प्रक्रिया उद्योगातून घेतली उभारी

प्रदर्शनातील शेवगा पराठ्याच्या स्टॉलवर ग्राहकांची झालेली गर्दी.
प्रदर्शनातील शेवगा पराठ्याच्या स्टॉलवर ग्राहकांची झालेली गर्दी.

मुलांच्या शिक्षणासाठी औरंगाबाद शहरात स्थायिक झालेल्या रेखा रवींद्र वाहटूळे यांनी बाजारपेठेचा अंदाज घेत प्रक्रिया उद्योगाची सुरवात केली. शेवगा पराठ्याच्या बरोबरीने सोया नट्‌स, खाकरा, चटणी, स्पेशल गरम मसाला आदी उत्पादनांना आता चांगली मागणी वाढली आहे. एकवेळ स्वत: काय करावं? या विवंचनेत असलेल्या रेखा वाहटूळे यांनी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून सहा जणांना रोजगारही दिला आहे.

डोंगरगाव शिव (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील रेखा रवींद्र वाहटूळे या सध्या मुलांच्या शिक्षणासाठी औरंगाबादमधील नंदनवन कॉलनीत रहातात. या शहरात रहाताना स्वतःचा काहीतरी प्रक्रिया उद्योग असावा यादृष्टीने त्यांनी कृषी विज्ञान केंद्र आणि एम.सी.ई.डी. यांच्या समन्वयातून गेल्यावर्षी फळे व भाजीपाला प्रक्रिया, बेकरी पदार्थ निर्मिती, निर्जलीकरण प्रक्रियेबाबत प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी शेवग्याच्या पानांपासून पराठा तसेच सोयाबीनपासून सोया नट्‌स, इतर मसालांच्या निर्मितीस घरगुती स्तरावर सुरवात केली. यास त्यांचे पती रवींद्र यांचीही चांगली साथ मिळाली.

पहिल्यांदा रेखाताईंनी औरंगाबाद शहरामध्ये भरणाऱ्या प्रसिद्ध कर्णपूरा यात्रेत प्रक्रिया पदार्थांच्या विक्रीचा स्टॉल लावला. पहिले दोन दिवस शेवग्याच्या शेंगांची भाजी खाणाऱ्या लोकांना शेवगाच्या पानांपासून पोषक तत्त्वे असणारे पराठेही तयार होतात,  हे पचनी पडत नव्हते. त्यानंतर मात्र हळूहळू शेवगा पराठ्याची मागणी सुरू झाली. ग्राहकांची मागणी लक्षात घेत टप्प्याटप्प्याने रेखाताईंनी सोया नट्‌स, खाकरा, चटणी, चहा मसाला, स्पेशल गरम मसाला, धने पावडर, हळद पावडर, मिरची पावडर, थालिपीठ भाजणी, ढोकळा पीठ आदी उत्पादनांच्या निर्मितीला सुरवात केली. उत्पादनांना वेगळी ओळख तयार होण्यासाठी ‘दितीजा गृहउद्योग` हा ब्रॅंन्ड तयार केला. 

कृषी विज्ञान केंद्राचे मिळाले सहकार्य
औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ दीप्ती पाटगावकर आणि त्यांच्या सहकारी तज्ज्ञांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून विविध प्रक्रिया पदार्थांची माहिती रेखाताईंना दिली. याचबरोबरीने तांत्रिक सल्ला, बाजारपेठेसाठी मार्गदर्शन आणि सहाय्य, विविध प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहनही दिले. या प्रयत्नांचा रेखाताईंना प्रक्रिया उद्योगाच्या वाढीसाठी फायदा झाला.

शेवग्याचे झाडं आले कामी
औरंगाबादेत नंदनवन कॉलनीत राहणाऱ्या रेखा वाहटूळे यांच्या सासूबाई ताराबाई वाहटूळे यांनी गावाकडून शेवग्याचे बी आणून १९९० मध्ये घराजवळील जागेत लागवड केली होती. रेखा वाहटूळेंनी अन्नप्रक्रियेचे प्रशिक्षण घेईपर्यंत प्रचंड मोठे झालेल्या झाडाला तोडण्याचे त्यांच्या मनात होते. परंतु, प्रशिक्षणानंतर पराठ्यासाठी शेवगा झाड्याच्या पाल्याची गरज असल्याने त्यांनी ते न तोडता केवळ छाटणी करून त्याच्या पाल्याचा उपयोग सुरू केला. झाडाला लागणाऱ्या शेंगाही चवदार असल्याने त्याच्या बियांपासून दहा रोपे तयार करून डोंगरगाव शिव येथील  शेतात लागवड केली आहे. 

गृह उद्योगाला खानावळीची जोड
खाण्यासाठी चवदार आणि आरोग्यासाठी उत्तम पदार्थ अशी पसंती ग्राहक देत असल्याचे पाहून गृह उद्योगाला रेखा वाहटूळेंनी खानावळीचीही जोड दिली आहे. ऑफिस, सेमीनार, जन्मदिवस आदी कार्यक्रमांसाठी जेवण पुरविण्याचे काम रेखाताई करतात.

प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्पादनांची विक्री 
औरंगाबादसह राज्यातील विविध ठिकाणच्या जवळपास पंधरा प्रदर्शनांमध्ये रेखा वाहटूळे यांनी आपल्या नावीन्यपूर्ण 'शेवगा पराठा' सह सहभाग नोंदविला. याचबरोबरीने रेखाताईंनी एमएसआयडीसीच्या माध्यमातून डिपार्टमेंट ऑफ कल्चरच्या वतीने आयोजित देशपातळीवरील प्रदर्शनात ‘केव्हीके`च्या मार्गदर्शनातून सहभाग नोंदविला आहे. या प्रदर्शनात रेखाताईंचा गौरव करण्यात आला. दरमहा प्रक्रिया पदार्थांची उलाढाल पंचवीस हजारांच्यापुढे पोचली आहे. त्यातील ४० टक्के नफा शिल्लक रहातो असे रेखाताई सांगतात.

महत्त्वपूर्ण बाबी 
 महिन्याला शेवगा पराठा पिठाची २५ ते ३० किलो विक्री
 महिन्याला पराठ्यातून विक्रीतून चार ते साडेचार हजारांची उलाढाल.
 बॅंक, मॉल, एमसीईडी, केव्हीके, कृषी विभागाकडूनही खाद्यपदार्थांची मागणी.
 शाकाहारी, मांसाहारी पदार्थ तसेच स्पेशल मसाल्यास वाढती मागणी.
 हॉटेल तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार नॉन व्हेजच्या पदार्थांचा पुरवठा.
 होम डिलिव्हरीच्या सोयीने ग्राहकांची मिळतेय पसंती.
 नाराणगाव येथील केव्हीकेमध्ये झालेल्या ‘इनोव्हेटीव्ह फार्मर मीट` मध्ये सहभाग.
 २०१६ मध्ये भुवनेश्वर (ओदिशा) येथे देशपातळीवरील प्रदर्शनात 'एक भारत, श्रेष्ठ भारत' ट्रॉफीने सन्मान.

अशी आहेत उत्पादने  
शेवगा पराठा - वेगळ्या चवीमुळे ग्राहकांच्याकडून मागणी. पॅकिंगवर शेवग्याचे आरोग्याच्यादृष्टीने होणारे फायद्याची माहिती. ग्राहकांच्याकडून चांगला प्रतिसाद. पराठा, दही आणि लोणचे अशी प्लेट ३० रुपयांना विक्री केली जाते.

सोया नट्‌स - ५० ते १० ग्रॅमचे पाकीट तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार किलोवर विक्री.  ५० ग्रॅम पाकीट १५ रुपये दराने विकले जाते.

खाकरा - शेवग्यापासून खाकरे निर्मिती. पाच खाकऱ्यांचे पाकीट २० रुपये. 

वैविध्यपूर्ण मसाले - शाहकारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थासाठी रेखाताईंनी खास मसाल्याची निर्मिती केली आहे. या मसाल्यांना ग्राहकांच्याकडून चांगली मागणी आहे. ५० ते १०० ग्रॅम पाकीटमध्ये मसाले उपलब्ध आहेत. याचबरोबरीने रेखाताईंनी चहा मसालाही तयार केला आहे. हा मसाला १० ते २० ग्रॅमच्या पाकीटातून विकला जातो. मांसाहारी तसेच शाकाहारी पदार्थांसाठी स्पेशल मसाला ५०० रुपये किलो दराने विकला जातो. 

शेवगा पराठा पीठ - गहू, डाळ, सोयाबीन व इतर पदार्थापासून  शेवगा पराठा पीठ निर्मिती. प्रति किलो १६० रुपये दराने विक्री.

- रेखा वाहटूळे, ७३७८६९८२६८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com