आंबे बहरातील डाळिंब दरात घसरण

अभिजित डाके
मंगळवार, 25 जुलै 2017

सांगली - आंबे बहरातील डाळिंब बाजारपेठेत दाखल होऊ लागली आहेत. मात्र गेल्या वर्षीपेक्षा डाळिंबाला सरासरी २० ते २५ टक्क्यांनी कमी दर मिळत आहेत. यामुळे उत्पादकांना उत्पादन खर्च मिळणेही अवघड झाले असून, मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करणार, असा प्रश्न आता डाळिंब उत्पादकांच्या समोर उभा राहिला आहे. 

सांगली - आंबे बहरातील डाळिंब बाजारपेठेत दाखल होऊ लागली आहेत. मात्र गेल्या वर्षीपेक्षा डाळिंबाला सरासरी २० ते २५ टक्क्यांनी कमी दर मिळत आहेत. यामुळे उत्पादकांना उत्पादन खर्च मिळणेही अवघड झाले असून, मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करणार, असा प्रश्न आता डाळिंब उत्पादकांच्या समोर उभा राहिला आहे. 

राज्यातील अनेक जिल्ह्यांत गेल्या वर्षी पाणीटंचाई होती. या स्थितीतही डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी टॅंकरने पाणी देऊन डाळिंबाच्या बागा जगवल्या. आंबे बहरमध्ये डाळिंबाला अपेक्षित दर मिळतो. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी आंबे बहर निवडला. पाणीटंचाई असल्याने नियोजन कोलमडले. तरीसुद्धा हार न मानता शेतकऱ्यांनी डाळिंब पिकवली. अशातच आंबे बहरातील डाळिंबावरही तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव झाला. पाण्याच्या कमतरतेमुळे डाळिंबाची गुणवत्तेवरही काहीसा परिणाम झाला आहे. 

नोटाबंदीचा बसला फटका 
डाळिंबाचे सौदे होताना व्यापाऱ्यांकडून नोटाबंदीमुळे अधिक खरेदी करता येत नाही असे सांगितले जाते आहे. नोटाबंदीमुळे डाळिंबाचे दर जे घसरलेलेच आहेत ते वाढणार कधी याची डाळिंब उत्पादक प्रतीक्षा करीत आहेत.

उत्पादन खर्च निघणे अवघड
पाण्याची कमतरता असून देखील टॅंकरद्वारे पाणी देऊन डाळिंबाच्या बागा जिवंत ठेवून उत्पादन घेण्याचे शेतकऱ्यांनी धाडस केले. मात्र बाजारपेठेतील डाळिंबाची होणाऱ्या घसरणीमुळे उत्पादनही खर्च निघणे कठीण झाले आहे. परिणामी, बॅंकेकडून घेतलेले कर्जाची परत फेड कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. 

दर कमी होण्याची कारणे
गुजरात व राजस्थानमध्ये डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ 
राज्यातील लागवड क्षेत्रात वाढ
दर मिळतील या आपेक्षेने आंबे बहराची निवड
तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव

डाळिंबाचे दर गेल्या वर्षीपेक्षा कमीच आहेत. डाळिंब दर सुधारले नाहीत तर मोठे नुकसान होणार आहे. आंबे बहरातील दर वाढतील अशी आशा बाळगून आहे.
- ज्ञानेश्वर गायकवाड, शेतकरी, जिरडा, जि. बुलडाणा

गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या आंबे बहरातील डाळिंबाचे प्रति किलोचे दर २० रुपयांनी कमी आहेत. पिकाला घातलेले पैसे मिळणे कठीण झाले आहे. 
- विश्वास भोसले, दरीकोन्नूर, ता. जत, जि. सांगली