आठ एकरांतील कागदी लिंबू बागेने दिले स्थैर्य

सुदर्शन सुतार 
बुधवार, 21 जून 2017

जेऊर (जि. सोलापूर) येथील बसवराज बोरीकरजगी हा तरुण आठ एकरांत कागदी लिंबाची यशस्वी शेती करीत आहे. कमी देखभाल खर्च, वर्षभर कायम मागणी व हाती ताजे उत्पन्न देणारी ही लिंबूबाग अन्य पिकांपेक्षा त्यांना फायदेशीर ठरली आहे. अर्थात त्यामागे कुशल व्यवस्थापन आणि दुष्काळातही समस्येवर उपाय शोधत पुढे जाण्याची वृत्ती त्यांना यशाकडे घेऊन गेली आहे. 
 

जेऊर (जि. सोलापूर) येथील बसवराज बोरीकरजगी हा तरुण आठ एकरांत कागदी लिंबाची यशस्वी शेती करीत आहे. कमी देखभाल खर्च, वर्षभर कायम मागणी व हाती ताजे उत्पन्न देणारी ही लिंबूबाग अन्य पिकांपेक्षा त्यांना फायदेशीर ठरली आहे. अर्थात त्यामागे कुशल व्यवस्थापन आणि दुष्काळातही समस्येवर उपाय शोधत पुढे जाण्याची वृत्ती त्यांना यशाकडे घेऊन गेली आहे. 
 

सोलापूर जिल्ह्यात जेऊर (ता. अक्कलकोट) येथील बसवराज बोरीकरजगी यांची अठरा एकर शेती आहे. त्यांचे वडील सुरेश बॅंकेत नोकरीस आहेत. छोटा भाऊ परशुराम एमटेक असून तो पुण्यात खासगी कंपनीत नोकरीस आहे. शेतीची सारी जबाबदारी बसवराज सुमारे १६ वर्षांपासून सांभाळतात. त्यापूर्वी वडील नोकरी पाहत शेती करायचे. 

वेगळी वाट 
खरिपात तूर, मूग, उडीद आदी पिकांशिवाय १९९८ मध्ये सुरेश यांनी दीड एकरात लिंबू बाग केली होती. शेतीची आवड असणाऱ्या आणि वेगळं काही करण्याची जिज्ञासा असणाऱ्या बसवराज यांनी मात्र त्यातच आणखी काही वेगळं करता येतं का याचा विचार केला. कमीत कमी खर्च आणि सर्वाधिक उत्पादन मिळवण्याचे उद्दीष्ट ठेऊन जमिनीची सुपिकताही वाढवण्याचा प्रयत्न केला. पहिल्यापासून घरच्या लिंबूशेतीची सगळी जाण होती. त्यातून २००६ मध्ये लिंबाचे क्षेत्र वाढवायचा धाडसी निर्णय घेतला. आज मिळत असलेले उत्पादन, उत्पन्न यातील यश पाहता हा निर्णय किती विचारांती घेतला होता हे लक्षात येते.  

अभ्यासातून विकसित केली बाग 
लिंबाचे उत्पादन वाढवायचे, त्याचा दर्जा वाढवायचा, मार्केट अधिक मिळवायचे हे उद्दीष्ट होते. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ-पंढरपूर भागातील काही लिंबू बागांना भेट देऊन पाहणीही केली. शिवाय कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील सालोटगी, रोगी या लिंबू पटट्यातही जाऊन अधिक माहिती घेतली. नवीन वाण, लागवड-व्यवस्थापन या सर्व बाबींचा अभ्यास केला. विजापूर भागात लिंबू शेतीचा पट्टा आहे. येथील अनेक शेतकरी लिंबाची शेती करतात. त्याच भागातून २५ रुपयाला एक याप्रमाणे रोपे आणली. २० बाय २० फुटांवर लागवड केली. त्यामुळे झाडांमधील अंतर प्रशस्त, मोकळे राहिले. झाडांच्या वाढीस चांगला वाव मिळाला. 

व्यवस्थापनातील बाबी 
हंगाम संपल्यानंतर ऑगस्टमध्ये झाडाच्या वाळलेल्या फांद्या काढून टाकल्या जातात. बाग स्वच्छ केली जाते. त्यानंतर झाडाच्या बुडात मातीचे आळे करुन घेतले जाते. त्यात प्रति झाड २५ किलो शेणखत मिसळले जाते. त्यानंतर दरमहा ८ लिटर जीवामृत व पाच किलो गांडूळखत दिले जाते.
 दोनशे लिटर पाण्याला २० लिटर प्रमाणात जीवामृताचे प्रमाण असते. (जीवामृतात बेसन, शेण, गोमूत्र, व्हर्मीवॉश यांचा समावेश) हंगामात हाच मुख्य खर्च असतो. 
बहराच्या काळात दिवसाला १५० ते २०० लिटर पाणी दिले जाते.

वर्षात दोनच बहार
फेब्रुवारी ते मे हा काळ लिंबाच्या सर्वाधिक मागणीचा असतो. याचा विचार करुन बसवराज हस्त आणि अंबिया या दोन बहारांचे नियोजन करतात. दोन्ही हंगामात प्रत्येकी चार एकरांचे दोन प्लॉट घेतले जातात. सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये हस्त तर डिसेंबरमध्ये अंबिया बहार धरला जातो. सप्टेंबरच्या बहाराची फळे जानेवारीत सुरू होऊन एप्रिल-मेपर्यंत चालतात. अंबिया बहार जानेवारीत धरून फळे एप्रिल-मेमध्ये सुरू होतात. दोन्ही हंगांमांचे चार महिने धरले तरी जानेवारी ते ऑगस्ट असे सलग आठ महिने लिंबूचे उत्पादन व पर्यायाने उत्पन्न सुरू राहते. 

मार्केट
लिंबांसाठी सोलापूर मार्केट उत्तम आहेच. त्यापेक्षाही चांगले मार्केट कर्नाटकातील विजयपूर, इंडीचे आहे. जानेवारी-फेब्रुवारी ते मेपर्यंत मार्केट चांगले असते. मोठे आणि लहान अश दोन ग्रेड्स असतात. 

दरांविषयी 
वर्षभराचा विचार केला तर किलोला १० रूपये दर राहतो. पावसाळा काळात तो पाच रूपयांवर देखील येतो. एकावेळी १०० रूपये असाही दर मिळाला असल्याचे बसवराज यांनी सांगितले. मात्र ४० रूपयांपेक्षा फार वर दर जात नाही. सोलापुरात किलोवर तर कर्नाटकात नगांवर विक्री होते.

किफायतशीर पीक 
बसवराज म्हणाले, की एखाद्या हंगामात दर घसरले तरी दुसऱ्या उन्हाळी हंगामात ते भरून निघतात. या पिकाला कीडनाशकांचा किंवा एकूणच उत्पादन खर्च कमी आहे. द्राक्ष किंवा अन्य फळांइतके त्यास जपावे लागत नाही. शिवाय वर्षभर मागणी असते. वर्षभर दहा मजुरांना रोजगार देता येतो. 

वर्षाकाठी खर्च वजा जाता हे पीक समाधानकारक उत्पन्न देऊन जात असल्याचे बसवराज सांगतात. 

क्षेत्र आणि उत्पादन 
एकूण क्षेत्र सुमारे ८ एकर, एकूण झाडे ८०० पर्यंत
झाडे किमान ८ ते १० वर्षे वयाची  
दोन्ही बहार धरून उत्पादन- प्रति झाड- २ क्विंटल
या पद्धतीने एकूण झाडांचे उत्पादन- १६०० क्विंटलपर्यंत
 

टॅंकरने दिले पाणी
गेल्या दोन वर्षांत दुष्काळामुळे पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष होते. लिंबाचा बहार ऐन उन्हाळ्यात येतो. त्याच काळात ते कमी पडले. विहिरींचे पाणी खोल गेले. तीन कूपनलिका आहेत. मात्र त्यांनाही जेमतेमच पाणी.  आठ एकर बाग जगवायची कशी? हा मोठा प्रश्‍न होता. मात्र बसवराज यांनी न डगमगता दोन वर्षे टॅंकरने पाणी आणून झाडे जगवली. त्यासाठी पाच-सहा लाख रूपये खर्च केला. 
- बसवराज बोरीकरजगी, ८३०८७८५५५६