औषधी गुणधर्माचा सुगंधी, चवदार पोक्कली तांदूळ

औषधी गुणधर्माचा सुगंधी, चवदार पोक्कली तांदूळ

दक्षिण भारतातील केरळ हे राज्य वैशिष्ट्यपूर्ण अाहे. या राज्यातील तब्बल २७ उत्पादनांना भौगोलिक मानांकन (जीआय) मिळालेले आहे. यामध्ये हस्तकला आणि शेती उत्पादनांचा समावेश आहे. शेती उत्पादनातील भौगोलिक मानांकनामध्ये केरळमधील भाताच्या नवारा, पोक्कली, कैपाड, वायनाड गांधाकासाला आणि वायनाड जीराकासाला या पाच वाणांना भौगोलिक मानांकन मिळालेले आहे. आजच्या भागात आपण जीआय मानांकित पोक्कली भात या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या भाताविषयी जाणून घेऊयात. 

भात हे प्रमुख अन्न
    भारतात सुमारे ६० ते ६५ टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश असतो. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि दक्षिण भारतातील लोकांचे मुख्य अन्न भात, सांबार व रसम हे आहे. 
    मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्नघकांचा पुरवठा हा भातातून होत असतो.  
    भात हे सात खंडांतील मुख्य पीक आहे. भाताचे जगात सर्वांत जास्त क्षेत्र आशिया खंडात आहे. 
    भात हे हलक्या, भारी, पाणथळ, खारवट अशा विविध प्रकारच्या जमिनींत यशस्वीपणे वाढणारे व उत्पन्न देणारे प्रमुख पीक आहे. त्यामुळे जगामध्ये सर्वांत अधिक संशोधन भातावर होणे गरजेचे आहे, असे संयुक्त राष्ट संघ (United Nations Organization) व जागतिक अन्न व कृषी संघटना (FAO- Food and Agriculture Organization Of the United Nations) या जागतिक संस्थांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी फिलिपिन्स येथील मनिला येथे आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्राची १३ एप्रिल १९६० साली स्थापना केली. हे लक्षात घेऊन भारतामध्ये ओदिशातील कटक येथे भात संशोधन केंद्र ५ मार्च १९७४ साली स्थापन केले. येथे भातामध्ये असणारे पोषक पदार्थ, शर्करा व प्रथिने यामध्ये वाढ होण्यासाठी प्रयत्न केला जातात. 
    भारतामध्ये केरळ, ओदिशा, बिहार, बंगाल, उत्तर प्रदेशचा काही भाग हे पारंपरिक पद्धतीने भात लागवड करणारे प्रदेश आहेत. 

जीअाय मानांकन अाणि निर्यात 
    पोक्कली भात लागवडीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळावा आणि या भाताचे नाव वापरून बनावट भात विकला जायचा, हे  रोखण्यासाठी केरळच्या कृषी विद्यापीठाने २००७ मध्ये जीआय रजिस्ट्रीकडे या भाताच्या जीअाय मानांकनासाठी अर्ज सदर केला होता. 
    शेतकऱ्यांच्या मदतीने अनेक बाबींचा पाठपुरावा केल्यानंतर कृषी विद्यापीठाला २००८ मध्ये जीआय मानांकन मिळवण्यात यश आले.   
    सध्याच्या आधुनिक युगात, लोकांचा सेंद्रिय उत्पादनापासून तयार होणारे पदार्थ खाण्याकडे कल वाढत चालला आहे. भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही भारतात उत्पादित होणाऱ्या भाताला अधिक मागणी आहे. त्यामध्ये नवारा आणि पोक्कली हे दोन भाताचे प्रकार आघाडीवर आहेत. 
    भारत तांदूळ निर्यातीत आघाडीवर आहे; तर भारतानंतर थायलंड, अमेरिका यांचा क्रमांक लागतो. 
    वर्ल्ड टॉप एक्स्पोर्ट यांच्या माहितीनुसार भारताने २०१६ मध्ये भाताच्या जागतिक उत्पन्नाच्या २६.७ टक्के तांदूळ निर्यात केला होता.

पोक्कली भाताचे उत्पादन 
    केरळमधील अलप्पुळा, एर्नाकुलम आणि थ्रिसुर या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने पोक्कली भाताचे उत्पादन घेतले जाते. 
    येथे भातपिकाची शेती पारंपरिक आणि पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केली जाते.
    माती, पाणी आणि हवामान या भाताच्या शेतीसाठी योग्य असल्यामुळे येथे येणारा भात उच्च दर्जाचा आणि पौष्टिक आहे. येथील शेती पूर्णपणे नैसर्गिक स्रोतावर अवलंबून आहे. 
    पोक्कली भात कमी वेळेत शिजतो. त्याचबरोबर या भातात प्रथिने अधिक प्रमाणात आहेत.
    ताजा सुगंध आणि चव ग्राहकांना आकर्षित करते. साधारणपणे या भाताचे पाच वेगवेगळे प्रकार आणि नावे आहेत. जसे की, पोक्कली पुत्तुपोडी, पोक्कली अवल, पोक्कली राइस ब्रान, पोक्कली ब्राऊन राइस, पोक्कली ब्रोकेन राइस इत्यादी. 
    रंग लालसर व आकार मध्यम जाड स्वरूपाचा आहे. इतर पांढऱ्या भातापेक्षा अधिक पौष्टिक घटक अाणि औषधी गुणधर्म आहेत. 
    काही शेतकऱ्यांच्या मते कॉलरा आणि टायफॉइडच्या रुग्णांना पोक्कली ब्रोकेन राइस खायला दिल्याने आराम मिळतो.

- गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१ (लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com