रक्रिया 
युरिया जमिनीत मिसळल्यानंतर त्याचा पाण्याबरोबर संपर्क होताच तो त्वरित विरघळतो. त्यातील नत्र पिकांना उपलब्ध होण्याची क्रिया तत्काळ सुरू होते. मात्र, पाण्याचे प्रमाण अधिक असल्यास होणाऱ्या निचऱ्यासोबत जमिनीत खोलवर जातो किंवा प्रवाहासोबत वाहून जातो. परिणामी भूजल किंवा परिसरातील स्रोत प्रदूषित होतात. जमिनीवर विरघळण्याच्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनशी संपर्क झाल्यानंतर त्यातून नायट्रस ऑक्साइड तयार होऊन हवेत निघून जातो. यामुळे वातावरणामध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढले. नत्र या घटकाचा ऱ्हास होऊन, पिकासाठी त्याची उपलब्धता कमी होते. जमिनीतून दिलेल्या एकूण युरियापैकी केवळ ३० ते ४० टक्केच नत्र पिकांना उपलब्ध होते. उर्वरित नत्र हवेत किंवा पाण्यामध्ये मिसळून वाया जाते. यात शेतकऱ्यांचे नुकसान आहे. 

निम कोटेड युरिया ठरतो उपयुक्त

युरियाची विरघळण्याची क्रिया मंद करण्यासाठी त्यावर कडूनिंब तेल किंवा द्रावणाचा थर दिला जातो. या द्रावणामध्ये युरिया वापरण्याचे प्रमाण साधारणपणे ०.१:१०० असे असते.

युरियाच्या दाण्यावर कडूनिंब द्रावणाच्या आवरणामुळे विरघळण्याच्या वेग आटोक्यात किंवा मंदावतो. परिणामी नत्र एकदम उपलब्ध न होता हळूहळू पिकांना मिळत राहते.

युरियाचे विघटन होऊन त्याचे नायट्रेटमध्ये रूपांतराचे प्रमाण कमी होते. हवेतील प्रदूषण टळते. 

विशिष्ट अशा कडवट वासामुळे कीटक पिकाजवळ येत नाहीत. पिकाचे किटकांपासून संरक्षण होण्यास मदत होते.

भात शेतीमध्ये निमकोटेड युरियाचा वापर केल्यामुळे नीलगाय शेतापासून दूर राहत असल्याचा अनुभव आहे. 

हवेतील आर्द्रता शोषल्यामुळे साध्या युरियाचे काही दिवसांनंतर गोळे तयार होऊ लागतात.  शेतात वापर करण्यात अडथळे येतात. निमकोटेड युरियामध्ये गोळे होण्याचे प्रमाण कमी आहे. 

साध्या युरियाची नत्र वापर क्षमता १० ते १५ टक्के असते, तर निमकोटेड युरियाची वापर क्षमता ४० ते ४५ टक्के असते. परिणामी निमकोटेड युरियाच्या वापरामुळे उत्पादनात ५ ते १० टक्केपर्यंत वाढ दिसून आलेली आहे.

अशाप्रकारे शेतीमध्ये निमकोटेड युरियाचा वापरामुळे जमीन, हवा आणि पाणी प्रदूषण कमी होण्यास मदत होते. पीक उत्पादन खर्चही कमी होतो. यासाठी केंद्र शासनाने मे २०१५ पासून देशात उत्पादित होणारा युरिया व डिसेंबर २०१५ पासून आयात केलेला युरिया निम कोटिंग करूनच पुरवठा व विक्री करणे बंधनकारक केले आहे.

- महेश महाजन, ८१४९४०१५४२ (विषय विशेषज्ञ - पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र, पाल, जि. जळगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com