मल्चिंगद्वारे केली पाण्याच्या दुर्भिक्ष्यावर मात

सुदर्शन सुतार
सोमवार, 24 जुलै 2017

पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष्य असलेल्या जेऊर (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) येथील बसवराज बोरीकरजगी यांनी लिंबूबागेमध्ये जमिनीवर प्लॅस्टिक आच्छादनाचा पर्याय निवडला आहे. या तंत्रज्ञानामुळे पाणी व त्यासाठीच्या खर्चामध्ये प्रतिदिन सुमारे ३००० रुपयांची बचत शक्य झाली. अल्प पाण्यामध्ये १५ एकर लिंबूबाग केवळ जगवलीच नाही, तर त्यातून चांगले उत्पन्नही मिळवले. 
 

पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष्य असलेल्या जेऊर (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) येथील बसवराज बोरीकरजगी यांनी लिंबूबागेमध्ये जमिनीवर प्लॅस्टिक आच्छादनाचा पर्याय निवडला आहे. या तंत्रज्ञानामुळे पाणी व त्यासाठीच्या खर्चामध्ये प्रतिदिन सुमारे ३००० रुपयांची बचत शक्य झाली. अल्प पाण्यामध्ये १५ एकर लिंबूबाग केवळ जगवलीच नाही, तर त्यातून चांगले उत्पन्नही मिळवले. 
 

सोलापूर जिल्ह्यातील जेऊर (ता. अक्कलकोट) येथील बसवराज बोरीकरजगी यांची आठ एकर लिंबूबाग आहे. गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ ते लिंबू उत्पादन घेतात. लिंबूबागेमध्ये सातत्याने नवीन प्रयोग करत त्यांनी उत्पादन खर्च कमी केला आहे. गेल्या काही वर्षांत रासायनिक खतांचा वापर मर्यादित करून, त्याला सेंद्रिय पद्धतीची चांगली जोड दिली आहे. आपल्या १५ एकर क्षेत्रातील बागेच्या हंगामाचे नियोजनही क्षेत्रनिहाय मागे-पुढे ठेवले आहे, त्यामुळे एकापाठोपाठ एक बाग काढणीला येते. वर्षातून ते हस्त आणि अांबिया बहर धरतात. नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि कमीत कमी खर्चातील उत्पादन हे त्यांच्या शेतीचे सूत्र आहे. 

प्रतिझाड दोनशे किलो लिंबू उत्पादनाचे लक्ष्य 
बसवराज यांनी लिंबूच्या संकरित वाणाची निवड केली. दोन ओळी आणि दोन रोपांतील अंतर प्रत्येकी २० फूट इतके ठेवले आहे. त्यानुसार एकरी १०० झाडे लागली. दोन झाडांतील अंतर मोकळे आणि प्रशस्त राहिल्याने झाडांची वाढ एकसारखी झाली. यामुळे फळांची संख्या व दर्जा उत्तम मिळत असल्याचे बसवराज यांनी सांगितले. लिंबू फळपिकाला पाण्याचा वापर मर्यादित असला तरी वेळेवर पाणी आवश्यक असते. या वेळेमध्ये पाणी न मिळाल्यास त्याचा परिणाम दर्जासह उत्पादनावर होतो, त्याचप्रमाणे बाग धोक्यात येते. 

मल्चिंगचा वापर 
अक्कलकोट तालुक्याचा परिसर, त्यातही जेऊर गावामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य तसे कायमचेच. गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी बाग जगवण्यासाठीही त्यांना पाणी विकत घ्यावे लागले. दूरवरून टॅंकरने पाणी आणावे लागल्याने खर्चात मोठी वाढ झाली. पाण्याच्या बचतीचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले. वास्तविक पाहता लिंबूबागेमध्ये मल्चिंग फारसे कोणी करत नाही. मात्र, त्यांनी धाडस केले. जानेवारी महिन्यातच लिंबूबागेमध्ये मल्चिंग पेपरचे आच्छादन केले. त्यासाठी ३० मायक्रॉन जाडीचा ४ फूट रुंद आणि २० फूट लांब पेपर वापरला.  

पाण्याचा काटेकोर वापर 
लिंबू फळपिकाला पाण्याचा वापर मर्यादित असला तरी वेळेवर पाणी आवश्यक असते. या वेळेमध्ये पाणी न मिळाल्यास त्याचा परिणाम दर्जासह उत्पादनावर होतो. त्याचप्रमाणे बाग धोक्यात येते. त्यावर मात करण्यासाठी बसवराज यांनी प्रथमच मल्चिंगचा वापर केला. मल्चिंग पेपरसाठी एकरी २० हजार रुपये खर्च आला असला, तरी पाण्यामध्ये मोठी बचत झाली. 
या वापरामुळे लिंबू झाडाच्या आळ्यामध्ये व आजूबाजूला कुठेही तणे वाढली नाहीत. तणांचे प्रभावी नियंत्रण झाल्याने आंतरमशागत व खुरपणीचा खर्च वाचला. ठिबकद्वारे पाण्याचा वापर करीत असल्याने झाडाच्या मुळांच्या क्षेत्रात कायम ओलावा राहिला. पाण्याचे बाष्पीभवन थांबले. पाण्याच्या काटेकोर वापरातून लिंबू फळांना एक विशिष्ट प्रकारची चमक मिळाली, त्यांचा आकार वाढला.  

हे झाले फायदे
मल्चिंगमुळे पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाऊन पाण्याची बचत झाली.
बागेत तणांची वाढ झाली नाही, त्यामुळे तणनियंत्रणाच्या खर्चात बचत झाली. 
लिंबांना चमक आणि जाडी मिळाली.

पाण्याचा ताळेबंद
बसवराज यांच्याकडे दोन विहिरी आणि ३ बोअर आहेत. मात्र, या भागामध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने पाणी त्यांना वर्षभर पुरत नाही. १५ एकर बागेचे संपूर्ण नियोजन त्यांना पाणी विकत घेऊन करावे लागते. २०१५ मध्ये जानेवारी ते १५ मे या काळामध्ये प्रतिदिन ७० हजार लिटर पाणी विकत घ्यावे लागले. एका टॅंकरचा (क्षमता पाच हजार लिटर) खर्च सुमारे ४०० ते ४५० रुपये धरला, तरी प्रतिदिन अंदाजे ६००० रुपये खर्च केवळ पाण्यासाठी होत असे.  

या वर्षी जानेवारीमध्ये मल्चिंग करण्यासाठी एकरी २० हजार रुपये खर्च आला. 

उन्हाळ्यामध्ये प्रतिझाड सुमारे २०० लिटर पाणी लागते. मल्चिंगमुळे त्यात निम्म्यापर्यंत बचत झाली.